WPL 2024 Auction: महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी आज, शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत एकूण 165 खेळाडूंचा लिलाव सुरु झाला आहे. या लिलावात दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या शबनिम इस्माईलला मुंबई इंडियन्स (MI) ने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तिने तिची बेस प्राइज 40 लाख रुपये ठेवली होती. ती अलीकडेच महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळताना दिसली होती. ती T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अर्थात आरसीबीनेही शबनिमसाठी बोली लावली. दोन्ही संघ शेवटपर्यंत तिला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु यामध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारत अखेर तिला आपल्या पलटनमध्ये सामील करुन घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या या लोकप्रिय महिला खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने 1 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावली.
दरम्यान, गेल्या मोसमाच्या लिलावात इस्माईलला यूपी वॉरियर्सने (UPW) 1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्या लिलावातही तिची बेस प्राइज 40 लाख रुपय होती. तथापि, WPL 2023 मध्ये, तिला केवळ 3 सामन्यांमध्ये संधी मिळाली, ज्यामध्ये तिने 30.66 च्या सरासरीने आणि 8.76 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 3 बळी घेतले होते. यानंतर, तिला लिलावापूर्वी यूपीने रिलीज केले होते.
दुसरीकडे, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इस्माईल ही चौथी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. आतापर्यंत तिने 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18.62 च्या सरासरीने आणि 5.77 च्या इकॉनॉमी रेटने 123 बळी घेतले आहेत. दरम्यान, तिने दोनदा 5 विकेट्सही घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट (130), पाकिस्तानच्या निदा दार (130) आणि वेस्ट इंडिजच्या अनिशा मोहम्मद (125) यांच्या या फॉरमॅटमध्ये तिच्यापेक्षा जास्त विकेट आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.