

शापोरा नदीच्या किनारी आंबे, फणस, माड काजू सारखे निसर्ग सौदयाने नटलेले पेडणे महालात वसलेले वजरी हे माझे गाव. ग्राम दैवत श्री महादेव व सातेरी पंचायतन देवतांची कृपादृष्टी लाभलेलं सुंदर असे वजरी गाव. श्री महादेवाचे भव्यदिव्य मंदिर. भव्य मंडप आणि आकर्षक महाद्वार. तसेच सातेरी मातेचे मंदिर. भव्य मंडप आणि आकर्षक कळस गावच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात.
वजरी गावातील लोकांची देवदेवतांवर अपार अोढ, त्यांना खेचून गावात आणते. शहरात जरी मोठमोठ्या इमारती आधुनिक सुविधा असल्या तरी गावातील शांतता, शुद्ध हवा आणि माणुसकीची ऊब ही वेगळीच असते.
जेव्हा मी लग्न करून या गावात आले, तेव्हा गावच्या लाेकांनी मला भरभरून प्रेम दिले त्यांनी मला वजरी गावच्या रूढी परंपरा समजून सांगितल्या. मला त्यांनी त्यांच्यात सामावून घेतले. त्यांच्यातील मनमिळूपणा आणि आपुलकीने मी पूर्णपणे भारावून गेले.
माझी जन्मभूमी बदलली. पण आता वजरी हाच माझा गाव आहे, ही भावना दिवसेंदिवस आणखीनच दृढ होत गेली आणि पूर्णपणे मनाने वजरी गावाशीच जोडले गेले.
वजरी गावच्या देवदेवतांचा इतिहास सांगण्याचे धाडस मी करणार नाही. पण येथील वास्तव्यात जे-जे मी पाहिले, ज्याचा अनुभव घेतला तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. श्री महादेव व श्री सातेरी देवीच्या मंदिरात दरवर्षी वेगवेगळे उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे केले जातात.
श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव, श्री महादेवस्थानचा वार्षिक भजनी सप्ताह, महाशिवरात्री व इतर सण साजरे केले जातात. वजरी गावचे उत्सव म्हणजे ग्रामस्थांसाठी एक पर्वणीच असते.
प्रत्येक होळीपौर्णिमेच्या आठव्या दिवशी ग्रामदेवता श्री सातेरी माता ग्रामप्रदक्षणा करून संध्याकाळी मंदिरात प्रवेश करते. प्रत्येक वाड्यावर गुढ्या, तोरणे उभ्या करून श्रीच्या पालखीचे स्वागत केले जाते. ‘पार्वती पतये हर हर महादेव श्री सातेरी माता की जय’म्हणत ढोलताशांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात पालखीचे गावात आगमन होते.
सर्व गाव एकरूप होऊन जातो. सर्वजन मोठ्या भक्ती भावाने देवीची ओटी भरून पूजा करतात. परगावी असलेले ग्रामस्थही मोठ्या संख्येने गावात येऊन पालखीचे दर्शन घेतात. हा पालखी उत्सव वजरी गावचा एक प्रमुख उत्सव मानला जातो.
वजरी देवदेवतांचा लौकिक आहे. श्री महादेव मंदिरात ‘प्रसाद’ घ्यायला येणाऱ्या तसेच वडावरच्या देवचाराकडे दर रविवारी व बुधवारी आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या आणि प्रश्न सुटल्याचे समाधान मिळवून परत जाणाऱ्या असंख्य भाविकांच्या तोंडून वजरी गावच्या जागृत देवदेवतांची थोरवी ऐकायला मिळते.
वजरीला पांडवकालिन इतिहासाचा वारसाही लाभला आहे. गावातील जाणकार लोकांचा असा दावा आहे की, जेव्हा पांडव वनवासात होते. तेव्हा ते काही काळ वजरीत वास्तव्य करत होते.
वजरीचे ग्रामस्थ तितक्याच आपुलकी आणि जिद्दीने गावच्या विकासाची स्वप्ने घेऊन ती पूर्ततेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे गावातील पुरातन श्री सातेरी देवीच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थांनी एकजुटीने हाती घेतले आहे.
या भव्यदिव्य सातेरी मंदिराच्य पुन:प्रतिष्ठापणामुळे गावचे सौंदर्य आणखीनच खुलून येईल. यात शंकाच नाही, विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असतानाही गावाने आपली संस्कृती आणि परंपरा जपलेली आहे. येथील जागृत देवदेवतांच्या चरणी मन:पूर्वक नतमस्तक होणे, हेच माझे भाग्य.
संगीता नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.