Football Club Dainik Gomantak
क्रीडा

Salgaoncar Football Club : प्रतिकूल परिस्थितीमुळेच टोकाची भूमिका; ‘साळगावकर एफसी’चे स्पष्टीकरण

किशोर पेटकर

Salgaocar Football club : भारतीय फुटबॉलमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे या खेळाचे भवितव्य धोक्यात आहे, तसेच क्लब फुटबॉल संस्कृतीला हानी पोहचत आहे. युवा विकास धोरणाचे खच्चीकरण होत असून गोव्यातील फुटबॉल क्षेत्र टोकाला गेले आहे, ते सामना निकाल निश्चितीच्या आरोपांमुळे काळवंडले आहे.

या प्रतिकूल पार्श्वभूमीवर ‘साळगावकर एफसी’ संघ व्यवस्थापनास क्लबच्या देदीप्यमान इतिहासातील सर्वांत कठीण निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट करत गोव्यातील या सर्वांत जुन्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या क्लबने सीनियर संघ बंद करण्यामागील भूमिका शनिवारी स्पष्ट केली.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेसाठी साळगावकर एफसीने यंदा गोवा फुटबॉल असोसिएशनकडे प्रवेशिका दाखल केली नाही. त्यामुळे राज्यातील या प्रमुख स्पर्धेत माजी विजेते खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच क्लब व्यवस्थापन सीनियर संघ उपक्रमातून माघार घेत असल्याचेही सिद्ध झाले.

‘साळगावकर एफसी’च्या या धक्कादायक निर्णयानंतर भारतीय फुटबॉल ढवळून निघाले. त्यानंतर शनिवारी प्रथमच क्लबने माघारीबाबत आपली भूमिका विषद केली. त्यासंदर्भात क्लबचे सचिव ॲडलियर डिक्रूझ यांनी सविस्तर पत्रक प्रसिद्धीस दिले.

परिस्थितीनुरूप निर्णयाचा पुनर्विचार

क्लबप्रती अतूट नाते आणि बांधिलकी, तसेच क्लबसोबतच्या दीर्घ सहवासात समान दृष्टीकोन राखल्याबद्दल ‘साळगावकर एफसी’ने क्लबचे अधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक, खेळाडू, चाहते यांना धन्यवाद दिले आहेत.

‘‘साळगावकर एफसी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून राहील. जेव्हा क्लबला मूळ उद्दिष्टे आणि उद्देश यांच्याशी जुळवून घेणे शक्य होईल, तेव्हा आमच्या निर्णयाचा पुनर्विचार करू,’’ असे सांगत ‘साळगावकर एफसी’ने पुनरागमनाचेही अंधूक संकेतही दिले आहेत.

फुटबॉलचे भवितव्य धोक्यात

‘साळगावकर एफसी’ला देशातील फुटबॉलचे भवितव्य धोक्यात असल्याचे वाटते. स्थानिक फुटबॉल गुणवत्तेला व्यासपीठ देण्याच्या शुद्ध हेतूने साळगावकर क्लबची स्थापना झाली. मुक्तिपूर्व काळात पोर्तुगीज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघांना शह देण्यासाठी साळगावकर क्लबने स्थानिक गुणवत्तेला प्राधान्य दिले.

गोवा मुक्तीनंतर देशातील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळण्याचे उद्दिष्ट बाळगून गोमंतकीय फुटबॉलपटूंना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी देण्यावर भर राहिला, असे साळगावकर क्लबने नमूद केले.

मात्र, काळानुरूप भारतीय फुटबॉलमध्ये आमूलाग्र बदल घडले, जेणेकरून मूळ दृष्टिकोनाविषयी फेरविचार करणे आम्हाला भाग पडले, असे स्पष्ट करून ‘साळगावकर एफसी’ने देशातील बंद पडलेल्या फुटबॉल क्लबच्या यादीकडे अंगुलीनिर्देश केला.

‘‘आयएसएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर आय-लीगला दुय्यम स्पर्धेचा दर्जा मिळाला. देशातील ऐतिहासिक परंपरा असलेल्या स्पर्धा मृत झाल्या. महिंद्रा, टाटा, जेसीटी, पुणे एफसी असे कितीतरी क्लब बंद करावे लागले. देशातील चँपियन क्लब ठरविणारी फेडरेशन कप स्पर्धाही २०१७ नंतर झालेली नाही. आय-लीग आणि बिगर आयएसएल क्लबना भवितव्य नसल्याची जाणीव झाल्याने २०१६ साली धेंपो आणि स्पोर्टिंग क्लबसह साळगावकर एफसीने आय-लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

युवा विकास कार्यक्रमास धक्का

आय-लीगमधून माघार घेतली, तरी साळगावकर एफसीने गोवा प्रो-लीग स्पर्धेत खेळणे कायम ठेवले, तसेच युवा विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करताना वयोगटात संघ राखला. त्या माध्यमातून सर्वोत्तम प्रशिक्षण सुविधा पुरविण्यावर, तसेच आहार मार्गदर्शन, दुखापतविरोधी सत्र, मानसिकदृष्ट्या मार्गदर्शन, तांत्रिक मार्गदर्शन या बाबींवर ‘साळगावकर एफसी’ने भर दिला, असे या क्लबने पत्रकात नमूद केले आहे.

आय-लीगमधून माघार घेतल्यानंतर ‘साळगावकर एफसी’ने स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन देताना परदेशी खेळाडूंची निवड न करण्याचे धोरण अवलंबिले. आपल्या युवा विकास कार्यक्रमातील गुणवत्तेला सीनियर संघात स्थान दिले. तथापि, युवा विकास धोरणासंदर्भात बदललेल्या धोरणामुळे साळगावकर एफसीला धक्का बसला.

‘‘१८ वर्षांखालील खेळाडूंना बिगरहौशी गटात नोंदणी करण्याची परवानगी नाकारण्यात आली. अगोदरच्या क्लबकडून ना हरकत दाखल्याविना सर्व हौशी खेळाडूंना क्लब बदलणे शक्य झाले. राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील संघाचे संख्याबळ अनुक्रमे सात व नऊ खेळाडूंचे करण्यात आले. त्यामुळे वरच्या गटासाठी खेळाडू मिळणे मुश्कील बनले. हे दोन्ही वयोगट खेळाडूंच्या प्रारंभिक कारकिर्दीत महत्त्वपूर्ण असल्याने आम्ही फक्त १३ आणि १५ वर्षांखालील वयोगटात खेळण्याचे ठरविले,’’ असे ‘साळगावकर एफसी’ने म्हटले आहे.

गोमंतकीय फुटबॉलची प्रतिमा डागाळली

हल्लीच्या काळात सामना निकालनिश्चिती आणि बेटिंगच्या वारंवारच्या आरोपांमुळे गोमंतकीय फुटबॉलची प्रतिमा डागाळल्याबद्दल ‘साळगावकर एफसी’ने खंत व्यक्त केली आहे.

‘‘यामुळे स्पर्धात्मकतेचे आकर्षण आणि जिंकण्याचा रोमांच नष्ट झाला. गोवा फुटबॉल असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी समिती अधिक जागरुक आणि सक्रिय असली, तरी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतलेला असल्यामुळे धुसफूस नियंत्रित करणे अतिशय कठीण होईल,’’ असे ‘साळगावकर एफसी’चे म्हणणे आहे.

स्थानिक पातळीवर असहकार्य

साळगावकर एफसीने आपल्या सीनियर संघाच्या सरावासाठी खासगी मैदानाची व्यवस्था केली, परंतु वयोगट संघांसाठी मैदान मिळविणे अवघड बनले. यासंदर्भात सतत पाठपुरावा करूनही स्थानिक अधिकारिणीकडून आवश्यक सहकार्य मिळाले नसल्याबद्दल साळगावकर क्लबने खेद व्यक्त केला.

कित्येक मैदाने आयएसएल सराव आणि सामन्यांसाठी आरक्षित केल्याने गोव्यासाठी त्याचा काहीएक फायदा होणार नसल्याचे क्लबला वाटते.

‘‘गोव्याच्या तळागाळातील फुटबॉल विकासासाठी वचनबद्ध राहू. या विभागात आम्ही अजूनही अधिक अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर खिलाडूवृत्ती, शिस्त आणि सौहार्दासह प्रतिभेला खतपाणी घालणे हे आमचे प्रारंभापासून वैशिष्ट्य असून प्रशिक्षणाचा तोच दर्जा कायम राखू.’’

- साळगावकर एफसी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT