Ravindra Jadeja: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूरला सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने शानदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यादरम्यान एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
जडेजाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने भारताच्या पहिल्या डावात खेळताना अर्धशतकी खेळी करताना दुसऱ्या दिवसाखेर 66 धावांवर नाबाद आहे.
एकाच कसोटीत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एकाच डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही जडेजाची सहावी वेळ आहे.
त्यामुळे त्याने कसोटीत सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि एकाच डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आर अश्विनची बरोबरी करताना कपिल देव यांना मागे टाकले आहे. अश्विननेही असा कारनामा 6 वेळा केला आहे, तर कपिल देव यांनी 4 वेळा हा पराक्रम केला आहे.
जगातील एकूण अष्टपैलूंमध्ये असा कारनामा सर्वाधिकवेळा करण्याचा विश्वविक्रम दिग्गज क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्या नावावर आहे. त्यांनी 11 वेळा कसोटीत 50 पेक्षा अधिक धावांची खेळी आणि एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
जडेजाने इंग्लंडविरुद्ध 2016 साली चेन्नई कसोटीत, 2016 मध्येच न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2017 मध्ये रांची कसोटीत, 2017 सालीच श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत, तसेच श्रीलंकेविरुद्धच 2022 मध्ये मोहाली कसोटीत आणि आता नागपूर कसोटीत 50 पेक्षा अधिक धावांची खेळी आणि 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
जडेजाची आधी गोलंदाजीत, मग फलंदाजीत कमाल
नागपूरला सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण जडेजाने मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, मॅट रेनशॉ आणि टॉड मर्फी या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या विकेट्स घेत मोठे धक्के दिले. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 177 धावांवरच रोखले.
जडेजाने गोलंदाजीत कमाल केल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येत आधी कर्णधार रोहित शर्माबरोबर 61 धावांची आणि नंतर अक्षर पटेलबरोबर नाबाद 81 धावांची भागीदारी करत भारताला दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 321 धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे भारताला 144 धावांची आघाडीही मिळाली.
एकाच कसोटी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी आणि ५ विकेट्स घेणारे खेळाडू
11 वेळा - इयान बॉथम
10 वेळा - शाकिब अल हसन
6 वेळा - रविंद्र जडेजा
6 वेळा - आर अश्विन
6 वेळा - रिचर्ड हॅडली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.