WTC 2023 Final, Opinion: खरी चूक रोहित शर्माची की...?

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमधील भारताच्या पराभवासाठी रोहितला जबाबदार धरणे योग्य आहे की नाही?
WTC 2023 Final
WTC 2023 FinalDainik Gomantak
Published on
Updated on

WTC 2023 Final, Opinion: भारतीय क्रिकेट संघ रविवारी (11 जून) कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा पराभूत झाला. भारताला पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल 209 धावांनी पराभूत केले. या पराभवामागे काय कारणे असतील याचे अनेक अंदाज लावण्यात आले. अनेक दिग्गजांनीही मोठ्या प्रमाणात टीकाही केली.

अगदी सराव, संघनिवड, नेतृत्व अन् खेळाडूंची कामगिरी सर्वच गोष्टींवर चर्चा झाली. पण एका गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष झालं, ती गोष्ट म्हणजे हा अंतिम सामना रोहित शर्माचा कर्णधार म्हणून फक्त इंग्लंडमधीलच नाही, तर परदेशातीलच पहिला सामना होता. अशा परिस्थितीत त्याला पूर्णपणे पराभवासाठी जबाबदार धरणे किती योग्य ठरेल, हा मोठा प्रश्न आहे.

Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

इथे अनेकजण असंही म्हणतील की एमएस धोनीनेही टी20 वर्ल्डकपमध्येच पहिल्यांदा नेतृत्व केले होते; पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी होती की आयसीसी ट्रॉफी अर्थात कसोटी विश्वविजयाची गदा जिंकण्याची एकच संधी होती. हा सामनाच करो वा मरोचा होता. इथे दुसरी संधी मिळणार नव्हती. अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार नव्हते का? त्याचबरोबर गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघाकडे उपकर्णधारही नाहीये. या सर्वच गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ.

WTC 2023 Final
Rahul Dravid चा रिपाॅर्ट कार्ड : ICC ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या मधली 'वॉल' प्रशिक्षक तोडणार का?

रोहितची कर्णधार म्हणून नियुक्ती अन् अन्य पर्याय

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माकडून नेतृत्वात चूका झाल्या नाहीत का, तर अनेकदा झाल्या. कधी गोलंदाजी बदल करताना, तर कधी क्षेत्ररक्षणात. ज्यावेळी इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा असतो, त्यावेळी नेतृत्व कौशल्य अधिक पणाला लागते; कारण चेंडू स्विंग होत असतो, वातावरण सातत्याने बदलत असते.

पण, या गोष्टी समजण्यासाठी रोहितला त्याप्रकारच्या नेतृत्वाचा अनुभव होता का? तर अजिबातच नाही. आता सुरुवातीपासून पाहायचे झाले, तर ज्यावेळी विराट कोहलीने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाचे नेतृत्व सोडले होते, त्यावेळी रोहित शर्माला कसोटीचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की त्या दौऱ्यासाठी रोहित दुखापतीमुळे गेलाच नव्हता.

नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्यावेळी बीसीसीआय आणि निवड समीतीला हे पूर्णपणे माहित होते की जर भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, तर इंग्लंडमध्ये खेळावे लागणार आहे. तसेच त्याआधी भारताला सर्वाधिक सामने मायदेशातच खेळायचे होते.

भारताने रोहितला पूर्णवेळ कसोटी नेतृत्व दिल्यानंतर अंतिम सामन्यापूर्वी केवळ तीन सामने परदेशात खेळले. यातील एक सामना इंग्लंडला झालेला, तर दोन सामने बांगलादेशविरुद्ध झालेले. अशा वेळी अंतिम सामन्याच्या दृष्टीने परदेशात अनुभवी ठरू शकेल अशा नेतृत्वाची भारताला गरज नव्हती का? भारताकडे कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शिवाय कोणकोणते पर्याय होते?

IPL | Saourav Ganguly | Rohit Sharma
IPL | Saourav Ganguly | Rohit SharmaTwitter
  • गांगुलीचं न समजण्यासारखं भाष्य

ज्यावेळी विराटने कर्णधारपद सोडले, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत केएल राहुलने नेतृत्व केले होते, भारतीय संघात अजिंक्य रहाणे होता, ज्याने एक वर्षापूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायदेशात युवा भारतीय संघाला घेऊन शानदार नेतृत्व केले होते आणि मालिका विजय संपादन केला होता. आर अश्विनसारखा एक हुशार समजला जाणारा खेळाडू संघात होता.

अशावेळी रोहितने फक्त आयपीएलमध्ये 5 विजेतीपदे जिंकली आहेत, या जोरावर त्याला कसोटी कर्णधारपद देणे कितपत योग्य होते. काही दिवसांपूर्वीच माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने एका मुलाखतीत म्हटले होते की त्यावेळी रोहितशिवाय दुसरा पर्याय निवड समीतीकडे नव्हता. रोहितने आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे, आयपीएल ही वर्ल्डकपपेक्षाही कठीण स्पर्धा आहे. पण गांगुलीसारखा इतका अनुभव असलेला खेळाडूने हे स्पष्टीकरण देणे किती योग्य होते.

टी20 आणि कसोटी हे दोन अगदी वेगळे क्रिकेटप्रकार आहेत. दोन्ही प्रकारात लागणारे नेतृत्व कौशल्य वेगळे असते, ही गोष्ट गांगुलीने अधोरेखितही केली नाही. पण याचवेळी गांगुलीने आत्ता यावर विचार करण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले, जे काही प्रमाणात योग्यही आहे.

पण, त्यावेळी काय पर्याय होते, यावर आत्ता बोलण्यात काही अर्थ नसला, तरी हे माहित असताना की रोहितने यापूर्वी परदेशात नेतृत्व केले नाही, अशा परिस्थितीत भारतीय संघाने सराव सामना न खेळणे न समजण्यासारखे होते.

WTC Final 2023 | Team India
WTC Final 2023 | Team IndiaDainik Gomantak

सराव सामन्याची उणीव

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित कसोटी कर्णधार झाल्यानंतर भारताने जुलै 2022 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध बर्मिंगघमला खेळलेल्या सामन्यात रोहित कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने खेळला नाही, तर 2022 च्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेआधी तो दुखापतग्रस्त होता.

रोहितने अंतिम सामन्यापूर्वी केवळ 6 कसोटी सामन्यात नेतृत्व केले होते, तेही हे सर्व सामने भारतात झाले होते. भारतात फिरकीला पोषक वातावरण आणि खेळपट्टी असते. परिणामी प्लेइंग इलेव्हनमध्येही 3 फिरकी गोलंदाज दिसतात. त्यामुळे रोहितला फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा अंदाज होता. पण समस्या होती, ती परदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये जेव्हा 4 वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळावे लागले. त्यांना किती षटकांचे स्पेल द्यावेत, कोणाला कधी गोलंदाजी द्यावी या सगळ्याच गोष्टीत रोहित गोंधळलेला दिसला.

अशा परिस्थितीत एक सराव सामना नक्कीच महत्त्वाचा ठरू शकला असता. सराव सत्र महत्त्वाचे असतातच, नेट्समधील सराव महत्त्वाचा असतोच, पण सराव आणि प्रत्यक्ष सामन्यात फरक असतो. समोरचा संघही त्यांच्या योजनेने उतरलेला असतो. अशावेळी मॅच प्रॅक्टिस कधीही मदत करून जाते. पण यासाठीही समस्या अशी होती की इंग्लंडमध्ये सध्या काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे काउंटी संघ त्यात व्यस्त होते.

मात्र, तोडगा काढायचा ठरवले, तर तो कसाही काढता येतोच की. भारतीय संघ अंतर्गतच दोन संघ करून तीन दिवसाचा सराव सामना खेळू शकला नसता का? यापूर्वी भारताने असा प्रयोग केला नाहीये का, तर नक्कीच केला आहे. मग यावेळी असं का केलं गेलं नाही.

Team India
Team IndiaTwitter

आयपीएलनंतर म्हटलं तरी संपूर्ण भारतीय संघ 1 जूनपर्यंत एकत्र आला होता. त्यामुळे संघ तीन दिवसाचा सराव सामना नक्कीच खेळू शकला असता. यामुळे एकतर भारतीय गोलंदाजांना टी२० क्रिकेटमधून कसोटी सामन्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी एक चांगली लय मिळाली असती. फलंदाजांना स्विंग गोलंदाजी खेळण्यासाठी विश्वास मिळाला असता आणि महत्त्वाचं म्हणजे रोहितला कशा प्रकारचे नेतृत्व करावे लागेल, याचा अंदाज आला असता.

मात्र, शेवटी म्हणतात ना अपयशाला स्पष्टीकरणे दिली जातात. त्यामुळे आता काय होऊ शकले असते असा विचार न करणेच योग्य, पण तरीही काय चूकले, हे समजून घेऊन त्यातून मार्ग काढणे शहाणपणाचे ठरते. त्यामुळे आता, यातून बीसीसीआयला धडा घ्यावाच लागणार आहे.

WTC 2023 Final
India's Tour of West Indies: BCCI ने केली वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा! पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

भविष्यातील योजना काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीसीसीआयला पर्याय शोधायचाय तो म्हणजे कसोटी नेतृत्वाचा. कारण 16 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाच्या दोन वर्षात भारतीय संघ रोहितच्याच नेतृत्वाखाली खेळणार आहे, की नव्या कर्णधाराचा विचार करायचा, हे बीसीसीआयला ठरवावे लागणार आहे.

नव्या कर्णधाराचा विचार केला, तरी त्यासाठी पर्याय असणार तरी काय, कारण हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतीय कसोटी संघाला उपकर्णधार नाही. म्हणजेच रोहितच्या पुढच्या कर्णधारावर प्रश्नचिन्हच आहे.

अद्यापही भारतीय संघ कर्णधारपदासाठी दुसरा पर्याय शोधू शकलेला नाहीये का? जरी एक युवा खेळाडूला नेतृत्वपद द्यायचे झाले, तरी असा खेळाडू तयार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बीसीसीआयला शोधावी लागणार आहेत, कारण जरी बीसीसीआय श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलं, तरी एक स्पर्धा जिंकण्यासाठी चांगली संघबांधणीच महत्त्वाची असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com