

सर्वेश बोरकर
गोव्यातील जुन्या गोव्यात मॉन्टे सँन्टो टेकडीवर ऑगस्टीनियन्सनी कॉन्व्हेंट आणि सेंट ऑगस्टीनच्या चर्चचे बांधकाम केले गेले असे इतिहासकार लिहितात. सेंट ऑगस्टीन हा पंथ १५७२मध्ये पोर्तुगालहून गोव्यात धर्मगुरूंमार्फत पोहोचला आणि १८३४च्या सुमारास ऑगस्टीन पंथाचा र्हास होईपर्यंत मॉन्टे सँन्टो हे या सदस्यांचे केंद्र बनले. हे सुंदर चर्च सांता मोनिका कॉन्व्हेंटच्या जवळजवळ त्याच वेळी बांधले गेले होते; आणि त्याबद्दल एक आख्यायिकाही ऐकवली जाते.
एका इटालियन वास्तुविशारदाने हे चर्च दोनदा बांधले, परंतु दोन्ही वेळा त्याचे श्रम त्याच्या पडझडीमुळे निष्फळ ठरले. निराशेच्या गर्तेत अडकून, त्याने ते तिसऱ्यांदा पुन्हा बांधले आणि त्याची स्थिरता सिद्ध करण्यासाठी स्वतःला आणि त्याच्या एकुलत्या एका मुलाला थेट त्याखाली ठेवले आणि इमारतीजवळ एक तोफ आणून डागण्याचा आदेश दिला व बांधकाम कोसळल्यास पुन्हा निराश होण्यापेक्षा आपला जीव गमावणे पसंत केले.
सुदैवाने बांधकामाने धक्क्याचा प्रतिकार केला व हा इटालियन वास्तुविशारद कामाच्या टिकाऊपणाबद्दल समाधानी झाला आणि त्याच्या कष्टांसाठी त्याला योग्य मोबदला मिळाला.
१६व्या शतकाच्या अखेरीस इराणमध्ये एक महत्त्वाची घटना घडली, पर्शियन सिंहासनाचा वारस शाहहमजा मिर्झा खूप आजारी पडला आणि जॉर्जियातील त्याच्या ख्रिश्चन पत्नीने प्रार्थना केल्याने तो बरा झाला. त्यामुळे, त्याचे राष्ट्र ख्रिश्चन बनले व तोच संदेश एका आर्मेनियनद्वारे गोव्यात पोहोचला.
किझिलबाश नेता मुर्शिद क़ली खानने १५८८मध्ये एका बंडात शाहला पदच्युत केले आणि १६ वर्षांच्या शाह अब्बासला गादीवर बसवले, परंतु त्या धूर्त मुलाने लवकरच सत्ता हाती घेतली. १६१४मध्ये शाह अब्बास जॉर्जियन राजा तेमुराझला कळवतो की त्याचा मुलगा ओलीस ठेवला जाईल आणि तेमुराझला त्याचे मुलगे आणि आई केटेवन इराणला पाठवण्यास भाग पाडले जाते.
इराणच्या ३० प्रांतांपैकी एक असलेल्या फार्सची राजधानी शिराझच्या एका कथेनुसार, जॉर्जियाची राणी केटेवनला अखेर हेरगिरी व रशियन लोकांना पाठिंबा दिल्याचे कारण सांगून शाहने तुरुंगात टाकण्यात आले आणि तिच्या नातवंडांचे नपुंसकीकरण आणि इस्लामीकरण करण्यात आले.
काही काळानंतर शाह अब्बासने केटेवनला इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा आपला इरादाही जाहीर केला. जर तिने सहमती दर्शवली तर तिला राणी म्हणून सन्मानित केले जाईल आणि जर तिने नकार दिला तर तिला सार्वजनिक छळ केला जाईल.
जे घडले ते प्रत्यक्षदर्शी ऑगस्टिनियन धर्मगुरू ॲम्ब्रोसियो डोस अँजोस यांनी कथन केले आहे, ज्यांना १६२३मध्ये शिराझमध्ये एक लहान धर्मशाळा आणि चर्च सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.
