Sunrisers Hyderabad part ways with Brian Lara and appointed New head coach:
इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सिजनला अद्याप सुरुवात होण्यासाठी अद्याप 9 ते 10 महिन्यांचा कालावधी आहे. पण सध्या आयपीएल संघांमध्ये सपोर्ट स्टाफ बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबादने नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडिजचे दिग्गज प्रशिक्षक ब्रायन लारा यांच्याबरोबरील मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपवला आहे. त्यांच्या जागेवर आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिएल विट्टोरीची निवड केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने लारा यांचे आभार मानणारे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये लिहिसे आहे की 'आमचा 2 वर्षांचा ब्रायन लारा यांच्याबरोबरचा प्रवास संपला आहे. आम्ही अलविदा म्हणत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो. आम्ही तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.'
लारा गेल्या दोन वर्षापासून हैदराबाद संघाबरोबर होते. तसेच आयपीएल 2023 आधी त्यांनी मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले होते. पण आता त्यांचा करार संपला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2023 स्पर्धेत हैदराबादला खास कामगिरी करता आली नव्हती. हैदराबाद संघ या सिजनमध्ये 10 संघांच्या गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर राहिला होता. हैदराबाद संघाला 14 पैकी केवळ चार सामने जिंकता आले होते.
हैदराबादने नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केल्याबद्दल ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की 'किवी दिग्गज डॅनिएल विट्टोरी मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑरेंज आर्मीशी (सनरायझर्स हैदराबाद) जोडले आहेत. तुमचे स्वागत आहे.'
44 वर्षीय विट्टोरी यांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यांनी 2014 ते 2018 या दरम्यान बेंगलोरचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. तसेच त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. तसेच विट्टोरी बेंगलोरचा माजी कर्णधार राहिला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हैदराबादआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघानेही झिम्बाब्वेचे दिग्गज क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघाने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.