भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने शनिवारी (9 मार्च) एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने ही मालिकात 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, भारताने सलग 17 वी मालिका मायदेशात जिंकली आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युमल या जोडगोळीविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधारही ठरला.
या विजयानंतर रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्फराज खान, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला त्याने 'गार्डन मैं घुमने वाले बंदे' (बागेत फिरणारी पोरं), असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, अनेकांना रोहितच्या या कॅप्शनमागील संदर्भ माहित नसेल. खरंतर इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान रोहित युवा खेळाडूंना ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे ओरडला होता.
त्यावेळी 'कोणीही गार्डनमध्ये फिरेल', असं म्हणत रोहित ओरडला होता. त्याचे हे वाक्य स्टंप माईकमध्ये कैद झाले होते. त्यामुळे त्याचाचा संदर्भ घेत रोहितने हे कॅप्शन दिले असल्याचे म्हटले जात आहे.
रोहितच्या या पोस्टवर युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनीही कमेंट केली आहे. युवराजने जोरदार हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत, तर सूर्यकुमारने लिहिले की 'गिल आणि जयस्वाल तर नक्कीच'.
दरम्यान, भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला होता. मात्र नंतरचे चारही सामने भारताने जिंकले आणि ही मालिकाही आपल्या नावावर केली.
भारताने ही मालिका जिंकल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या स्पर्धच्या गुणतालिकेतील पहिले स्थानही भक्कम केले आहे. या विजयामुळे भारताची विजयी टक्केवारी 68.51 अशी झाली आहे. या गुणतालिकेत भारतापाठोपाठ 60 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 59.09 आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.