शिराझमध्ये कैदेत असताना, तिने इस्लाम स्वीकारण्याची सफाविद बादशाहची मागणी नाकारली आणि तिचा छळ करण्यात आला. ही परीक्षा पोर्तुगीज ऑगस्टिनियन मिशनऱ्यांनी पाहिली, १६२६ मध्ये, ऑगस्टिनियन लोकांना अस्थिर शाहच्या क्रोधाचा सामना करावा लागला आणि त्यांना पळून जावे लागले. धर्मगुरू ॲम्ब्रोसियो अँजोस गोव्यात पळून गेला ज्याने राणीचे अवशेष इस्फहान आणि अखेरीस भारतात आणले.
पुढे आताच्या जॉर्जिया देशाच्या राज्यांपैकी एक काखेतीच्या राणी केटेवनचे अवशेष भारतात जुन्या गोव्यातील मॉन्टे सँन्टो येथील ऑगस्टिनियन संकुलात विसावले. मृत राणीच्या उजव्या हाताचे हाड रोममधील पिएत्रो डेला व्हॅले यांना सोपवण्याच्या उद्देशाने गोव्यात नेण्यात आले.
गोव्यातील धर्मगुरूंनी गोव्यात अवशेष ठेवण्याचा निर्णय घेतला आणि राणीचा फक्त खालचा जबडा डेला व्हॅलेकडे पाठवला. गोव्यातील धर्मगुरूंनी नोसा सेनहोरा दा ग्राका या सेंट ऑगस्टीन चर्चमधील खिडकीजवळ प्रदर्शित केलेल्या काळ्या दगडाच्या पेटीत हाडे जतन केली होती असा उल्लेख पोर्तुगीज स्रोतांमध्ये सापडतो. जॉर्जियन देशातील लोकांसाठी राणी सेंट केटेवनचे महत्त्व गेल्या दशकात, गोव्यात तिच्या अवशेषाचा शोध घेण्यास कारणीभूत ठरले.
१९८९पासून, जॉर्जियाहून येणाऱ्या विविध शिष्टमंडळांनी ऑगस्टिनियन कॉन्व्हेंटच्या अवशेषांमध्ये केटेवनची कबर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. एम. ताहिर यांच्यासोबत काम केले. २०००-२००१ मध्ये जॉर्जियाचे डॉ. केंचोशव्हिल यांनी भारत सरकारची परवानगी घेतली आणि दुसऱ्या खिडकीजवळ कुठेतरी उत्खनन केले, परंतु सफलता मिळाली नाही.
अखेर मे २००४मध्ये, स्रोतांमध्ये उल्लेख केलेले चॅप्टर चॅपल आणि खिडकी सापडली. जरी दगडी कलश गायब होता, तरी पोर्तुगीज स्रोतांमध्ये उल्लेख केलेल्या खिडकीजवळ त्याचा केपिंग दगड आणि एका काळ्या पेटीत अनेक हाडांचे तुकडे सापडले.
भारतात हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे डॉ. निरज राय यांनी सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंटमधून उत्खनन केलेल्या मानवी हाडांच्या अवशेषांवर माइटोकॉन्ड्रियल डीएनएचे अनुक्रम आणि जीनोटाइपिंग करून डीएनए विश्लेषण केले. अवशेषांच्या तपासणीत एक असामान्य माइटोकॉन्ड्रियल डीएनएचे हॅप्लोग्रुप आढळून आला, जो भारतात सापडत नाही, परंतु जॉर्जिया आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये तो आहे.
आनुवांशिक विश्लेषण पुरातत्त्वीय आणि साहित्यिक पुराव्यांना पुष्टी देत असल्याने, उत्खनन केलेले हाड जॉर्जियाच्या राणी सेंट केटेवनचे असण्याची शक्यता मानली गेली. आज जॉर्जिया आणि भारत यांच्यात उत्कृष्ट राजनैतिक संबंध आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार झालेला आहे. पुढे हाच जॉर्जियन देश भारत, इराण आणखी रशिया यांच्यातले संबंध मजबूत करण्यात भारताला मदत करू शकतो तसेच इराण - इस्राईल युद्ध थांबवण्यासाठी भारताची मुख्य भूमिका बजावण्यात मदत करू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.