ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार, 3 मार्च) ऑस्ट्रेलियाने 172 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने मोलाचा वाटा उचलला.
36 वर्षीय लायनने या सामन्यात पहिल्या डावात 4 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स असे एकूण 10 विकेट्स घेतल्या. इतकेच नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वाधिक 41 धावांची खेळीही त्याने केली होती.
दरम्यान, लायनचे वय लक्षात घेता त्याच्या निवृत्तीच्या चर्चा अधून मधून होत असतात. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने विश्वास व्यक्त केला आहे की लायन 2027 पर्यंतही खेळू शकतो. तसेच त्याने असेही म्हटले आहे की ज्यादिवशी लायन निवृत्ती घेईल, त्यादिवशी तो नेतृत्वही सोडून देईल.
वेलिंग्टन कसोटीनंतर कमिन्स लायनबद्दल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, 'अडथळा केवळ त्याच्या शरिराचाच आहे, त्यामुळे जर त्यानेत्याच्या शरीराकडे नीट लक्ष दिले आणि याची काळजी घेतली की तो साधारण 10 कसोटी सामने किंवा जेवढे होतील, तेवढे प्रत्येक वर्षी खेळेल, तर तो 2027 पर्यंत खेळलेला मला नक्कीच आवडेल. मला वाटत नाही की या प्रकारे ते फार अवघड आहे.'
कमिन्स पुढे म्हणाला, 'मी त्याला आधीच सांगितले आहे की ज्या दिवशी तो निवृत्त होईल, त्यादिवशी मी नक्कीच नेतृत्व सोडून देईल. कारण त्याच्या उपस्थितीने माझं काम बरंच सोपं होतं.'
कमिन्स असेही म्हटले की त्याच्यासारखा खेळाडू हे कर्णधाराचे स्वप्न असते. तसेच कमिन्स म्हणाला की 'क्षेत्ररक्षण लावतानाही मजा येते कारण तुम्हाला माहित असते की तुम्हाला हव्या त्या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवर चेंडू येणार आहे.'
कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाचेही कौतुक केले. तसेच त्याने असेही सांगितले की त्यांच्याकडे विविध योजना सामन्यासाठी तयार होत्या.
त्याबरोबर लायनबाबत तो म्हणाला, 'मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी त्यांचे पहिले षटक टाकल्यानंतर लगेचच लायन माझ्याकडे आला आणि मला विचारत होत की त्याला गोलंदाजी कधी मिळणार आहे. हे शानदार आहे. मला आमच्या संघातील प्रत्येक गोलंदाजामुळे मी लकी असल्यासारखे वाटते. कारण प्रत्येकाला मॅचविनर बनायचे असते.'
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात दुसरा सामना 8 मार्चपासून सुरू होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.