National Pickleball Competition | Goa | Nishad Shevade  Dainik Gomantak
क्रीडा

National Pickleball: फातोर्ड्यात उद्यापासून राष्ट्रीय पिकलबॉल मानांकन स्पर्धा; निषाद शेवडेवर यजमान गोव्याच्या आशा

किशोर पेटकर

National Pickleball Competition in Fatorda: टेबल टेनिस, टेनिसमध्ये यश प्राप्त केलेल्या निषाद शेवडे याने आता पिकलबॉल खेळ चांगलाच आत्मसात केला आहे. या खेळात उल्लेखनीय प्रगती साधताना त्याने हल्लीच मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.

तिसरी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धा गुरुवारपासून (ता. 18) फातोर्डा येथील टेनिस कोर्टवर खेळली जाईल. या स्पर्धेत यजमान गोव्याच्या आशा अर्थातच निषादवरच असतील.

स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देताना गोवा पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले, की ‘‘हा खेळ गोव्यासाठी नवा आहे. या खेळासंदर्भात जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा पातळीवर शालेय शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

आल्तिनो येथे सरकारी अधिकारी संकुलातील बॅडमिंटन कोर्टवर पिकलबॉलसाठी कोर्ट तयार करण्यात आले आहे. कांपाल येथील इनडोअर स्टेडियमबाहेर एक पिकलबॉल कोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

फातोर्ड्यात होणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत राज्यातील 13 ते 14 खेळाडू भाग घेतील.’’ देशातील प्रमुख खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा रविवारपर्यंत (ता. 21) चालेल.

पिकलबॉल खेळात बॅडमिंटन, टेनिस व टेबल टेनिस या तीन खेळांचा अनोखा संगम आहे. गोवा पिकलबॉल असोसिएशतर्फे अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे. आयोजकांना क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचेही सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेस अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू, 2008 साली या खेळास देशात रुजविणारे संस्थापक सचिव सुनील वालावलकर, सध्याचे सचिव चेतन सनिल, खजिनदार निखिल मथुरे यांची उपस्थिती असेल.

भारताचा नामवंत टेनिसपटू अर्जुन पुरस्कार विजेता गौरव नाटेकर स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहील.

‘घरच्या मैदानावर खेळण्याची प्रेरणा’

‘‘राष्ट्रीय पातळीवर मी टेनिस व टेबल टेनिस खेळलो आहे. साधारणतः जानेवारीअखेरीस मी पिकलबॉल खेळाकडे वळतो. या खेळाचे पॅडल सर्वप्रथम हाती घेतल्यानंतर मी हा खेळ खेळण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.

पिकलबॉल खेळाचे निरोगी व्यसन लागले असेच मी म्हणेन. टेबल टेनिस व टेनिसमधील कौशल्यामुळे मी पिकलबॉलही चांगल्या प्रकारे खेळू शकलो, त्यामुळे हा खेळ गांभीर्याने घेतला. हल्लीच मी मुंबईतील अखिल भारतीय पिकलबॉल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.

गोव्यात राष्ट्रीय मानांकन स्पर्धा घेत असल्याबद्दल मी आयोजकांचे कौतुक करतो. घरच्या मैदानावर खेळताना आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहनही मिळेल,’’ असे पिकलबॉल खेळातील कारकिर्दीविषयी निषाद शेवडे याने सांगितले.

या महत्त्वाच्या खेळाडूंवर लक्ष

महाराष्ट्राचा तेजस महाजन व स्नेहल पाटील या सध्याचा आशियाई विजेत्या खेळाडूंसह झारखंडचा सोनूकुमार विश्वकर्मा, महाराष्ट्राची ईशा लखानी, बिहारचा अविनाश कुमार हे एकेरीतील, तर दुहेरीत युवी रुईया, मयूर पाटील, वृषाली ठाकरे, हिमांशू मेहता हे प्रमुख खेळाडू आहेत.

दृष्टिक्षेपात तिसरी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धा

  • 14 वर्षांखालील, 19 वर्षांखालील मुलगे व मुली, पुरुष व महिला, 35 वर्षांवरील, 50 वर्षांखालील वयोगटात एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी सामने

  • देशभरातील १३ पेक्षा जास्त राज्यांतून अडीचशेहून जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित

  • स्पर्धेत एकूण २५ गटात सामने, सकाळ व संध्याकाळ अशा २ सत्रात लढती

  • यापूर्वी 2019 साली पुणे येथे, तर 2021 साली डोंबविली येथे स्पर्धा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT