इंडियन प्रीमियर लीग 2021 ला अखेर चेन्नई सुपरकिंग्सच्या रुपात चॅम्पियन मिळाला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्स चेन्नईने दिलेले लक्ष्य गाठू शकला नाही. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस ठरला, ज्याने 59 चेंडूत 86 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने 20 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. गायकवाडने 32 आणि उथप्पाने 31 धावा केल्या.
शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकाता नाईट रायडर्सची शानदार सुरुवात केली. दोघांनी 64 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. गिलने 51 आणि व्यंकटेशने 50 धावा केल्या, परंतु हे दोघे बाद झाल्यावर कोलकाताची मधली फळी कोलमडली. नितीश राणा 0, सुनील नारायण 2, दिनेश कार्तिक 9 धावा काढून बाद झाले. राहुल त्रिपाठीने 2 रन केल्या दुसरीकडे मात्र शाकिब अल हसनला खातेही उघडता आले नाही. कर्णधार इऑन मॉर्गनलाही केवळ 4 धावा करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा चॅम्पियन
चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. चेन्नईने 2010, 2011 मध्ये विजेतेपद पटकावले. यानंतर, चेन्नई सुपर किंग्स 2018 मध्ये चॅम्पियन बनला. आता पुन्हा एकदा चेन्नईने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. चेन्नईचा हा विजय अतिशय महत्त्वाचा असून धोनी अँड कंपनी गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये पात्र होऊ शकली नव्हती. मात्र या मोसमात त्यांनी जोरदार कमबॅक केले.
फलंदाजांनी चेन्नईच्या विजयाची पायाभरणी केली
चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक गमावल्यानंतर संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने संघासाठी शानदार सुरुवात केली. दोघांनी 8.1 षटकांत 61 धावा ठोकल्या. गायकवाडने 27 चेंडूत 32 धावा केल्या. गायकवाड बाद झाल्यानंतर रॉबिन उथप्पाने कोलकाताच्या गोलंदाजांवर पलटवार केला. त्याने फक्त 15 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. त्याने डु प्लेसिससोबत 63 धावांची भागीदारी केली. सरतेशेवटी, डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मोईन अलीने 20 चेंडूत 37 धावा आणि डु प्लेसिसनेही 86 धावा केल्या. डू प्लेसिस डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.