Rahul Dravid as a Coach: भारतीय क्रिकेट संघ 2023 मध्ये दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा खेळताना दिसणार आहे. एक जूनमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि दुसरा म्हणजे आपल्याच मायदेशात होणारा वनडे वर्ल्डकप. यातील World Test Championship साठी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने बेंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तयारी सुरू केली आहे.
मोठ्या स्पर्धांची तयारी साधारणत: दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरु केली जाते. यानुसार बीसीसीआयने प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याची निवड केली होती. द्रविड आणि खेळाडूंना या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने पुरेसा वेळही मिळालाय.. पण संघाला अद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही हे वास्तव आहे. ‘कोच’ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करु शकेल का, भरवशाचा खेळाडू असलेला द्रविड प्रशिक्षक म्हणून कशी कामगिरी करतोय, त्यात काही चुका आहेत का, याचा घेतलेला हा आढावा....
वर्ष होतं 2021… भारतीय संघ टी20 वर्ल्डकपमध्ये सपशेल अपयशी ठरला होता. विराट कोहलीने टी20 कर्णधारपद सोडलं होतं आणि रोहित शर्मा भारताच्या टी20 संघाचा नियमित कर्णधार झाला होता. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयचा तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने एनसीएचा प्रमुख म्हणून चांगली कामगिरी करत असलेल्या द्रविडला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी विचारलं. ‘द्रविड यासाठी कचरत होता, पण गांगुलीने त्याला मनवलं. द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला’, असं माध्यमांमध्ये आलं होतं.
द्रविडला पसंती का देण्यात आली होती याचं कारण होतं द्रविडने कोच म्हणून केलेली कामगिरी. द्रविडने दोन 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलेलं. भारतीय अ संघालाही चांगलं मार्गदर्शन मिळालं होतं. नंतर तो एनसीएमध्येही भारताची पुढची पिढी घडवताना दिसत होता. अशा द्रविडने भारतीय संघाचं प्रशिक्षकपद हातात घेण्याचा निर्णय जवळपास सर्वांनाच पटला होता.
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
2021 च्या अखेरीस न्यूझीलंड भारत दौऱ्यावर आला तेव्हा. पहिलीच टी20 मालिका होती. यात भारतानं पूर्ण वर्चस्व ठेवलं. प्रशिक्षक म्हणून द्रविडची आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची दमदार सुरुवात झाली. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाची धूरा सोपवण्यात आली होती. अखेरच्या डावात 9 विकेट्स जाऊनही न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं. पण नंतर भारतानं दुसरी कसोटी मात्र अजाज पटेलच्या 10 विकेट्सनंतरही आरामात जिंकली.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केएल राहुल कॅप्टन
2022 च्या सुरुवातीलाच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार होता. त्याआधी विराटला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर विराट-गांगुली यांच्या विधानांवरून वाद पेटले होते. अशातच रोहित शर्माही दुखापतीमुळे या दौऱ्यावर जाणार नव्हता. त्यामुळे वनडेचं नेतृत्व अचानक केएल राहुलकडे देण्यात आलेलं. कसोटीत विराट कर्णधार होता. विराट कसोटी मालिकेतील पहिला आणि तिसरा कसोटी सामना खेळला. पण दुसऱ्या सामन्याला दुखापतीमुळे मुकला. त्याच्याऐवजी नेतृत्वासाठी केएल राहुलचंच नाव पुढे आलं. महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच रहाणेने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत नेतृत्व केलं असताना अचानक केएल राहुलचं नाव नेतृत्वासाठी पुढे आलं होतं.
अनेक रिपोर्ट्सनुसार त्यावेळी राहुल द्रविडने केएल राहुलच्या नावाला पसंती दिली होती. त्या कसोटी मालिकेनंतर विराटनं कसोटीचं नेतृत्वही सोडलं. तो दौरा भारताच्या नेतृत्वफळीत अनेक बदल करणारा ठरला. केएल राहुलवर उपकर्णधार म्हणून शिक्कामोर्तब झालं. रोहित तिन्ही प्रकारासाठी भारताचा कर्णधार बनला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने सलग दोन कसोटी सामने 200 पेक्षा जास्त धावांचे आव्हान अखेरच्या डावात पूर्ण करत जिंकले होते.
