Suresh Raina 5 Records:
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना सोमवारी (27 नोव्हेंबर) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रैनाने अनेकदा भारतासाठी खेळताना शानदार कामगिरी करत विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत. याच विक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
सुरेश रैनाची कारकिर्द
रैनाने 2005 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षा भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारताकडून 18 कसोटी सामने खेळले असून 26.48 च्या सरासरीने 768 धावा केल्या. तसेच 226 वनडे सामन्यात त्याने 5 शतकांसह 5615 धावा केल्या. याबरोबरच 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये त्याने 29.18च्या सरासरीसह 1605 धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.
तसेच 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखला जाणारा रैनाची आयपीएलमध्येही शानदार कारकिर्द राहिली आहे. त्याने 205 आयपीएल सामने खेळले असून यात 5528 धावा केल्या आहेत. तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक सामने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला.
तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला भारतीय
रैना (Suresh Raina) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला भारतीय आहे. त्याने 2008 मध्ये हाँग काँग विरुद्ध पहिले वनडे शतक केले होते. तर 2010 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्येही शतक झळकावले. 2010 ला झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची खेळी त्याने केली होती. हे त्याचे एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 शतक आहे.
तसेच श्रीलंकेविरुद्ध त्याने कोलंबो येथे 120 धावांची खेळी करत पहिले आणि एकमेव कसोटी शतक झळकावले. विशेष म्हणजे हा त्याच्या पदार्पणाचा कसोटी सामना होता. या शतकासह तो तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
टी20 - वनडे वर्ल्डकपमध्ये शतक करणारा खेळाडू
सुरेश रैना हा एकमेव असा भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकपमध्ये शतक केले आहे. त्याने 2010 ला झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केलेली. तसेच 2015 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 110 धावांची खेळी केली होती.
भारताचा युवा टी20 कर्णधार
रैनाने 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्यांदा भारताचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याचे वय केवळ 23 वर्षे 197 दिवस इतके होते. त्यामुळे तो भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय टी20 कर्णधार ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा पहिला
रैनाने 2019 मध्ये पहिल्याच सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यावेळी तो 5000 आयपीएल धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होता. यासह त्याने आपले 'मिस्टर आयपीएल' ही उपमा सार्थ ठरवली होती.
सर्वाधिक आयपीएल झेल
रैना हा आयपीएमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षकही आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 109 झेल घेतले आहेत.
सलग 7 आयपीएल हंगामात 400 पेक्षा अधिक धावा
'मिस्टर आयपीएल' रैनाने 2008 ते 2014 या दरम्यान सलग 7 आयपीएल हंगामात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे सलग 7 आयपीएल हंगामात 400 हून अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.