पणजी : अनुभवी गोमंतकीय डेरिक परेरा यांची एफसी गोवा व्यवस्थापनाने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मंगळवारी नियुक्ती केली. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेसाठी पूर्णवेळ प्रशिक्षकपदी निवड झालेले ते संघाचे पहिले भारतीय मार्गदर्शक आहेत.
59 वर्षीय डेरिक परेरा आयएसएलच्या आठव्या मोसमातील बाकी मोसमात एफसी गोवाला मार्गदर्शन करतील, त्यांनी अचानकपणे पद सोडलेले स्पॅनिश हुआन फेरांडो यांची जागा घेतली आहे. यापूर्वी ते एफसी गोवाचे (Goa) तांत्रिक संचालक होते. यापूर्वी 2019-20 मधील आयएसएल मोसमाच्या अंतिम टप्प्यात सर्जिओ लोबेरा यांनी राजीनामा दिल्यानंतर डेरिक, क्लिफर्ड मिरांडा व रोमा कुनिलेरा यांच्यासह संयुक्त मार्गदर्शन चमूत होते.
अंतरिम प्रशिक्षक या नात्याने क्लिफर्ड मिरांडा यांनी 2019-20 मोसमातील पाच आयएसएल सामन्यांत एफसी गोवास मार्गदर्शक केले होते. आता पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नियुक्त झालेले डेरिक हे एफसी गोवाचे पहिले भारतीय मार्गदर्शक आहेत. फेरांडो यांनी पद सोडल्यानंतर क्लिफर्ड यांनी सोमवारी अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती, ते आता डेरिक यांचे सहाय्यक असतील. डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा शुक्रवारी ओडिशा एफसीविरुद्ध खेळेल.
डेरिक हे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू (Football) आहेत. `एफसी गोवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा फार मोठा बहुमान आहे. हा माझ्यासाठी, तसेच कुटुंबीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. संधी दिल्याबद्दल मी क्लब व्यवस्थापनाचा मनःपूर्वक आभारी आहे,` असे डेरिक यांनी सांगितले.
डेरिक परेरा यांच्याविषयी...
डेरिक परेरा मार्गदर्शकाच्या भुमिकेत 2017 साली एफसी गोवा संघात रूजू झाले. 2017-18 मोसमात ते या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते, 2018-19 मोसमाच्या सुरवातीस क्लबचे तांत्रिक संचालक बनले. त्यांनी एफसी गोवाच्या युवा संघालाही मार्गदर्शन केलेआहे. 2019 साली ते भारताच्या 23 वर्षांखालील प्रशिक्षक होते. ते मुंबईतील (Mumbai) महिंद्र युनायटेड संघाचे प्रशिक्षक असताना त्या संघाने राष्ट्रीय साखळी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पुणे एफसी, साळगावकर एफसी, डीएसके शिवाजीयन्स, चर्चिल ब्रदर्स या संघानाही मार्गदर्शन केले. `ही एक अद्भुत संधी आहे, परंतु आम्हाला खूप काम करायचे आहे आणि मी खेळाडूंसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षण मैदानावर उतरण्यास उत्सुक आहे.`
-डेरिक परेरा, मुख्य प्रशिक्षक एफसी गोवा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.