इंग्लंडविरुद्धचा लाजीरवाणा पराभव
रवी शास्त्री आणि विराट या जोडगोळीच्या नेतृत्वात 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. या मालिकेतील अखेरचा सामना स्थगित झालेला तो जुलै 2022 च्या सुरुवातीला झाला. पण तोपर्यंत संघात अनेक बदल झालेले होते.
इंग्लंडने तब्बल 378 धावांचं आव्हान 7 विकेट्स राखून पूर्ण करत विक्रमी विजय मिळवला होता. महत्त्वाचे म्हणजे 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय संघ कसोटीत 150 पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरला होता. तेही एकदा नाही, तर एकाच वर्षात तब्बल तीनदा. त्यातच त्यावेळी भारताचं नेतृत्व केलं होतं जसप्रीत बुमराहनं. कारण रोहित आणि केएल राहुल दोघंही या सामन्यासाठी उपलब्ध नव्हते. भारतासाठी हा पराभव लाजीरवणारा ठरला होता.
मोठ्या स्पर्धेतील अपयश
भारतीय संघ नंतर आशिया चषकातही अंतिम सामन्यात पोहचला नाही. 2022 च्या अखेरीस भारताला टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. भारतीय संघ पूर्णपणे त्यावेळी हतबल दिसला. दरम्यान, भारताने बांगलादेश दौऱ्यातही वनडे मालिकेत पराभव पत्करला.
भारतीय संघाने इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अशा संघांना द्विपक्षीय मालिकांमध्ये या कालावधीत हरवलं. पण महत्त्वाच्या सामन्यात टीम संघर्ष करताना दिसत होता.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
फेब्रुवारी – मार्च 2023 दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता. फिरकी खेळपट्टीवर भारतानं ऑस्ट्रेलियाला आव्हान दिलं खरं. पण कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आपलेच फिरकी अस्त्र आपल्यावरच बुमरँग झाल्याचे दिसले. भारतीय फलंदाजही फिरकीवर संघर्ष करताना दिसले.
त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत तर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. एकूणच काय तर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका गमावली असली, तरी त्यांच्यासाठी हा भारत दौरा अपयशी ठरला नव्हता. याचदरम्यान अचानक टी20 संघासाठी हार्दिक पंड्याचं कर्णधार म्हणून आणि सूर्यकुमारचं उपकर्णधार म्हणून नाव पुढे आले आहे. आशिया चषक, टी20 वर्ल्डकप पाठोपाठ या मालिकेतील टीम इंडियाची कामगिरी असंख्य प्रश्न निर्माण करणारी होती.
द्रविड प्रशिक्षक झाल्यापासून टीमने 14 कसोटी सामने खेळले. यातील केवळ 6 सामन्यात रोहित शर्मा खेळला आहे. हे सर्व 6 सामने भारतात झालेले आहेत. भारताने 14 पैकी 6 सामने परदेशात खेळलेत. यातील तीन दक्षिण आफ्रिकेत, एक इंग्लंडमध्ये आणि दोन बांगलादेशमध्ये पार पडले. यातील एकाही सामन्यात रोहित खेळलेला नाही. 3 सामन्यात केएल राहुल कर्णधार होता, 2 सामन्यात विराट कोहली आणि एका सामन्यात जसप्रीत बुमराह. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल आठ खेळाडूंनी टीम इंडियाचं नेतृत्व केले.
द्रविडने प्रशिक्षकपद हातात घेतल्यानंतर आठ महिन्यातच 6 कर्णधारांबरोबर काम केलं होतं. याबद्दल तो म्हणाला होता, 'प्रशिक्षक क्षेत्र नक्कीच उत्साहवर्धक आहे, पण ते आव्हानात्मकही आहे. गेल्या आठ महिन्यात आम्हाला 6 कर्णधार मिळाले. ही अशी गोष्ट होती ज्याबद्दल मी जेव्हा सुरुवात केलेली, तेव्हा नक्कीच अपेक्षा केली नव्हती.'
अनेक खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली, अनेक खेळाडू संघातून बाहेर गेले. रोहित, केएल राहुलला विश्रांती दिल्यानंतर शिखर धवनकडे वनडेचं नेतृत्व देण्यात आलं. मग अचानक त्याला संघातून वगळण्यात आलं. यादरम्यान भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले, तोही नंतर संघातून बाहेर गेला. आर अश्विनला टी20 वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आले. नंतर तोही कायम राहिला नाही. द्रविड प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघाकडून गेल्या 13-14 महिन्यांत तब्बल 49 खेळाडू खेळले.
गेल्या दीडवर्षात रवी बिश्नोई, आवेश खान, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, शिवम मावी, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, राहुल चाहर, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, उमेश यादव असे अनेक खेळाडू भारतीय संघात आत बाहेर करताना दिसले. तसेच इशांत शर्मा, मयंक अगरवाल, शिखर धवन, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, दीपक चाहर अशा काही खेळाडूंना बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला.
रोहित शर्मा, विराट कोहली या खेळाडूंना पुढच्या वर्षी टी20 वर्ल्डकप होणार असताना संघातून बाहेर करण्यात आलं. बुमराह, अय्यर, पंतसारखे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. एकूणच जरी द्रविड आणि भारतीय संघाकडून सांगण्यात येत असलं की वनडे वर्ल्डकपसाठी जवळपास खेळाडू निश्चित आहेत. पण आता द्रविडने तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ आलीये.
टीम इंडियातील खेळाडू खरंच निश्चित आहेत का?
द्रविडसमोरील सर्वात मोठी डोकेदुखी हिच ठरली की कधीच संघ निश्चित राहिला नाही. सातत्याने भारतीय संघात बदल होत राहिले.
अशी परिस्थिती असताना मोठ्या स्पर्धांसाठी संघाला तयार करणार कसं?
जर संघात कोणते खेळाडू खेळू शकतात हेच निश्चित नसेल, तर कोणाकोणासाठी आणि कशी तयारी केली जाणार.
विराट-शास्त्री यांनी तयार केलेला संघ रोहित-द्रविड यांना मिळालेला होता. त्यांना त्या संघाला पुढे न्यायचे होते. मात्र, कुठेतरी रोहित आणि द्रविड याबाबत अपयशी ठरताना दिसते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जोखीम पत्करताना हे दोघे कुठेतरी मागे पडले. शास्त्री-कोहली यांनी ज्याप्रकारे संघात बुमराह, शमी, शार्दुल, इशांत सारखे तंत्रशुद्ध गोलंदाज खेळवले, तसे रोहित आणि द्रविड अष्टपैलू खेळाडूंवर जास्त अवलंबून राहाताना दिसले. अष्टपैलू खेळाडू संघासाठी नक्कीच महत्त्वाचे असतात. ते संघाला समतोलपणा देतात. पण पूर्णवेळ गोलंदाज आणि फलंदाजांचीही संघाला तितकीच गरज असते, तेव्हाच संघात समन्वय साधता येतो.
भारतीय संघाचं प्रशिक्षक असणारा खेळाडू थोडासा हटवादी (Stubborn), ठाम आणि भक्कम असणारा असणे गरजेचे आहे, असं जाणकार सांगतात. शास्त्री याचं एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी ज्याप्रकारे मॅन मॅनेजमेंट केलं, ते फार कमी लोकांना जमतं. नक्कीच शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. पण भारतीय संघ परदेशात आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करू शकला.
