Emerging Asia Cup 2023 Final India A vs Pakistan A, Sai Sudarshan Wicket No ball Controversy:
एमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (23 जुलै) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघात पार पडला. कोलंबोला झालेल्या या सामन्यात पाकिस्तान अ संघाने 128 धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपदही जिंकले. पण या सामन्यात भारताच्या पहिल्या दोन विकेट्समुळे बराच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 353 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून साई सुदर्शन आणि अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली होती. सुदर्शनने साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध शतक केले होते, त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा केली जात होती.
सुदर्शनने सुरुवातही चांगली केली होती. मात्र, 9 व्या षटकात साई सुदर्शनला अर्शद इक्बालने बाद केले. अर्शदने टाकलेल्या चेंडूवर सुदर्शनने पुलचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि यष्टीरक्षक मोहम्मद हॅरिसने त्याचा झेल घेतला. पण ही विकेट वादग्रस्त ठरली.
कारण अर्शदने टाकलेला चेंडू नो-बॉल असल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले. सुदर्शनही बाद झाल्यानंतर बाउंड्री लाईनजवळ थांबला होता. मात्र, रिप्ले पाहिल्यानंतरही नो-बॉलचा निर्णय घेणे पंचांना कठीण गेले, कारण अर्शचा पाय क्रिजच्या पुढे पूर्ण गेला आहे की नाही, याचा अंदाज येत नव्हता. अखेर पंचांनी गोलंदाजांच्या बाजूने निर्णय दिला आणि सुदर्शनला 29 धावांवर विकेट गमवावी लागली.
त्यानंतर 13 व्या षटकात मोहम्मद वासिम ज्युनियरने निकिन जोसला बाद केले. यावेळी जोसचा झेलही हॅरिसने घेतला. मात्र, ज्या चेंडूवर जोसला झेलबाद देण्यात आले, तो चेंडू त्याच्या बॅटला लागलेला नव्हता.
मात्र, पंचांना तो चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचे वाटले, त्यामुळे त्यांनी त्याला 11 धावांवर बाद दिले. त्यावेळी डिआरएस नसल्याने जोसला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या दोन्ही विकेटची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
दरम्यान, भारताकडून नंतर अभिषेक शर्माने 61 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार यश धूलने 39 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही आणि भारताचा डाव 40 षटकात 224 धावांवर संपुष्टात आला.
पाकिस्तानकडून सुफियान मुकिमने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद वासिम ज्युनियर, मेहरान मुमताझ आणि अर्शद इक्बाल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मुबासिर खानने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 352 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून तय्यब ताहिरने 108 धावांची शतकी खेळी केली. तसेच साईम आयुब (59) आणि साहिबजादा फरहान (65) यांनी अर्धशतके झळकावली.
भारताकडून रियान पराग आणि राजवर्धन हंगारगेकर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित राणा, मानव सुतार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.