Virat Kohli withdraws from India vs England first two Tests for personal reasons:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने माघार घेतली आहे. याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार विराटने वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली होती. या संघात विराटचाही समावेश होता.
मात्र, आता त्याने बीसीसीआयकडे या दोन्ही सामन्यातून माघार घेण्यासाठी विचारणा केली केली होती, त्याची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे. तसेच बीसीसीआयने सांगितले की विराटच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल.
बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की 'विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मा, संघव्यवस्थापन आणि निवड समीतीशी चर्चा केली आहे. त्याने देशाचे प्रतिनिधित्व करण्याला नेहमीच पहिले प्राधान्य राहिल, यावरही जोर दिला आहे. मात्र, काही वैयक्तिक परिस्थिती उद्भवल्याने तिथे त्याची उपस्थितीत गरजेची असल्याचे त्याने सांगितले आहे.'
बीसीसीआयने पुढे लिहिले आहे, 'बीसीसीआय त्याच्या या निर्णयाचा आदर करते आणि बोर्डाकडून व संघव्यवस्थापनाकडून त्याला पाठिंबा देत आहे. तसेच बोर्डाला आणि संघव्यवस्थापनेला उर्वरित संघावर पूर्ण विश्वास आहे की ते पुढे येऊन या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करतील.'
याशिवाय विराटच्या वैयक्तिक आयुष्याचा मान राखला जावा असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
बीसीसीआयने लिहिले की 'बीसीसीआय मीडिया आणि चाहत्यांना विनंती करत आहे की या काळात विराटच्या खाजगी आयुष्याचा आदर केला जावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणाचे कोणतेही अनुमान लावू नका. आगामी कसोटी मालिकेचे आव्हान स्विकारत असलेल्या भारतीय संघावर लक्ष केंद्रित असायला हवे.'
दरम्यान, आता विराट तिसऱ्या कसोटी सामन्यापासून उपलब्ध असेल, अशी चाहत्यांना अपेक्षा असेल.
कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादला 25 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला दुसरा सामना सुरु होणार आहे. तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटला सुरू होईल. चौथा सामना 23 फेब्रुवारीला रांचीमध्ये, तर पाचवा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरू होईल.
पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.