आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुवर्णपदकाचा सामना चांगलाच रंगला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २११ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २० षटकांत १९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. युवा वैभव सूर्यवंशीने काही आकर्षक फटके खेळले, पण ९ चेंडूत १५ धावा करून तो बाद झाला. त्याच्या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर संजू सॅमसनही केवळ २ धावांवर माघारी परतला.
मात्र, दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या २८ चेंडूत ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत सात षटकार आणि तीन चौकार होते. मोठ्या शतकाकडे वाटचाल सुरू असतानाच त्याची विकेट गेली.
कर्णधार श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित वेगाने धावा करता आल्या नाहीत. अय्यरने २४ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी डावाला वेग दिला.
डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये दोन्ही फलंदाजांनी आक्रमक रूप धारण केले. तिलक वर्माने २२ चेंडूत नाबाद ५१ धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. शिवम दुबेनेही १५ चेंडूत २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत २११ धावांचा मजबूत स्कोअर उभारला.
२१२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी दबावाखाली ठेवले. कर्णधार साहिबजादा फरहान १० धावांवर बाद झाला, तर उस्मान खानला केवळ ३ धावा करता आल्या. माज सदाकतने १८ चेंडूत २३ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही.
सुरुवातीच्या विकेट्स झटपट गेल्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. त्यानंतर हसन नवाज आणि सॅम अयूब यांनी भागीदारी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी धावांचा वेग नियंत्रणात ठेवला. त्यामुळे आवश्यक धावगती वाढत गेली आणि पाकिस्तानवरील दबाव कायम राहिला.
भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अक्षरने चार षटकांत २९ धावा देत दोन बळी मिळवले. सुंदरनेही चार षटकांत २९ धावा देत दोन विकेट घेतल्या. शिवम दुबेने तीन षटकांत ३३ धावा देत दोन फलंदाजांना माघारी धाडले.
जसप्रीत बुमराहला या सामन्यात विकेट मिळाली नाही. त्याने चार षटकांत ३३ धावा दिल्या. अखेर पाकिस्तानचा संघ २० षटकांत १९२ धावांवर थांबला आणि भारताने सामना १९ धावांनी जिंकत सुवर्णपदक पटकावले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.