

पणजी: 'रिलॅक्स' लाईफस्टाईल आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्यात राहण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यात प्रत्यक्ष राहण्याचा खर्च किती येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर गोव्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि कंटेंट क्रिएटर महिलेने दिले. मधुश्री जोशी हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन गोव्यातील आपल्या मासिक खर्चाचा पाढा वाचला असून एका अविवाहित महिलेला तिथे राहण्यासाठी दरमहा साधारण 82 हजार रुपये खर्च करावे लागतात, असे तिने म्हटले.
मधुश्रीने तिच्या खर्चाची वर्गवारी करताना सांगितले की, राहण्यासाठी घराचे भाडे आणि गाडीचा हप्ता हे तिच्या बजेटमधील सर्वात मोठे दोन घटक आहेत. ती दरमहा 26,000 रुपये घराच्या भाड्यापोटी देते, तर आपल्या गाडीच्या 'ईएमआय'साठी तिला 25,000 रुपये मोजावे लागतात. या दोन प्रमुख खर्चांनंतर इतर गोष्टींचा क्रमांक लागतो. घरातील वीज बिल, वायफाय इंटरनेट, गॅस आणि विविध सबस्क्रिप्शनसाठी ती साधारण 5,000 रुपये खर्च करते. महिन्याचा किराणा आणि खाण्यापिण्यासाठी तिला 7,000 रुपये लागतात, तर पेट्रोलचा खर्च 3,000 रुपयांच्या आसपास होतो. याशिवाय, जिमसाठी 1,000 रुपये आणि प्रवास, स्वतःची काळजी तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी ती 15,000 रुपये बाजूला ठेवते.
या सर्व खर्चांची बेरीज केली असता, मधुश्रीला गोव्यात (Goa) जगण्यासाठी दरमहा एकूण 82,000 रुपये खर्च करावे लागतात. मात्र, मधुश्रीने एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली की, तिचा हा खर्च काही प्रमाणात 'सबसिडी' स्वरुपात कमी होतो. कंटेंट क्रिएशन क्षेत्रात असल्याने तिला अनेक मेकअप, स्किनकेअर आणि कपड्यांचे ब्रँड्स विनामूल्य 'पीआर पॅकेजेस' पाठवतात. तसेच, अनेक रेस्टॉरंट्स प्रमोशनच्या बदल्यात तिला जेवणासाठी आमंत्रित करतात. यामुळे तिच्या जीवनशैलीचा मोठा खर्च वाचतो आणि ती हे वाचलेले पैसे आपल्या भविष्यातील प्रवासासाठी गुंतवू शकते.
मधुश्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली. काहींनी तिला तिचे उत्पन्न किती आहे, असा प्रश्न विचारला, तर काहींना गोव्यात 26,000 रुपयांत घर कसे काय मिळते, याचे आश्चर्य वाटले. विशेषतः 3,000 रुपयांचे पेट्रोल आणि 7,000 रुपयांचे खाणे यावरुन अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले. एका युजरने गमतीने विचारले की, 'किआ' (Kia) सारखी गाडी चालवूनही केवळ 3,000 रुपये पेट्रोलवर खर्च कसा काय होतो? तर दुसऱ्या एकाने म्हटले की, दरवेळी किराणा घेतानाच किमान 1,000 रुपये खर्च होतात, मग 7,000 रुपयांत महिना कसा निघतो? या चर्चेमुळे गोव्यातील महागाई आणि तिथली लाईफस्टाईल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.