

पणजी: मध्यमगती गोलंदाज वासुकी कौशिक याने १९व्या षटकात फक्त सहा धावा दिल्या तेव्हा गोव्याला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय खुणावू लागला; पण अखेरच्या षटकातील पाच चेंडूंवर फेलिक्स आलेमाव याने दोन षटकारांसह तब्बल १६ धावा दिल्यामुळे अखेर पराभव ओढवून घ्यावा लागला.
स्पर्धेच्या एलिट ‘ड’ गटातील लढतीत छत्तीसगडने मंगळवारी गोव्याला चार विकेट्स व शेवटचा चेंडू राखून हरविले. कोलकता येथील जादवपूर विद्यापीठ कॅम्पस मैदानावर सामना झाला. गोव्याचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. त्यांच्या खाती सहा लढतींतून फक्त दोन गुण आहेत. त्यांचा गट साखळीतील अखेरचा सामना २६ रोजी गुजरातविरुद्ध होईल. छत्तीसगडने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे सहा लढतीनंतर १४ गुण झाले आहेत.
गोव्याने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर ६ बाद १९७ धावा केल्या. कर्णधार अभिनव तेजराणा (६२, ३३ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार) व ललित यादव (५७, ३६ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) यांनी आक्रमक अर्धशतके नोंदविताना दुसऱ्या विकेटसाठी ५४ चेंडूंतच १०२ धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर गोव्याच्या धावगतीला अपेक्षित वेग मिळाला नाही, त्यामुळे दोनशे धावा पार करणे शक्य झाले नाही.
छत्तीसगडचा अनुभवी फलंदाज सलामीचा अमनदीप खरे याने तुफानी शतक झळकावताना ६२ चेंडूंत नऊ चौकार व सात षटकारांसह ११६ धावा केल्या, तरीही त्यांचा डाव गडगडला. खरे याला वासुकी कौशिकने दीपराज गावकर याच्याकरवी झेलबाद केले. २७ धावांत पाच विकेट गमावल्यामुळे छत्तीसगडची घसरगुंडी उडाली. मात्र, फेलिक्स आलेमाव याची अखेरच्या षटकात दिशा भरकटल्यामुळे गोव्याला विजय शक्य झाला नाही.
संक्षिप्त धावफलक
गोवा : २० षटकांत ६ बाद १०६ (अझान थोटा ५, अभिनव तेजराणा ६२, ललित यादव ५७, सुयश प्रभुदेसाई १४, दीपराज गावकर नाबाद २३, विकास सिंग १४, शिवेंद्र भुजबळ ४, दर्शन मिसाळ नाबाद ६, विजय यादव ३-०-२२-३) पराभूत वि. छत्तीसगड : १९.५ षटकांत ६ बाद १९७ (अमनदीप खरे ११६, देव आदित्य सिंग नाबाद २४, विजय यादव नाबाद १२, फेलिक्स आलेमाव २.५-०-४१-०, वासुकी कौशिक ४-०-३६-२, शुभम तारी ४-०-३९-३, ललित यादव ३-०-२७-१, दर्शन मिसाळ १-०-१२-०, विकास सिंग ३-०-२४-०, दीपराज गावकर २-०-१७-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.