KL Rahul Catch: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने अखेरच्या षटकात २ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात लखनऊला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कर्णधार केएल राहुलने घेतलेल्या एका अप्रतिम झेलाने सर्वांचीच वाहवा मिळवली.
या सामन्यात लखनऊने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाब संघ करत असताना 16 व्या षटकात केएल राहुलने हा झेल घेतला. झाले असे की 16 व्या षटकात सिकंदर रझा आणि जितेश शर्मा फलंदाजी करत होते, तर मार्क वूड गोलंदाजी करत होता.
मार्क वूडने या षटकातील टाकलेल्या पाचव्या चेंडूवर जितेशने ड्राईव्हचा फटका मारला. पण त्यावेळी मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या केएल राहुलने चपळाई दाखवली. वेगाने येत असलेला चेंडू त्याने थोडे पुढे पळत जाऊन आणि हवेत सूर मारत दोन्ही हातांनी पकडला.
त्याच्या या सुरेख झेलामुळे जितेशला 2 धावांवरच माघारी जावे लागले. पण राहुलने घेतलेल्या या झेलाचे अनेकांकडून कौतुक झाला. त्याच्या झेलाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, या सामन्यात केएल राहुलने फलंदाजीतही चमक दाखवली. त्याने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या होत्या. पंबाजकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19.3 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केला. पंजाबकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अखेरीस शाहरुख खानने 10 चेंडूत नाबाद 23 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. लखनऊकडून युधवीर चहर, रवी बिश्नोई आणि मार्क वूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.