Rohit Sharma - Rahul Dravid Dainik Gomantak
क्रीडा

विंडिजविरुद्ध पराभव : World Cup 2023 तोंडावर आलेला असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारे 3 फॅक्टर

India Cricket Team: वर्ल्डकप तोंडावर असताना अनेक मोठे प्रश्न भारतासमोर उभे राहिले, ज्याची उत्तरे शोधण्याची घाई करावी लागणार आहे.

Pranali Kodre

Team India need to find answers to some questions before ICC cricket World Cup 2023:

भारतीय संघ क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पूर्ण वर्चस्व राखेल अशीच अपेक्षा अनेक क्रिकेट चाहत्यांना होती. कसोटी मालिकेत ही अपेक्षा खरीही ठरली. मात्र, वनडे आणि टी२० मालिकेत काही त्रुटी सहज समोर आल्या. खरंतर या समस्या वर्ल्डकप तोंडावर असताना समोर येणं भारतीय संघासाठी घातकीच ठरू शकतं.

भारताने वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली हे खरं असलं, तरी भारताने वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व राखलं होतं, असं नव्हतं. त्यानंतरही टी२० मालिकेत, तर भारताची सुरुवात दोन सामन्यातील पराभवाने झाली. त्यामुळे भारताच्या वर्ल्डकप तयारीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघाला १ महिन्याची विश्रांती मिळाली होती. या विश्रांतीनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यापासून भारतीय संघाचा नवा सिजन सुरु झाला.

याबरोबरच असंही सांगितलं गेलं की याच दौऱ्यापासून भारतीय संघ अगदी दोन महिन्यावर आलेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील तयारी सुरु करेल. पण याच दौऱ्यात अनेक मोठे प्रश्न भारतासमोर उभे राहिले, ज्याची उत्तरे शोधण्याची घाई बीसीसीआयला घाई करावी लागणार आहे.

Rohit Sharma | Suryakumar Yadav | Rahul Dravid | India vs Australia

प्रयोग कधी थांबणार?

वनडे वर्ल्डकपला ६० दिवसांपेक्षाही आता कमी कालवधी उरला आहे. त्याआधी भारतीय संघ महत्त्वाची आशिया चषक स्पर्धा खेळणार आहे. याचवेळी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारताचाच दुसरा संघ ज्यात युवा खेळाडूंचा समावेश आहे, तो संघ चीन एशियन गेम्स खेळणार आहे. अशा स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघाचे प्रयोग अद्याप थांबलेले दिसत नाहीत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपासून भारतीय संघ वर्ल्डकपच्या तयारीला सुरुवात करणार असल्याचे म्हटले गेले, मात्र चित्र काहीसे वेगळेच दिसले. जरी वेस्ट इंडिज संघ बलाढ्य नसला, तरी आपण वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करत असू, तर संघाने पूर्ण क्षमतेने खेळणे गरजेचे होते. पण पहिल्याच वनडेत रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, तर विराट फलंदाजीलाच आला नाही. युजवेंद्र चहलला संपूर्ण मालिकेत खेळवलेच गेले नाही.

रोहित-विराट यांनाही दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली. त्यापूर्वी मोहम्मद सिराज कसोटी मालिकेनंतर दुखापतीमुळे परत मायदेशी परतला होता. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी रोहित आणि विराट यांचा समावेश नव्हता. तसेच आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठीही विराट-रोहितचा समावेश नाही.

म्हणजेच ते १ ऑगस्टला वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर थेट आशिया चषकात खेळणार होते, असे असताना त्यांना विश्रांती का देण्यात आली? इतकेच नाही, तर सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शुभमन गिल या वर्ल्डकपमध्ये निवड होण्याची शक्यता असणाऱ्या खेळाडूचे फॉर्म अद्याप त्यांना सापडलेले नाहीत. टी२० मालिकेतही हे खेळाडू पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजीत अपयशी ठरले.

दुसऱ्या वनडेत अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना त्याला गोलंदाजी देण्यातच आली नाही. जर तो गोलंदाजी करू शकणार नव्हता, तर त्याच्याऐवजी एक पूर्णवेळ फलंदाज संघात खेळू शकणार नव्हता का?

भारतीय संघाटी १ जानेवारी २०२१ पासूनची आकडेवारी
Team India Stats
  • माजी खेळाडूंकडूनही टीका

दुसऱ्याच टी२० सामन्याबद्दल वेंकटेश प्रसादने आणखी एक भारतीय संघाची चूक पकडली. ती चूक म्हणजे १६ व्या षटकात युजवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतलेल्या असतानाही पुन्हा त्याला गोलंदाजी देण्यातच आली नाही. हीच गोष्ट इरफान पठाणनेही अधोरेखीत केली.

यापूर्वीही प्रसादने भारताच्या वनडे आणि टी२० क्रिकेटमधील साधारण कामगिरीवर टीका केली होती. त्याने भारतीय संघाच्या दृष्टीकोनात समस्या असल्याचे स्पष्ट मत मांडले होते. तसेच त्याने असेही म्हटले होते, 'भारतीय संघ इंग्लंडप्रमाणे रोमांचक संघही नाही किंवा पूर्वीच्या ऑस्ट्रेलियासारखा घातकही नाही.'

तसेच यापूर्वी सुनील गावसकर यांनीही भारतीय खेळाडूंना सातत्याने दिल्या जाणाऱ्या विश्रांतीबद्दल प्रतिक्रिया दिली होती की 'तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात फिट संघ समजता किंवा आधीच्या पिढीपेक्षा अधिक फिट आहे असे सांगता, तर मग इतक्या लवकर ब्रेकडाऊन कसा होतो? जेव्हा तुम्ही 20 षटकांचा सामना खेळता, तेव्हा तुम्हाला वर्कलोडची समस्या कशी होते?'

  • संघ निश्चित कधी होणार?

वर्ल्डकप ऐन तोंडावर असताना अद्यापही संघ निश्चित नाही. एकिकडे ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपसाठी प्राथमिक संघ जाहीर केला आहे, दुसरीकडे भारतात आपल्याच देशात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी अद्याप संभाव्य संघातही कोणाला संधी मिळणार हे निश्चित नाही.

विराट, रोहित, गिल, इशान, जडेजा, कुलदीप, चहल, सिराज, शमी असे काही खेळाडू सोडल्यास अद्यापही संघात आणखी कोणते खेळाडू खेळू शकतात, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे दुखापती.

Rohit Sharma, Jasprit Bumrah

दुखापतग्रस्त खेळाडूंचं काय?

भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा हे गेल्या काही महिन्यांपासून संघातून दूर आहेत. यातील किती खेळाडू वर्ल्डकपपर्यंत पुनरागमन करणार आहेत आणि कधी पुनरागमन करणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे.

तसेच दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना थेट वर्ल्डकपमध्ये खेळवले जाणार का? बुमराहसह पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्डकपपूर्वी किती मॅच प्रॅक्टिस मिळणार असे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनाने गेल्या ४-५ वर्षांपासून समस्या ठरणाऱ्या चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार का? की सूर्यकुमारवरच विश्वास ठेवला जाणार, हा देखील प्रश्न आहे. असे असेल, तर सूर्यकुमारचा वनडेतील फॉर्मही चिंता वाढवणारा आहे, त्याबद्दल काय करायचं?

Rohit & Virat

विराट-रोहितवर किती दिवस अवलंबून राहणार?

वेस्ट इंडिजविरुद्ध विराट आणि रोहित यांच्याशिवाय भारतीय संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. भारताकडे पर्यायी अनेक खेळाडू उपलब्ध आहेत अशी चर्चा खूप आहे. अनेक युवा खेळाडू भारतासाठी खेळण्यासाठी तयार आहेत.

मात्र असे असले, तरी भारतीय संघ काही अनुभवी खेळाडूंवरच अवलंबून आहे. संघ विराट, रोहित, केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या अशा काही मोजक्या खेळाडूंवर अवलंबून आहे.

यांच्याशिवाय खेळताना नवीन भारतीय संघ/खेळाडू संघर्षच करताना दिसत आहेत. अशात भविष्यासाठीच्या योजनेबाबत संघात सातत्य आणि हळुहळू परिवर्तन हाच सध्याच्या दृष्टीने चांगला सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT