Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup Final 2026: भारत पुन्हा जगज्जेता! फायनलमध्ये किवींची दणादाण उडवत जिंकला टी-20 चा किताब; फलंदाजांबरोबर गोलंदाजही ठरले 'मॅचविनर'

IND vs NZ Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला.

Manish Jadhav

T20 World Cup Final 2026: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान केला. या विजयासह टीम इंडियाने अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. टी-20 विश्वचषकाचे जेतेपद राखणारा टीम इंडिया जगातील पहिला संघ ठरला. एवढचं नाहीतर स्वतःच्या मायदेशात यजमानपद भूषवताना विश्वचषक जिंकणाराही टीम इंडिया हा पहिलाच संघ ठरला, जे यापूर्वी कधीही कोणत्याही यजमान देशाच्या संघाला जमले नाही.

नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत 98 धावांची वादळी भागीदारी रचली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 धावा कुटून भारताला 'रॉकेट स्टार्ट' मिळवून दिला. तसेच, संजू सॅमसनने आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवत 89 धावांची जबरदस्त खेळी खेळली, मात्र त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. संजूने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार लगावले.

त्यानंतर आलेल्या ईशान किशननेही 25 चेंडूत 54 धावांची वेगवान खेळी खेळत न्यूझीलंडच्या अडचणीत भर घातली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला आणि तिलक वर्मा लवकर माघारी परतला, तरीही शेवटच्या षटकांत शिवम दुबेने 8 चेंडूत 26 धावांची आतिषबाजी केली आणि हार्दिक पांड्याने 18 धावांचे योगदान दिले. भारताने (India) निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 255 धावांचा डोंगर उभा केला, जो टी-20 विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च स्कोअर ठरला.

दुसरीकडे, 256 धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. टिम सीफर्ट आणि फिन ॲलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भर घातली, पण जसप्रीत बुमराहने पहिला धक्का देताच किवींची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. टिम सीफर्टने 52 धावांची झुंजार खेळी खेळली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही. न्यूझीलंडचे सात फलंदाज साध्या दुहेरी अंकी धावसंख्येपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. अवघ्या 72 धावांत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मिचेल सँटनरने 43 धावा करत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजीसमोर त्याचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर 19व्या षटकात न्यूझीलंडचा डाव 159 धावांवर आटोपला.

भारताच्या या ऐतिहासिक विजयात गोलंदाजांनीही मोलाची भूमिका बजावली. 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहने 4 बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले, तर फिरकीपटू अक्षर पटेलने 3 गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले. धावांच्या फरकाने विचार केला तर टी-20 विश्वचषकाच्या फानयल सामन्यातील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. अहमदाबादच्या 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये तिरंगा डौलाने फडकताना पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन आला. 2024 नंतर सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावून टीम इंडियाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT