Indian Cricketers BCCI fitness and medical tests:
भारतीय क्रिकेट संघासमोरील आगामी काळ कसोटीचा असणार आहे. भारताला आगामी ३ महिन्यात आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप अशा महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत.
दरम्यान, वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याच्या शर्यतीत असणाऱ्या खेळाडूंना आता बीसीसीआयच्या फिटनेस आणि मेडिकल टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.
खरेतर बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून किंवा बीसीसीआयचे मेडिकल टीमकडून नियमितपणे अशा टेस्ट घेतल्या जातात. पण आगामी मोठ्या स्पर्धांच्या दृष्टीने यंदा या टेस्ट महत्त्वाच्या ठरणार आहेत.
बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की 'आयर्लंड दौऱ्यात खेळणाऱ्या खेळाडूंना वगळता सर् खेळाडूंची नियमित फिटनेस टेस्ट केली जाणार आहे, यात रक्त चाचणीचाही समावेश आहे.'
वर्ल्डकपसाठी शर्यतीत असणारे जसप्रीत बुमाराह, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन हे नुकत्याच संपलेल्या आयर्लंड दौऱ्याचा भाग होते.
दरम्यान, बीसीसीआयच्या या टेस्टमधून रक्तातील साखर, युरिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ आणि डी, तसेच क्रिएटिनिन आणि टेस्टोस्टेरॉन या गोष्टीही तपासल्या जातील.
इतकेच नाही, तर बीसीसीआयने जानेवारीमध्ये संघनिवडीसंबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यावेळी बीसीसीआयने पुन्हा यो-यो टेस्टला संघ निवडीचा भाग बनवले होते. तसेच त्याच्या जोडीला डेक्सा टेस्टही संघनिवडीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले होते.
डेक्सा टेस्टचा वापर खेळाडूंच्या शरीरातील फॅटची टक्केवारी, स्नायूंचे वजन, पाण्याचे प्रमाण आणि हाडांचे वजन (bone density) तपासण्यासाठी होतो.
त्यामुळे भारतीय खेळाडूंची यावेळी डेक्सा टेस्टही घेतली जाणार आहे. एका सुत्राने सांगितले की 'हे काही नवीन नाही. मालिकांच्या दरम्यान खेळाडू विश्रांतीवर असताना अशा टेस्ट होत असतात. त्यांना त्यांच्या शरिरानुसार वैयक्तिक डाएट चार्ट दिलेला असतो आणि ट्रेनिंग मॉड्युलही सांगितलेले असते.'
दरम्यान, आशिया चषक 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार असून साखळी फेरीत भारताचा २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे, तर 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध सामना होणार आहे. हे दोन्ही सामने श्रीलंकेत होणार आहेत.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या स्पर्धेपूर्वी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा कॅम्प लागलेला आहे. त्यामुळे आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू बंगळुरूला जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याबरोबरच अनेक खेळाडू बंगळुरूला पोहचले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.