मॅन मॅनेजमेंट म्हणजेच एखाद्या गटाला एकत्र बांधून ठेवत पुढे जात राहाणं. त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे. याबाबत सांगायचं झालं, शास्त्री यांचे संघावर नियंत्रण होतं. त्यांनी संघाला कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा दिली होती. त्याचमुळे दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्याच्यांच भूमीत कसोटीत पराभूत करण्याची कामगिरी भारत करू शकला. तेही गॅबावर तर अर्धा संघ दुखापतग्रस्त असताना संघातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणं सोपं नव्हतं. तरी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघानं जवळपास तीन दशकानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या बालेकिल्ल्यावर पराभूत केलं होतं.
द्रविडचा स्वभाव त्याच्यातील प्रशिक्षकातून झळकतो. तो अनेकदा शांत राहून निर्णय घेताना दिसतो. द्रविडला मध्यंतरी विश्रांतीही देण्यात आली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यावेळी पार पाडली. त्यावेळी शास्त्री याबद्दल चिडलेही होते. त्यांचं स्पष्ट मत होतं प्रशिक्षकाला आयपीएल दरम्यान दोन महिन्यांची विश्रांती मिळते आणि ती पुरेशी असते. जर प्रशिक्षक संघाबरोबर नसेल, तर उपयोग काय. या गोष्टीचाही विचार होणे आवश्यक आहे. इथे मुद्दा कोण बरोबर हा नाहीये. द्रविड आणि शास्त्री दोघेही त्यांच्या जागेवर योग्यच आहेत, पण प्रश्न आहे दृष्टीकोनाचा. संघात उर्जा निर्माण करण्याचा, संघाला विजयासाठी प्रेरणा देण्याचा.
द्रविड अपयशी आहे का, तर नक्कीच नाही. त्याचा अनुभव पाहाता, तर नाहीच नाही. पण तरी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणे आणि संघाचं प्रशिक्षक होणं यात फरक आहे. प्रशिक्षक म्हणून मोठी जबाबदारी द्रविडवर आहे. भारताला कमी कालावधीत अनेक गोष्टींची तयारी करायची आहे.
आयपीएलनंतर लगेचच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे टी20ची मानसिकता बदलून लगेचच कसोटीचा तोही महत्त्वाचा सामना भारतीय खेळाडूंना खेळायचा आहे. तसेच समोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ असणार आहे. त्यांच्या संघातील बरेच खेळाडू पूर्ण ताजेतवाने असणार आहेत. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होणाऱ्या परिस्थितीत कमिन्स, स्टार्क, हेजलवूड सारख्या गोलंदाजांचा सामना करायचा आहे. नॅथन लायनची फिरकी आहेच आणि स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ट्रेविस हेड यांसारखे फलंदाजही आहेत, जे आयपीएलमध्ये खेळत नाहीयेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ पूर्ण ताजा असणार आहे.
एकाबाजूने विचार केल्यास द्रविडला 19 वर्षांखालील आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना मोठे यश मिळाले आहे. तो ज्याप्रकारे युवा खेळाडूंना तयार करण्यात रमतो. त्याप्रकारे त्याला भारतीय वरिष्ठ संघाचं मार्गदर्शन करताना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असावे. अनेकदा भारतीय संघात आलेल्या खेळाडूंना एखादी गोष्ट समजावणे कठीणही जात असावे आणि द्रविडचा स्वभाव असा नाही, की तो कोणाला दुखावून पुढे जाईल. पण हीच गोष्ट भारतीय संघाचे मार्गदर्शन करताना मारक ठरू शकते.
काही गोष्टी चांगल्या असल्या, तरी त्या प्रत्येकवेळी योग्य असतील असे नसते. तुम्हाला अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी द्रविड जे काम पडद्यामागे राहुन करू शकत होता, त्यावेळी त्याला पडद्यावर आणण्याची घाई झाली का असाही प्रश्न उपस्थित होतो. अनेकजणांचे व्यक्तिमत्त्व असे असते की ते पडद्यामागे राहून खरंच अप्रतिम काम करू शकतात, पण त्यांना हिरो करण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रयत्न अपयशी ठरू शकतो. द्रविडच्या बाबतीत तरी हे असेच झाल्याचे दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.