Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ajit Pawar: राष्ट्रवादीत अजित पवारांचं बंड, 'या' 9 मुद्यांमधून जाणून घ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Manish Jadhav

Maharashtra Politics Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आता वेगळी वाट धरली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, त्यांनी रविवारी राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. 2019 मध्येही अजित पवारांनी बंडखोरी केली होती.

त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पहाटे शपथ घेतली होती. मात्र, शरद पवार सक्रिय झाल्यानंतर ते परतही आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच वर्षे सरकार चालले होते.

मात्र, आज अजित पवारांनी 2019 सारखा निर्णय का घेतला? त्यांच्या डोक्यात काय शिजत होते? या राजकीय घडामोडींबाबत आपण खालील मुद्यांच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया...

1. सकाळपासून हालचालींना वेग

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. सुप्रिया सुळे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यापासून अजित पवार नाराज होते अशाही बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद हवे होते.

मात्र आज सकाळपासून राज्यातील राजकारणात काही अलबेल नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. त्याचवेळी, अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक त्यांच्या निवासस्थानी बोलावली होती.

या बैठकीसंबंधी सकाळी शरद पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले होते की, ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे ते आमदारांची बैठक बोलावू शकतात. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी आमदारांसह राजभवन गाठले.

2. ‘मी अजित पवार....’, दादांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

राजभवनावर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम आणि अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते. त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.

3. अजित पवारांच्या शपथविधीनंतर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले?

अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, 'राज्यात आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अजित पवार यांचा अनुभव सरकार चालवण्यासाठी आणि महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल. एकाद्या नेत्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते तेव्हा अशा घटना घडतात.

अजित पवारांच्या पाठिशी राष्ट्रवादीमधील नेते, कार्यकर्ते आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचे सरकार आणखी वेगाने काम करेल. महाविकास आघाडीची मोट तुटलेली आहे,'

4. भाजपाला पाठिंबा का दिला, अजित पवारांनी दिलं उत्तर

शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले की, 'आज आम्ही सर्वांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्यााचा निर्णय घेतला आहे. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

विकासाला चालना देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये विकासाला महत्त्व दिले पाहिजे अशी आमची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतली.'

पवार पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, उद्याच्या काळात आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच या सरकारमध्ये काम करणार आहोत. येत्या काळात आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच निवडणुकाही लढवणाार आहोत.

पक्षातील बहुतेक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. शुक्रवारी मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. विशेष म्हणजे पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच आहे.'

5. ऑपरेशन राष्ट्रवादीवर भाजपाची प्रतिक्रिया काय?

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते आज पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. हे समीकरण महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी तयार झाले आहे.

तर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आज राष्ट्रवादीचे 40 हून अधिक आमदार सामील झाले आहेत.'

6. उद्धव ठाकरे गटाने अजित पवार बंडावर काय म्हटलंय?

अजित पवार यांच्या शपथविधीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही राजकीय भूंकप झाला आहे, असं मी मानत नाही. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत.

लवकरच शिंदेसह त्यांचे आमदार अपात्र ठरणार आहेत. तर भविष्यात महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र राहणार आहोत.

सामान्य जनतेचा या फुटीला अजिबात पाठिंबा नाही. शरद पवारांशी माझं बोलणं झालं आहे. ते कणखर आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल'

7. राज ठाकरे आणि इम्तियाज जलील यांचं सडेतोड मत

अजित पवारांच्या बंडावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रीय येऊ लागल्या आहेत. यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

राज म्हणाले की, 'आज महाराष्ट्राचा सिंहासन चित्रपटातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस’ झाला. शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक पार पडला.'

दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही भाष्य केले आहे. राज्यात ईडीचं सरकार स्थापन झालेलं असून आधी दोन सुपरवायझर होते अता तीन असा खोचक टोला जलील यांनी लगावला आहे. तर केवळ सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असेही ते पुढे म्हणाले.

8. शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स

अजित पवारांच्या बंडांवर आता शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे. पवार म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटले होते. पंतप्रधान म्हणाले होते की, राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष आहे.'

पीएम मोदींनीही पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षातून जो कोणी सरकारमध्ये सामील झाला आहे, त्यांना या निर्णयाने खूप आनंद झाला आहे, असे ते म्हणाले.

आपल्या पक्षातून सरकारमध्ये गेलेले आता सर्व आरोप-प्रत्यारोपातून मुक्त होतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार पुढे म्हणाले की, 'राजकारणात फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.'

मात्र, एवढ्या मोठ्या राजकीय घटनेनंतर त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचे तसेच पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्यांचे भविष्य काय असणार, हेच त्यांना माहीत नसल्याने मला त्यांची चिंता वाटत असल्याचेही ते म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, 'आज आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. 6 तारखेला बोलावलेल्या बैठकीत आम्ही पक्ष संघटनेबाबात निर्णय घेणार होतो. मात्र त्याआगोदरच पक्षातील सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. हा आजचा प्रकार इतरांना नवीन आहे, परंतु मला हा नवीन नाही.

माझा सर्वसामान्य जनतेवर आणि विशेष:ता तरुण पीढीवर पूर्ण विश्वास आहे. मला देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन येत आहेत. इथे येण्यापूर्वी ममता बॅनर्जी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा समर्थनार्थ फोन आला. आता आम्ही पक्षाची भूमिका घेऊन जनतेमध्ये जाणार आहोत.'

9. गोव्यातील राष्ट्रवादीचं पुढं काय होणार?

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आज मोठं बंड पाहायला मिळालं. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विभागला गेला. अजित पवारांच्या या बंडानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यात असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रासह गोवा, मेघालायमध्ये आहे.

विशेष म्हणजे, मेघालयात राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेत आहे तर गोव्यात भाजपबरोबर नाही. येत्या काळात गोव्यातील रष्ट्रवादीची वाटचाल कशी असणार?

गोव्यातील नेते काय विचार करतात? अजित पवारांचं नेतृत्व मान्य करणार की शरद पवारचं आपले नेते असणार यावर ठाम राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. (सविस्तर वाचा गोव्यातील नेत्यांची प्रतिक्रीया)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT