School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

Nature Education: कविश्रेष्ठ ग.दि.माडगुळकरांनी चार भिंतीबाहेरच्या शिक्षणाबद्दल एक कविता रचली आहे.
Nature Education
School Without WallsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मधू य.ना. गावकर

कविश्रेष्ठ ग.दि.माडगुळकरांनी चार भिंतीबाहेरच्या शिक्षणाबद्दल एक कविता रचली आहे. ‘बिनभिंतीची शाळा इथली, लाखो-झाले गुरू, झाडे वेली, पशू, पक्षी, पाखरे यांशी गोष्टी करू’ मात्र, आज घराघरात वृत्तपत्रे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही संच पोहोचल्याने चार भिंतीच्या घरशाळेत काय पहावे, काय ऐकावे, काय करावे हे कळेनासे झाले आहे.

पुराणात श्री दत्त महाराजांचे चोवीस गुरू मानले आहेत. रामायणात वसिष्ठ ऋषी श्रीरामाचे गुरू होते. गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यासांनी श्री गणेशाला महाभारत काव्य सांगून ते लिहून घेतले. ज्ञानेश्‍वरांनी नेवाशाला ज्ञानेश्‍वरी लिहीली. त्यांचे गुरू निवृत्तीनाथ होते. चाणक्य चंद्रगुप्त मौर्याचे गुरू होते, दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. साहित्यात गोपालकृष्ण गोखले महात्मा गांधींचे गुरू होते, श्रीपाद कोल्हटकर राम गणेश गडकरींचे गुरू होते. गडकरी आचार्य अत्रेंचे गुरू, अध्यात्मात रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरू होते.

Nature Education
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

आचार्य विनोबा भावे म्हणत, मी कुणाचा गुरू नाही आणि आपला कोणी शिष्य नाही. मात्र त्यांच्या साहित्यावर आणि विचारांवर प्रेम करणारे अनेक शिष्य होते. त्यात बिन भिंतीच्या शाळेत शिकणारेही होते. निसर्गातील एखादी मुंगीही माणसाची गुरू होऊ शकते, तीची अखंडित धडपड, प्रयत्नवाद, सातत्यता हे गुण माणसाला गुरूस्थानी होऊ शकतात. निसर्ग हो सर्वच जीवांचा मोठा गुरू आहे, त्याच्या आकाशाची विशालता, समुद्राची खोली, चांदण्याची शीतलता, सूर्याची प्रखरता, वाऱ्याची मंद झुळूक, पाण्याचा थंडावा, वृक्षांची छाया, डोंगराची स्थितप्रज्ञता, नद्यांचा प्रवाह, झऱ्याची झुळझूळ आणि एखाद्या बोडक्या माळरानात एकाकी उभा असलेला वृक्ष, हे सारे माणसांचे गुरू आहेत.

अबोल वृक्ष साऱ्या जीवांना सावली फुले फळे, काष्ठ आणि औषध देतो. पण तो आपणासाठी काहीच मागत नाही, बिन भिंतीच्या निसर्गाच्या शाळेत मन एकाग्र ठेवावे लागते. आषाढी एकाद‌शीला वारकऱ्यांची पावले शिस्तीने पंढरीची वाट धरतात. आचार्य विनोबांची आई निरक्षर होती, तरी तिला शेकडो अभंग आणि ओव्या तोंडपाठ होत्या. हे तिच्या एकाग्रतेमुळे, निसर्गाचे शिक्षण शास्त्र, आकलनकौशल्य, श्रवणकौशल्य, भाषणकौशल्य, संभाषण कौशल्य, वाचन, लेखन कौशल्य, याला जसे आपण महत्त्व देतो, तशाच प्रकारे पाठांतर आणि स्मरणकौशल्यालाही महत्त्व देणे गरजेचे आहे. माणसाची स्मरणशक्ती ही अध्यापनाचा महत्वाचा भाग आहे, चार भिंतीच्या शाळेमध्ये जे शिकवतात त्याला आपण शिक्षण म्हणत असलो, तरी शाळेच्या बाहेर माणूस सतत शिकत असतो.

कुटुंब, समाज, झाडे, वेली, प‌क्षी, जनावर, पाऊस‌पाणी, वारा,ढग, आकाश, सूर्य-चंद्र, तारे, नक्षत्र, दिवस-रात्र हा सारा निसर्ग माणसाला सतत शिकवत असतो. आपल्या देशात अनेक भाषा निर्माण झाल्या, त्या भाषांत आपण बोलू लागलो, प्रत्येक भाषेची लिपी आहे, ला लिपीतून शब्दज्ञान, अर्थज्ञान विकसित झाले, ते ज्ञान ग्रंथबद्ध करुन त्यातून साहित्य, कला, उद्योग, कृषी, स्थापत्य, पर्यावरण, निसर्गोपचार, औषधे अशा विविध शाखांतील ज्ञान मिळवून माणसाने आपले भवितव्य समृद्ध केले. पूर्वकाळी आजच्या सारखा शिक्षणाचा प्रसार नव्हता, तेव्हा मर्यादित लोक शिक्षण घेत होते, संस्कृत पाठशाळेत देव भाषेत शिक्षण मिळे. पाठांतराने ज्याचा उच्चार सारखा येई, त्याला हुशार समजले जाई.

