भारतीय संघाने शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेला कसोटी मालिकेतील पाचवा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली.
या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मेडल (Best Fielding Medal) प्रदान सोहळा पार पडला. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
खरंतर वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपासून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मेडल देण्याची परंपरा चालू झाली आहे. आता हे मेडल प्रत्येक मालिकेनंतर त्या मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला दिले जाते.
विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर या परंपरेत थोडा बदल करण्यात आला. याबद्दल भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही पाच सामन्यांची कसोटी मालिका असल्याने यावेळी दोन मेडल देण्यात येणार आहे, झेलसाठीही आणि क्षेत्ररक्षणासाठीही.
त्यांनी मेडल विजेत्या खेळाडूंची नावे घोषित करण्याआधी संघाचे कौतुक केले. तसेच खेळाडूंनी केलेल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांनी पहिले दोन सामने खेळलेल्या श्रेयस अय्यरसह कुलदीप यादवचेही कौतुक केले.
तसेच या मालिकेतून पदार्पण केलेल्या सर्फराज खान, ध्रुव जुरे यांच्याही क्षेत्ररक्षणाबद्दल कौतुक केले. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या योगदानाबद्दलही त्यांची स्तुती केली.
यानंतर दिलीप यांनी सांगितले की पहिले मेडल हे दोन खेळाडूंमध्ये विभागून देण्यात येणार आहे. त्यांनी या मेडसाठी रोहित आणि गिल यांना विभागून विजेता घोषित केले. तसेच सांगितले की या खेळाडूंमधून एकाची निवड करणे कठीण होते. त्यांनी खूप चांगले झेल घेतले.
यानंतर फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण केलेल्या कुलदीप यादवला दुसऱ्या मेडलचा विजेता म्हणून दिलीप यांनी जाहीर केले. यानंतर या मेडल विजेत्यांचे भारतीय संघाने टाळ्या वाजवत अभिनंदन केले.
विशेष म्हणजे पदक विजेत्या रोहित, गिल आणि कुलदीप यांना क्षेत्ररक्षणाचे मेडल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते देण्यात आले.
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाने हैदराबादला झालेला कसोटी सामना पराभूत झाला होता, पण नंतर विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला येथे झालेले सामने जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.