

केदार साखरदांडे
कणगी म्हणजे गोवन रताळी. पण इथली कणगी थोडी वेगळी. नेहमीसारखी गुलाबी-जांभळी नाहीत. तर पांढरी कणगी, गोय कणगी (कुका) आणि काटेकणगी. पांढरी कणगी चवीला किंचित गोड, पण गुलाबी कणग्यापेक्षा किंचित कमी. तर गोय कणगी आणि काटेकणगी तर अजिबातच गोड नाहीत; पण पोटभरीला एकदम बेस्ट. तीन-चार उकडून मीठ लावून खाल्ली की अगदी कम्प्लिट न्याहारी झालीच म्हणून समजा!
गुलाबी कणगी नाजूक; तर बाकी कणगी अगदी कणखर. कुणी साधुगण म्हणून गेले आहे, उपासाला निमित्त कणगीचे. (असं कुणी म्हटलं नसेल तर मीच म्हणून घेतो. अगदी साधुगण नसलो तरी!) पण ते तितकंसं खरं नाही. आपण उगाचच बापड्या कणगेला उपासाच्या जोखडात अडकवून ठेवतो. कणग्यांचा आवाका खरं तर प्रचंड मोठा आहे.
कणगी-शेवग्याच्या शेंगाची भाजी (मस्का सांगा) अफाट होते. त्यात भर म्हणून हलकासा गूळ आणि हात सोडून खोबऱ्याची उधळण. क्या बात है! अशा वेळी जेवणात भाजी केवळ तोंडी लावण्याचा जिन्नस राहत नाही; तो मुख्य पदार्थ होऊन जातो. केवळ माझ्या सांगण्यावर जाऊ नका, वाटल्यास प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा.
हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार - कणगी नेवऱ्या (करंज्या). आतलं सारण तुम्हाला हवं तसं आणि बाहेर कणगी पाते. आहाहा! डोळ्याचे पाते लवते ना लवते, तोच फडशा पाडला जाईल.
आणिक एक प्रकार - कणगी खीर. नारळाचा रस, त्यात कणगी किस किंवा बारीक तुकडे. त्यावर वेलचीचं बोट. वाटल्यास साबुदाणे, किसमस आणि चवीपुरतं गोड. स्वीट अह्ह स्वीटर, स्वीटेस्ट डिश!
आणि सगळ्यात सरताज - कणगी घोस. ह्याला तुलना नाही. कणगी उकडून, किसून, ते एकजीव करून मग बारीक चकलीच्या साच्यात कुरडईसारखे काढावेत. मग सुकवून ठेवावेत आणि छान तेलाच्या कढईत तळून घ्यावेत. तळून कसली!
किंचित अग्नी-तेल संस्कार काढावेत - तेही नाजूकपणे, काही सेकंदांत. एकही क्षण अधिक गेला तर जळलीच म्हणून समजा. साठवण करून ठेवावीत आणि आठवण झाली की हवी तेव्हा तळावीत. आणि तळून झाली की पिठीसाखरेचा हिमवर्षाव करून उपभोगावीत. सोनेरी घोस जिभेवर घोळवावीत.
आणिक एक - कणग्याच्या माना (चिप्स). हा अगदी पुरमेत टाईप. मिठाच्या पाण्यात बारीक स्लायसी उतरवून सुकवून घ्याव्यात. तीन-चार उन्हे काढावीत आणि चिप्स हव्या तेव्हा आणिहव्या तितक्या तळून घ्याव्यात. सुके, पण मस्त खाणे.
आणिक एक - कणगीची कापे. मजेत सांगायचं झालं, तर ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात आणि जी कोणती भाजी हाताला लागेल तिची कापा करून सोडतात. यातला गमतीचा भाग सोडला तर खरं - पिष्टमय भाजी कुठलीही असो, तिची कापे सर्वोच्च होतातच. कणगी अपवाद कसा असेल? उत्तम होतील याची गॅरंटी. पोरं-टोरं चार आणि जाणते-नेणते चार घास अधिकच खातील.
असं हे कणगी पुराण संपतच नाही. काटेकणगी आणि त्याच्या बिरादरीतले कुका आणि करांदे चवीला जरी किंचित सपक लागले तरी जिभेवर घोळवले की किंचित गोडपणा दाखवतात आणि पौष्टिक. बाकी आख्यायिका वर आलेली आहेच.
हे कणगी आख्यान आता थांबवतो. कारण आत्ताच जिभेला मोठी चवीची धार लागलेली आहे. यावर उपाय एकच - घरकान्नीला सांगून, स्वतः सहभाग घेऊन एखादी छान कणग्याची डिश रांधावी आणि त्याचा उपभोग घ्यावा. मग याची देही, याची डोळा, सदेह स्वर्गगमनाची साक्ष मिळेल.
अधिक काय लिहिणे?
लोभ आहेच - तो वृद्धिंगत व्हावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.