

मोरजी: पार्से येथील खाजण गुंडो बांधाला पर्यटनस्थळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्यात आमदार जीत आरोलकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. आरोलकर यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक करताना, आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही २०२७ मध्ये पुन्हा सरकार स्थापन होईल आणि आरोलकर मांद्रेतून पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
मांद्रे (Mandrem) उदरगत संस्थेतर्फे पार्से येथील खाजण गुंडो बांधावर आयोजित तीन दिवसीय दीपोत्सवाच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. आरोलकर यांनी या परिसराचा पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकास करून स्थानिक तसेच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा उपक्रमांमुळे या परिसराला नवी ओळख मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार जीत आरोलकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, मगो नेते तथा मिशन फॉर लोकलचे संस्थापक राजन कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्या राधिका पालयेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ नानू हरमलकर, तुयेच्या सरपंच अमिता साळगावकर, पार्सेचे सरपंच मधुसूदन सातार्डेकर, मांद्रेचे सरपंच किरण सावंत, आयोजन समितीचे अध्यक्ष अजित मोरजकर, पंच सदस्य राजेश मांद्रेकर, दयानंद मांद्रेकर, गुणाजी ठाकूर यांच्यासह विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांद्रे उदरगत संस्थेच्या माध्यमातून आयोजित दीपोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे, पारंपरिक कलांचे संवर्धन करणे आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गौरव सोहळ्यांमुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे मांद्रे मतदारसंघातील विकासकामांना चालना मिळाली आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असून, यापुढेही विकासकामांना गती देण्याबरोबरच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे आरोलकर यांनी स्पष्ट केले. मांद्रे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने यापुढेही सहकार्य आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दीपोत्सवाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पारंपरिक कुणबी शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सलग तीन दिवस चाललेल्या दीपोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि कलाकारांच्या सादरीकरणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.