T-20 Cricket Dainik Gomantak
क्रीडा

T-20 Cricket: लक्षयच्या गोलंदाजीने 'उत्तर प्रदेश' नमले; गोव्याचा 11 धावांनी विजय

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचा वेगवान गोलंदाज लक्षय गर्ग याने मंगळवारी डावातील अंतिमपूर्व षटक भन्नाट टाकले. उत्तर प्रदेशला विजयासाठी 12 चेंडूंत 20 धावा हव्या असताना त्याने चार चेंडूंत तीन गडी टिपले. त्या बळावर गोव्याने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत 11 धावांनी सनसनाटी विजय नोंदविला.

(Goa won against Uttar Pradesh team in T20 cricket tournament)

जयपूर येथील जयपुरिया विद्यालय मैदानावर झालेल्या लढतीत गोव्याने 7 बाद 131 धावा केल्या. नंतर उत्तर प्रदेशला 8 बाद 120 धावाच करता आल्या. गोव्याचा पाच लढतीतील हा तिसरा विजय ठरला. उत्तर प्रदेशचा स्पर्धेतील सहावा सामना दिल्लीविरुद्ध गुरुवारी (ता. 20) होईल. उत्तर प्रदेशचा हा दुसरा पराभव ठरला. त्यांचेही पाच सामन्यानंतर गोव्याइतकेच 12 गुण झाले आहेत.

मॅचविनिंग गोलंदाजी

उत्तर प्रदेशची 17 व्या षटकाअखेरीस 5 बाद 112 अशी स्थिती होती. आक्रमक शैलीचा रिंकू सिंग फलंदाजीस असल्यामुळे उत्तर प्रदेशला विजयाची संधी होती. लक्षयने 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रिंकूला त्रिफळाचीत बाद केले.

तिसऱ्या चेंडूवर दिव्यांश जोशी याला सिद्धेश लाड याच्याकरवी, तर चौथ्या चेंडूवर शिवम मावी याला सुयश प्रभुदेसाई याच्याकरवी झेलबाद करून लक्षयने उत्तर प्रदेशची 8 बाद 113 अशी स्थिती केली. त्याने या षटकांत एका धावेत 3 गडी बाद केले.

एकंदरीत 16 धावांत 4 विकेट मिळवून टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. उत्तर प्रदेशला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. सुयश प्रभुदेसाई शांतपणे हे षटक टाकताना प्रतिस्पर्धी संघ विजयी होणार नाही याची दक्षता घेतली.

अर्जुनचा सुरवातीलाच धक्का

डावातील चौथ्याच चेंडूवर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने उत्तर प्रदेशला धक्का दिला. त्याने कर्णधार करण शर्माच्या यष्टीचा वेध घेतला. नंतर लक्षय गर्ग व पहिलाच सामना खेळणारा ऋत्विक नाईक यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत उत्तर प्रदेशची स्थिती 3 बाद 39 अशी केली.

अक्षदीप नाथ व रिंकू सिंग यांनी छोटेखानी 32 धावांची भागीदारी केली, मात्र अक्षदीप धावबाद झाल्याने गोव्याचे फावले. अर्जुनने समीर चौधरीला बाद करून उत्तर प्रदेशची स्थिती 5 बाद 98 अशी केली. रिंकू सिंगमुळे नंतर 17 व्या षटकाअखेरपर्यंत उत्तर प्रदेशला विजयाची आशा होती.

एकनाथने गोव्याला सावरले

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळालेल्या एकनाथ केरकर (नाबाद 31) याच्या सावध फलंदाजीमुळे गोव्याला पडझडीनंतर 131 धावांची मजल गाठता आली. तुनीष सावकारने आक्रमक फलंदाजी करताना प्रत्येकी दोन चौकार व षटकारांसह 11 चेंडूंत 23, तर सुयश प्रभुदेसाईने 13 चेंडूंत 24 धावा केल्याचा फायदाही गोव्याला झाला. डावातील शेवटच्या षटकात गोव्याने तीन गडी गमावले. वेगवान गोलंदाज शिवम मावी याने हे षटक निर्धाव टाकले.

संक्षिप्त धावफलक

गोवा : 20 षटकांत 7 बाद 131 (स्नेहल कवठणकर 26, आदित्य कौशिक 8, एकनाथ केरकर नाबाद 31, सुयश प्रभुदेसाई 24, तुनीष सावकार 23, सिद्धेश लाड 8, दर्शन मिसाळ 0, अमित यादव 0, लक्षय गर्ग नाबाद 0, शिवम मावी 3-16, कार्तिक त्यागी 2-27, कुलदीपसिंग यादव 2-18) वि. वि. उत्तर प्रदेश : 20 षटकांत 8 बाद 120 (आर्यन जुयाल 18, अक्षदीप नाथ 29, रिंकू सिंग 38, समीर चौधरी 11, अर्जुन तेंडुलकर 4-0-25-2, लक्षय गर्ग 4-0-16-4, दर्शन मिसाळ 2-0-21-0, अमित यादव 4-0-24-0, ऋत्विक नाईक 1-0-6-1, सिद्धेश लाड 1-0-5-0, सुयश प्रभुदेसाई 4-0-23-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT