Australia allrounder Cameron Green revealed he was born with chronic kidney disease:
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने स्वत:बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की त्याचा जन्म झाला, तेव्हापासूनच त्याला किडनीचा आजार (chronic kidney disease) आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात गुरुवारपासून (14 डिसेंबर) पहिला कसोटी सामना पर्थला सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान ग्रीनने चॅनेल७ शी बोलताना याबद्दल खुलासा केला.
त्याने सांगितले की 'माझ्या पालकांना मी जन्मलो, तेव्हा सांगण्यात आले होते की मला किडनीचा आजार आहे. खरंतर त्याची काही लक्षणे दिसत नाहीत, पण तुम्हाला अल्ट्रासाऊंड्समधूनच याबद्दल कळते.'
'किडनीचा हा आजार तुमच्या किडनीच्या कार्याचा गंभीर होऊ शकणारा आजार आहे. दुर्दैवाने माझी किडनी इतर किडनीप्रमाणे रक्त फिल्टर करत नाही. त्याचे प्रमाण सध्या 60 टक्के आहे, म्हणजेच मला हा दुसऱ्या स्टेजचा आजार आहे.'
त्याने पुढे सांगितले, 'या आजाराचे पाच स्टेज असतात. पहिली स्टेज इतकी गंभीर नसते आणि पाचव्या स्टेजला तुम्हाला ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस करावे लागते. सुदैवाने मला दुसऱ्या स्टेजचा आजार आहे, पण जर तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिले नाही, तर हा आजार गंभीर होऊ शकतो.'
ग्रीनच्या आईने सांगितले की जेव्हा त्यांना याबद्दल कळाले, तेव्हा त्यांना धक्का बसला होता. त्यांनी सांगितले की जेव्हा 19 आठवड्यांच्या गर्भवती असताना स्कॅन केले होते, तेव्हा त्यांना त्याच्या किडनीमध्ये समस्या असल्याचे समजले होते.
दरम्यान, ग्रीनला खेळताना फारसा या गोष्टींचा त्रास झालेला नाही. पण ग्रीनने एका सामन्याबद्दल सांगितले की किडनीच्या समस्यांमुळे एकदा त्याला क्रँम्प आल्याचे जाणवले होते.
त्याने सांगितले सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात झालेल्या वनडे सामन्यात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीही केली. त्यानंतर त्याला क्रॅम्प आले होते. त्यावेळी त्याला वाटले होते की हायड्रेशनमुळे त्याला क्रॅम्प आले असावेत, पण नंतर त्याला कळाले की किडनीच्या समस्येमुळे त्याला क्रॅम्प आले आहेत.
दरम्यान, इतक्या दिवसांनंतर याबद्दल सांगण्याबद्दल ग्रीन म्हणाला, 'मी एका जरी व्यक्तीला यामुळे मदत करू शकलो किंवा त्याबद्दल जागरुकता पसरवू शकलो, तरी ते फायद्याचेच असेल.'
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 84 षटकात 5 बाद 346 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 211 चेंडूत 164 धावांची खेळी केली. तसेच उस्मान ख्वाजाने 41 धावा केल्या, त्याचबरोबर ट्रेविस हेडने 40 धावांची खेळी केली.
आयपीएल 2023 मध्ये कॅमेरॉन ग्रीन मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. पण आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबरोबर ट्रेड केले आहे. त्यामुळे तो यंदा आरसीबीकडून आयपीएल खेळताना दिसेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.