

Prince William Kate Middleton Mumbai Visit: ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर असून मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे त्यांचा एक अत्यंत खास अंदाज पाहायला मिळाला. सोमवारी (16 नोव्हेंबर) या शाही दाम्पत्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्यासोबत मुंबईच्या पारंपरिक 'कुल्हड' चहाचा आस्वाद घेतला आणि शालेय मुलांसोबत 'गली क्रिकेट' खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
बॅलार्ड इस्टेट येथील भेटीदरम्यान प्रिन्स विल्यम, केट मिडलटन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात क्रिकेटवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या. सचिनने या शाही दाम्पत्याला क्रिकेटमधील बारकावे समजावून सांगितले. यानंतर प्रिन्स विल्यम यांनी हातात बॅट घेत विद्यार्थ्यांसोबत गली क्रिकेटच्या मैत्रीपूर्ण सामन्यात सहभाग घेतला. फलंदाजीपूर्वी सचिनने प्रिन्सला काही खास टिप्सही दिल्या, तर प्रिन्सेस केट यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रोत्साहन दिले. तिघांनीही आळीपाळीने फलंदाजी केल्याने परिसरात अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रिन्स विल्यम यांची भेट झाल्याचा आनंद सचिनने माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी प्रिन्स विल्यम यांनी पांढरा शर्ट आणि नेव्ही-ब्लू रंगाचे नेहरु जॅकेट परिधान केले होते, तर केट मिडलटन लाइम-ग्रीन रंगाच्या ब्लेझर आणि पँटमध्ये अत्यंत आकर्षक दिसत होत्या. विशेष उभारलेल्या स्टॉलवर मनोज नावाच्या स्थानिक विक्रेत्याने त्यांना मातीच्या कुल्हडमध्ये गरमागरम चहा दिला. शाही दाम्पत्याने चहाच्या चवीचे भरभरुन कौतुक केले आणि सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) प्रत्यक्ष भेटण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मनोज यांनी व्यक्त केली. यंदाच्या 'अर्थशॉट प्राईज' सोहळ्यानिमित्त हे शाही दाम्पत्य भारत दौऱ्यावर आले असून, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील भारताच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.