MS Dhoni tips to KS Bharat ahead of WTC Final: भारतीय क्रिकेट संघाला 7 जूनपासून पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. द ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी केएस भरत आणि ईशान किशन यांच्यात स्पर्धा आहे.
असे असले तरी भरतला त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अनुभव पाहाता, पहिली पसंती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा अंतिम सामना खेळण्यापूर्वी भरतने आयपीएल 2023 दरम्यान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीकडून इंग्लंडमध्ये यष्टीरक्षण करण्याबद्दल सल्ला घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीशी बोलताना केएस भरत म्हणाला, 'मी नुकतेच आयपीएलदरम्यान, एमएस धोनीशी चर्चा केली. त्याने मला त्याचा इंग्लंडमध्ये यष्टीरक्षणाचा अनुभव सांगितला आहे. तसेच कोणच्याही यष्टीरक्षकासाठी काय महत्त्वाचे ठरू शकते हे देखील सांगितले. तो खूप चांगला संवाद होता. त्यातून मला खूप गोष्टी कळाल्या.'
तसेच भरतने धोनीच्या कोणत्याही परिस्थितीतील जागरुकतेबद्दलही कौतुक केले. तो म्हणाला, 'जागरुकतेबद्दल सांगायचे झाले, तर धोनी यासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे. यष्टीरक्षण करताना त्याची जागरूकता शानदार आहे.'
याशिवाय भरतने यष्टीरक्षणाबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'यष्टीरक्षक होण्यासाठी तुमची इच्छा आणि आवड असावी लागते. कारण यष्टीरक्षण हा थँकलेस जॉब (लक्षात न येणारा) आहे.'
भरत पुढे म्हणाला, 'कसोटीमध्ये एका दिवसात तुम्ही साधारण 90 षटके यष्टीरक्षण करता. तुम्हाला प्रत्येकी चेंडूवेळी लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे तुम्हाला ते आव्हान स्विकारायचे असते आणि संघासाठी योगदान देण्यासाठी तुमची प्रबळ इच्छा असायला हवी.'
दरम्यान, आता केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही हे पाहावे लागणार आहे. त्याने यापूर्वी फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतासाठी यष्टीरक्षण केले होते. त्याने या मालिकेत फलंदाजीत फारशी चमक दाखवली नसली, तरी त्याने चांगले यष्टीरक्षण केले होते.
तसेच भरतने 90 प्रथम श्रेणी सामने त्याच्या कारकिर्दीत खेळले आहेत. यामध्ये त्याने 4808 धावा केल्या असून यात 9 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 303 झेल घेतले असून 36 यष्टीचीत केले आहेत.
त्याचबरोबर त्याच्याबरोबर शर्यत असलेल्या ईशान किशनचीही गेल्या काही महिन्यातील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 स्पर्धेत 16 सामन्यात 454 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत 48 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2985 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.