Jamshedpur FC Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: जमशेदपूर विजयासह दुसऱ्या स्थानी

जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) त्याचा पूरेपूर लाभ उठवत सामना 1-0 फरकाने जिंकला आणि गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले.

किशोर पेटकर

पणजी: एफसी गोवा संघाला आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत चुका खूपच महागात पडल्या आहेत. शुक्रवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) त्याचा पूरेपूर लाभ उठवत सामना 1-0 फरकाने जिंकला आणि गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले. (Jamshedpur FC Defeated FC Goa In The Indian Super League Football Tournament)

सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. ईस्ट बंगालकडून जानेवारीतील संघ बदल प्रक्रियेत जमशेदपूर एफसी संघात दाखल झालेल्या नायजेरियन डॅनियल चिमा चुक्वू याने केलेला गोल निर्णायक ठरला. यावेळी तो ऑफसाईड ठरण्यापासून बचावला. जमशेदपूरने 49 व्या मिनिटास आघाडी घेतल्यानंतर एफसी गोवास पिछाडी भेदता आली नाही. त्यास सदोष नेमबाजीही कारणीभूत ठरली. त्याचे फटके गोलपट्टीसही आपटले.

ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसीचा हा सलग तिसरा, तर एकंदरीत सहावा विजय ठरला. त्यांचे आता 12 सामन्यांतून 22 गुण झाले असून अव्वल स्थानावरील हैदराबाद एफसीच्या तुलनेत ते एका गुणाने मागे आहेत. एफसी गोवा संघाला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यांचे 14 लढतीनंतर 14 गुण आणि नववा क्रमांक कायम राहिला. डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता सलग चार सामने विजयाविना आहे. या कालावधीत त्यांनी दोन सामने गमावले, तर दोन बरोबरी नोंदविल्या.

जमशेदपूरला आघाडी

एफसी गोवास (FC Goa) पुन्हा एकदा बचावफळीतील चूक महागात पडली. गोलरक्षक नवीन कुमार याला थेट फटका अडविता आला नाही, त्यामुळे जमशेदपूरने विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटास आघाडी घेतली. लाल्डिन्लियाना रेंथलेई याच्या असिस्टवर डॅनियल चिमा चुक्वू याने चेंडूसह जोरदार धाव घेतली. एफसी गोवाच्या बचावपटूस मागे टाकत नायजेरियन आघाडीपटूने ताकदवान फटका मारला. यावेळी गोलरक्षक नवीनला चेंडू अडविणे शक्य होते, पण ते जमले नाही. तीस वर्षीय डॅनियलचा हा आयएसएलमधील तिसरा गोल ठरला. अगोदरचे दहा सामने तो ईस्ट बंगालतर्फे खेळला व दोन गोल केले. शुक्रवारी जमशेदपूरतर्फे पहिलाच सामना खेळताना त्याने अचूक नेम साधला.

रेहेनेशचे दक्ष गोलरक्षण

पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकपूर्वी एफसी गोवास आघाडी घेण्याची सुरेख संधी होती, पण जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याच्या दक्षतेमुळे साधली गेली नाही. कॉर्नर फटक्यावर इव्हान गोन्झालेझचा फटका गोलपट्टीस आपटून एदू बेदिया याच्याकडे गेला. एफसी गोवाच्या कर्णधाराने मारलेल्या फटक्यावर गोलरक्षकाने ऐनवेळी उजव्या पायाने चेंडूची दिशा बदलली आणि संघावरील संकट टाळले. पूर्वार्धात एफसी गोवाचा भर आक्रमणावर होता, तर जमशेदपूरला बचावावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागले. रेहेनेश सामन्याचा मानकरी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT