अहमदाबाद: तीन वर्षांपूर्वी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्या ठिकाणी करोडो भारतीयांचा हृदयभंग झाला होता, त्याच ठिकाणी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ८ मार्चच्या रात्री विजेतेपदाचा ‘सूर्यो’दय होण्याची सर्वज जण वाट पाहत आहेत. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा होणारा अंतिम सामना सूर्यकुमार आणि त्याच्या टीमसाठी भाग्योदयाचाही ठरणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अख्ख्या क्रिकेट विश्वाचे लक्ष केंद्रित झाले आहे. रोहित शर्माच्या एकदिवसीय संघाच्या हातात आलेला करंडक निसटला होता. सूर्यकुमार यादवचा संघ टी-२० विश्वकरंडक जिंकून त्याची भरपाई करणार का,
या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर उद्या रात्री मिळेल; पण त्यामध्ये अडथळला आहे तो न्यूझीलंड संघाचा. कोणत्याही विश्वकरंडक स्पर्धेचा प्रश्न येतो तेव्हा न्यूझीलंडचा संघ बाजी मारून जातो, हा अगोदरचा इतिहास असला तरी गेल्या वर्षी मिचेल सँटनरच्याच न्यूझीलंड संघाला पराभूत करून रोहित शर्माच्या संघाने आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि इतिहासाची दिशा बदलली होती.
निर्धार, चिकाटी आणि धैर्य कितीही उच्च कोटीचे असले तरी अशा निर्णायक सामन्यात परिपूर्ण खेळ केला तरी दैवाची साथ मिळणेही महत्त्वाचे असते. उपांत्य सामन्यात संजू सॅमसनचा तो १५ धावांवर खेळत असताना सोपा झेल सुटला. त्यानंतर त्याने ८९ धावांची खेळी करून भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.
अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बदलण्याची जोरदार चर्चा होत असली तरी अंतिम सामन्यासाठी दोन बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.
अभिषेकऐवजी रिंकू सिंग हाच बदल शक्य आहे; पण तसे झाल्यास सॅमसन-ईशान अशी नवी सलामी तयार करावी लागेल. वरुण चक्रवर्तीला वगळले तर कुलदीप यादव हा पर्याय आहे; परंतु कुलदीपला थेट खेळवणे बुमरँगही होऊ शकते.
११ खेळाडूंच्या संघात भारतासाठी ११-२ = ९ असेच जणू काही समीकरण सुरू आहे. अभिषेक फलंदाजीस आल्यावर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज लगेच तयार होतो तर वरुण चक्रवर्तीच्या कोट्यातील २४ चेंडूंपैकी कमीत कमी चेंडू सीमारेषेवर जावोत, यासाठी प्रार्थना केली जाते.
एकीकडे न्यूझीलंडची धडाकेबाज फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला भारताकडे बुमरास्त्र आहे. यात कोणाची सरशी होईल, यावर सामन्याची दिशा ठरेल. त्यासाठी बुमराला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी द्यावी लागेल.
या स्पर्धेची मोहीम सुरू होण्याअगोदर भारतातच झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत याच भारतीय संघाने न्यूझीलंडला ४-१ असे हरवले होते; पण उद्याचा एक सामना जिंकणारा संघ सिकंदर होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. द.आफ्रिकेकडून साखळी सामन्यात पराभव पचवल्यानंतर त्याच आफ्रिका संघाचा धुव्वा उडवत न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.
ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत असताना अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या समालीच्या जोडीने मोठी हवा निर्माण केली होती; परंतु अंतिम सामन्याअगोदरच या जोडीच्या क्रमवारीत बदल करावा लागला. या तुलनेत न्यूझीलंडचे फिन अलेन आणि टीम सैफर्ट या दोघांनी स्पर्धेत धोकादायक सलामीवीर म्हणून दबदबा निर्माण केला आहे. या दोघांनी आफ्रिकेच्या आव्हानाचा पालापाचोळा केला.
इतिहास आणि आकडेवारी काहीही असली तरी त्याचा विचार न करता खेळणे हे भारतीय संघाचे तंत्र आणि मंत्र असले तरी उद्या दोन इतिहास बदलण्याची संधी भारतीयांना आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत कोणताही संघ सलग दोनदा जिंकलेला नाही आणि मायदेशात कोणालाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. आम्ही हा इतिहास बदलू, याच निर्धाराने भारतीय संघाने प्रगती केलेली आहे. या सामन्यानंतर सूर्यकुमारचे भवितव्यही ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.