Lohan-Dre Pretorius Highest T20 Score Record: टी20 क्रिकेटच्या विश्वात तब्बल 13 वर्षांपासून अजेय असलेला वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा रेकॉर्ड अखेर मोडला गेला. आयपीएलमध्ये 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळताना गेलने नाबाद 175 धावांची तूफानी खेळी खेळत टी20 इतिहासातील सर्वोच्च व्यक्तिगत धावसंखेचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अत्यंत कठीण मानले जात होते. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेचा (South Afirca) युवा आणि प्रतिभावान खेळाडू लुहान ड्री प्रिटोरियसने हा मोठा विक्रम धुळीस मिळवत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. सीएसए टी20 चॅलेंज स्पर्धेत प्रिटोरियसने ही चमकदार कामगिरी करत नवा इतिहास रचला.
2 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सीएसए टी20 चॅलेंजच्या सामन्यात टायटन्स आणि नाइट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लुहान ड्री प्रिटोरियसने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 79 चेंडूंमध्ये नाबाद 188 धावांची ताबडतोब खेळी खेळली आणि गेलचा 13 वर्षांनंतरचा विक्रम मोडून काढला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात आता तो सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर करणारा फलंदाज बनला. या आक्रमक खेळीदरम्यान त्याने तब्बल 15 चौकार आणि 13 गगनचुंबी षटकार लगावले.
विशेष म्हणजे, प्रिटोरियसने अवघ्या 40 चेंडूंमध्येच आपले शतक पूर्ण केले. आपल्या खेळीमधील 73 वा चेंडू चौकार मारत त्याने हा जागतिक विक्रम नावावर केला. प्रिटोरियसच्या या विध्वंसक फलंदाजीच्या जोरावर टायटन्स संघाने 20 षटकांत 3 बाद 267 धावांचा डोंगर उभा केला. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना नाइट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आणि संपूर्ण संघ 17.2 षटकांत केवळ 143 धावांवर ऑलआउट झाला.
अवघ्या 20 वर्षांचा असलेला लुहान ड्री प्रिटोरियस हा दक्षिण आफ्रिकेचा उदयोमुख आणि अत्यंत वेगवान खेळाडू मानला जातो. त्याला आफ्रिकन क्रिकेटचे भविष्य म्हटले जाते. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले पदार्पण केले. आफ्रिकेसाठी खेळताना त्याने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांत 1 शतकाच्या मदतीने 235 धावा केल्या. याशिवाय, 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये 142 धावा त्याच्या नावावर आहेत, तर 17 टी20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर त्याने 427 धावा केल्या.
ख्रिस गेलसारख्या महान फलंदाजाचा विक्रम मोडत प्रिटोरियसने आपण भविष्यात किती लांबचा पल्ला गाठणार आहोत, याची झलक दाखवली. त्याची ही नाबाद 188 धावांची ऐतिहासिक खेळी आता क्रीडा जगताच्या सुवर्णपानांवर नेहमीसाठी कोरली गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.