Rishabh Pant Comeback: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाची अनेक क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याने नुकतेच आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या सामन्यांसाठी स्टेडियमवरमध्ये उपस्थितीही दर्शवली होती. पण आता त्याला अजूनही पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी 8-10 महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतचा डिसेंबर 2022 अखेरीस दिल्लीवरून रुडकीला येताना गंभीर कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला काही गंभीर जखमाही झाल्या. तसेच त्याची कार पूर्ण जळाली होती. पण सुदैवाने तो या गंभीर कार अपघातातून बचावला.
याच अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तो त्याच्या दुखापतींमधून सावरत आहे. पण या दुखापतींमधून सावरण्याच्या कालावधीदरम्यान त्याला आगामी काही महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये सप्टेंबरमध्ये हणारा आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणारा वनडे वर्ल्डकप 2023 अशा स्पर्धांचा समावेश आहे.
दरम्यान, क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार पंत जर लवकरात लवकर तंदुरुस्त झाला, तरी त्याला जानेवारी 2024 महिना उलटावा लागणार आहे. तसेच त्याच्या जवळच्या लोकांकडून कळाले आहे की कोणत्याही मदतीशिवाय चालण्यासाठी पंतला अजूनही काही आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
तसेच तो लवकरात लवकर बरा झाला, तरी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 महिने लागू शकतात. त्याचबरोबर तो तंदुरुस्त झाल्यानंतरही लगेचच यष्टीरक्षण करण्याची शक्यता कमी आहे. यष्टीरक्षणासाठी फिट होण्यासाठी त्याला आणखी काळ लागू शकतो. त्यामुळे तो सुरुवातीला फक्त फलंदाजी करताना दिसू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे बीसीसीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे की पंतला या कालावधीत शक्य तो सर्वप्रकारचा पाठिंबा आणि मदत दिली जाईल.
पंतवर जानेवारी 2023मध्ये लिगामेंट शस्त्रक्रिया झाली आहे. तसचे त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख डॉ दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली उपचार होत आहेत. तसेच रिपोर्ट्सनुसार, पंतवर दुसरी शस्त्रक्रिया देखील होण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.