Lionel Messi Messi Consoles FC Cincinnati's Luciano Acosta's Son:
लिओनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली इंटर मियामी संघाने दुसरा अंतिम सामना गाठला आहे. बुधवारी रात्री इंटर मियामीने युएस ओपन कपच्या उपांत्य फेरीत एफसी सिनसिनाटीचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दरम्यान उपांत्य सामन्यानंतर मेस्सीच्या एका कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
चार दिवसांपूर्वीच मेस्सीच्या नेतृत्वाखाली इंटर मियामीने लीग कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आता लगेचच इंटर मियामीने युएस ओपन कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
दरम्यान, मेस्सी इंटर मियामीकडून पहिल्यांदाच गोल करण्यात अपयशी ठरला. पण सिनसिनाटी विरुद्ध त्याने दोन महत्त्वाचे असिस्ट केले. मात्र, हा सामना निर्धारित वेळेनंतर 3-3 अशी बरोबरी झाली होती. पण पेनल्टी शुटआऊटमध्ये मियामीने 5-4 अशा गोलफरकाने विजय मिळवला. पेनल्टी शुटआऊटमध्ये मेस्सीने शानदार गोल नोंदवला होता.
या उपांत्य सामन्यानंतर मेस्सीने त्याचा अर्जेंटिना संघातील साथिदार आणि सिनसिनाटीचा कर्णधार लुसियानो एकोस्टाबरोबर जर्सी बदलली. तसेच त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना गळाभेटही दिली.
यावेळी मिडफिल्डर अकोस्टाचा मुलगा सिनसिनाटीच्या पराभवामुळे निराश दिसत होता. त्याला निराश पाहून मेस्सीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मेस्सीचे याबद्दल कौतुकही होत आहे.
दरम्यान, उपांत्य सामन्यात अकोस्टाने 18 व्या मिनिटालाच गोल करत सिनसिनाटीला आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी ब्रेंडन वॅझक्वेझने 53 व्या मिनिटाला 2-0 अशी वाढवली. पण त्यानंतर लिओनार्डो कॅम्पानाने मेस्सीच्या असिस्टवर 68 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला.
त्यानंतर कॅम्पानाने भरपाईवेळेत मियामीसाठी दुसरा गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये खेळवण्यात आला. 93 व्या मिनिटाला जोसेफ मार्टिनेझने मियामीसाठी तिसरा गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली.
पण युवा कुबोने 114 व्या मिनिटाला सिनसिनाटीला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामन्यात पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले, ज्यात मियामीने 5-4 असा विजय मिळवला.
आता मियामीचा अंतिम सामना हुस्टन डायनामोविरुद्ध 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.