Delhi Capitals Bowling Coach Dainik Gomantak
क्रीडा

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Delhi Capitals Fast Bowling Coach: आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या प्रशिक्षकवर्गात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या प्रशिक्षकवर्गात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आता श्रीलंकेचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चमिंडा वास यांची फास्ट बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे दिल्लीच्या वेगवान गोलंदाजी विभागाला अनुभवी मार्गदर्शक मिळणार आहे.

चमिंडा वास हे ५२ वर्षांचे असून ते मुनाफ पटेल यांची जागा घेणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या नियुक्तीची माहिती दिली आहे. याआधी युवराज सिंह यांच्याकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आगामी हंगामासाठी दिल्लीचा प्रशिक्षकवर्ग अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसते.

डेक्कन चार्जर्सकडून जिंकले होते आयपीएलचे विजेतेपद

चमिंडा वास यांची गणना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच २००८ ते २०१० या कालावधीत ते डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होते. या स्पर्धेत त्यांनी १३ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या होत्या.

२००९ मध्ये अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या हंगामाच्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. त्यामुळे वास यांना आयपीएलमधील स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभवही आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६१ विकेट्सचा विक्रम

चमिंडा वास यांनी १९९४ ते २००९ या काळात श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

त्यांच्या नावावर १११ कसोटी सामन्यांत ३५५ विकेट्स, ३२२ एकदिवसीय सामन्यांत ४०० विकेट्स आणि सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सहा विकेट्स आहेत. अशा प्रकारे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ७६१ विकेट्स जमा झाल्या. गोलंदाजीसोबतच वास यांनी फलंदाजीतही योगदान दिले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३,०८९ धावा, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,०२५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एक शतक आणि १३ अर्धशतके आहेत.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच प्रशिक्षकाची भूमिका

चमिंडा वास यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघासोबत काम केले असून न्यूझीलंड आणि आयर्लंडच्या संघांशीही ते प्रशिक्षक म्हणून जोडले गेले होते. २०१३ ते २०१५ या कालावधीत ते पुन्हा श्रीलंकेच्या संघासोबत कार्यरत होते. २०१६ च्या टी-२० विश्वचषकासाठी आयर्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

२०२६ च्या लंका प्रीमियर लीगमध्ये त्यांनी कँडी रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्समधील नियुक्ती ही त्यांची आयपीएलमधील पहिली प्रशिक्षकाची भूमिका ठरणार आहे.

अनुभवी गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवणारे वास आता दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आगामी आयपीएल हंगामात संघाला किती फायदा होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT