भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.
विशेष म्हणजे या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पराभव स्विकारला होता. परंतु, नंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि पुढील चारही सामने जिंकत मालिकेत विजयाची नोंद केली. भारताचा मायदेशातील हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या मालिकेत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी आणि केएल राहुल असे अनेक वरिष्ठ खेळाडू खेळले नव्हते. त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली.
या मालिकेत भारताकडून तब्बल 5 खेळाडूंचे कसोटी पदार्पण झाले. असे असताना भारताने या मालिकेत विजय मिळवण्यामागील महत्त्वाची कारणे कोणती होती, याचा आढावा घेऊ.
इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या भारतीय संघात अनुभवी आणि नव्या खेळाडूंचे चांगले मिश्रण पाहायला मिळाले. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक वरिष्ठ खेळाडू नसले, तरी रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज असे काही अनुभवी खेळाडू होते.
विशेषत: भारताचे गोलंदाजी आक्रमण चांगलेच अनुभवी होते. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रावू पाहणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूंनीही भारताकडून चांगली कामगिरी केली.
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान अशा अनेक खेळाडूंना भारताच्या फलंदाजीचा भार उचलला. त्यामुळे संघातील अनुभवी आणि नव्या खेळाडूंचा मेळ सुरेख जमला आणि भारताला पहिल्या पराभवानंतर विजयापर्यंत पोहचता आले.
पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात वगळता भारताची फलंदाजी प्रत्येक डावात बहरलेली दिसली. प्रत्येक डावात संघातील एखाद-दोन खेळाडूंनी फलंदाजीचा भार सांभाळत संघाला मोठी धावसंख्या उभारता येईल, याची काळजी घेतली.
यशस्वी जयस्वालची फलंदाजी ही भारतासाठी सर्वात सकारात्मक ठरली. त्याने जवळपास प्रत्येक डावात भारताला आक्रमक खेळत चांगली सुरुवात मिळवून दिली. त्याने ७०० हून अधिक धावा केल्या. तसेच शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनीही वरच्या फळीत भरीव योगदान देताना प्रत्येकी दोन शतकेही केली.
याशिवाय चौथ्या कसोटीत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने भारताच्या डावाची जबाबदारी घेतली, तर रविंद्र जडेजानेही अष्टपैलू म्हणून फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. इतकेच नाही, तर सर्फराजनेही ५ डावात ३ अर्धशतके केली. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी मोठ्या धावसंख्या उभारल्याने गोलंदाजांनी काहीतरी करून दाखवण्याची संधी निर्माण केली.
मालिका भारतात झाल्याने अपेक्षेप्रमाणे फिरकी गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. दरम्यान, जरी फिरकी गोलंदाजांचे या मालिकेत वर्चस्व राहिले असले, तरी भारताच्या वेगवान गोलंदाजांनीही त्यांना दमदार साथ दिली.
भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत तीन फिरकी गोलंदाज असे संमिश्रण कायम ठेवले. त्यामुळे प्रत्येकवेळी इंग्लंडला अडकवण्यात भारताला यश मिळाले. कुलदीपची चायनामन गोलंदाजी आणि अश्विन-जडेजाचा अनुभव यामुळे इंग्लिश फलंदाजांना सतावून सोडण्यात भारतीय संघाला यश मिळाले.
इंग्लिश फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्विपचे शस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकदा हेच अस्त्र त्यांच्या विरोधातही गेले. त्यामुळे फलंदाज बऱ्याचदा पायचीत झाले. जो रुट, झॅक क्रावली, ऑली पोप, बेन डकेट अशा काही इंग्लंडच्या खेळाडूंनी चांगल्या खेळी केल्या. परंतु, त्यांना सातत्य राखता आले नाही.
दरम्यान, फिरकी गोलंदाज इंग्लंडला वरचढ ठरत असतानाच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीचेही कौशल्य दाखवत त्यांना चांगली साथ दिली. अनेकदा त्यांनी मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
कर्णधार रोहित शर्मासमोर या मालिकेत युवा खेळाडूंना सांभाळून त्यांच्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर काढण्याचे आव्हान होते. हे आव्हान त्याने यशस्वीरित्या पेलले. पहिल्या पराभवानंतर त्याने संघातील आत्मविश्वास कमी होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच युवा खेळाडूंचाही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला.
त्याने क्षेत्ररक्षण लावताना केलेले बदल आणि गोलंदाजीतील बदलही महत्त्वाचे ठरले. अनुभवी गोलंदाजी आक्रमणाचा त्याने पुरेपूर आणि योग्य वेळी वापर केला. त्यामुळे भारताला या मालिकेत विजय मिळवणे सोपे गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.