बहुजन समाज शिक्षणास वंचित राहिल्याने तो कष्टाची कामे करी. दिवसभर काम करून थकल्याने रात्री चौकी, मंदिरात जाऊन रेंगाळत असले तरी, तिथे त्यांना कथा, कीर्तन, प्रवचनाने महाभारत रामायणातील राम, कृष्ण, पांडव, कौरव, रावण, ऋषी, हनुमान, सीता, रुक्मिणी, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सत्यभामा यांच्या चरीत्रातल्या गोष्टी समजत असत, त्या काळी ऐकयारा श्रोतृवर्ग देवावर श्रद्धा ठेवणारा होता, त्यातून कथा कीर्तनकारांचा समाज निर्माण झाला. ते गावागावांत वारा, कथा कीर्तने सांगण्यास जाऊ लागले, श्रोत्यांचे मनोरंजन होऊ लागले, त्यांना नैतिक शिक्षण मिळू लागले. त्यातून वाणीवर्तनाचे संस्कार लोकांवर होण्यास मदत झाली.

Nature Education
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

त्याकाळी राज्य करणारे राजे, महाराजे जनतेच्या पारंपरिक शिक्षणाची जबाबदारी घेत नसल्याने लोकांना धार्मिक शिक्षण मिळू लागले, लिहिता वाचता न येणाऱ्या माणसांना दत्तमहात्म्य, रामायण, महाभारत, सत्यविजय, हरीविजय, कथासारातील अध्याय ओव्या तोंडपाठ होऊ‌ लागल्या. मात्र, पारतंत्र्यात कथा-कीर्तने करून कार्यभाग साधणारा नव्हता. देश स्वतंत्र होण्यासाठी समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे होते. जनतेला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय देश स्वतंत्र होणे शक्य नव्हते, त्याकाळी एक अभ्यासू शिक्षित वर्ग उदयास आला. त्यातून राष्ट्रीय शिक्षणाची कास धरली आणि शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या.

उत्सवाच्या काळात मेळे भरवून त्या मेळ्यांतून जनजागृती करू लाग‌ले. राष्ट्रगीते, पोवाडे, लोकगीते, व्याख्यानांतून लोक ज्ञान मिळवून शहाणे होऊ लागले. वक्ते सभांमध्ये बोलताना लोक शांतपणे ऐकू लागले. नंतर त्यांनी हळूहळू मासिके, वृत्तपत्रे, साप्ताहिके काढण्यास सुरवात केली. चांगली माणसे गावागावात जाऊन व्याख्याने देऊ लागली, त्यातून हळूहळू बहुजन समाज शहाणा होऊ लागला. व्याख्याने, कीर्तने, लोकगीते, पोवाडे, ओव्या हे शिक्षण म्हणजे भिंती नसलेल्या शाळा होत्या. हे मुक्त शिक्षण प्रथम गाडगे बाबांनी दिले. निसर्गाकडे डोळसपणे पाहणे म्हणजे बरेच मोठे शिक्षण आहे. ग.दि.माडगुळकरांनी चार भिंती बाहेरच्या शिक्षणाबद्दल एक कविता रचली आहे.

‘बिन भिंतीची शाळा इथली, लाखो-झाले गुरू, झाडे वेली, पशू, पक्षी, पाखरे यांशी गोष्टी करू’ मात्र, आज घराघरात वृत्तपत्रे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही संच पोहचल्याने चार भिंतीच्या घरशाळेत काय पहावे, काय ऐकावे, काय करावे हे कळेनासे झाले आहे. त्यामुळे उत्सव, कीर्तन, नाटक, व्याख्यान अशा बिन भिंतीच्या शाळेतल्या कार्यक्रमांना लोक फारसे जात नाहीत. शेजारी, शेजारी एकमेकांशी बोलणे बंद होत चालले आहे.

Nature Education
Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

परिणामी माणसांच्या विचारांची देवाण घेवाण कमी होत चालली आहे, अशाने बिन भिंतीच्या शाळेचे काम काम बंद पडत चालले आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी-महाराज संत तुकारामाच्या किर्तनाला जाऊन बसले होते, हे इतिहास सांगतो, पंढरपूरचे देऊळ हरीजनांसाठी खुले करावे म्हणून साने गुरूजींनी गावागावांत दौरे करून व्याख्याने दिली, हा सारा बिनभिंतीच्या शाळेचा प्रताप आहे. अशा बिनभिंतीच्या शाळेमधून नव्या पिढीला शिक्षण मिळाल्यास समाजात एकोपा टिकेल आणि देश एकसंध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.