India Hockey team enter into the Final after beating Japan in Semis at Asian Champions Trophy 2023:
आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी (11 ऑगस्ट) भारतीय हॉकी संघाने जपानला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य सामन्यात भारताने 5-0 फरकाने पराभूत केले.
या सामन्यात भारताकडून आकाशदीप सिंग (19'), कर्णधार हरमनप्रीत सिंग (23'), मनदीप सिंग (30'), सुमीत (39'), सेल्वम कार्थी (51') यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवले.
या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघानी चांगला खेळ दाखवला होता. तसेच एकमेकांना गोल करण्यापासून रोखले होते. मात्र दुसरा क्वार्टर भारतासाठी चांगला ठरला. भारताला या क्वार्टरमध्ये आघाडी घेण्यात यश मिळाले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत आणि हार्दिक सिंग यांनी सर्कलपर्यंत चेंडू आणल्यानंतर आकाशदीपने शानदार मैदानी गोल नोंदवला. हा भारताचा पहिला गोल ठरला.
त्यानंतर लगेचच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर 23 व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत भारताची आघाडी वाढवली. हे क्वार्टर संपण्यासाठी काही सेकंदच राहिले असताना मनदीपने मैदानी गोल करत भारताचा तिसरा गोल नोंदवला. त्यामुळे भारताने हाफ टाईमपर्यंत भक्कम 3-0 अशी आघाडी घेतली होती.
त्यानंतर जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना चांगला खेळ केला. मात्र, सुमीतने 39 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. तसेच अखेरच्या क्वार्टरमध्ये सेल्वम कार्थीने 51 व्या मिनिटाला मैदानी गोल साधत भारताला 5 वा गोल करून दिला.
यानंतर मात्र जपानला पुनरागमन करणे कठीण बनले. अखेर भारताने ही आघाडी कायम ठेवली. तसेच भारताच्या बचावफळीने जपानला शेवटपर्यंत एकही गोल करू दिला नाही. त्यामुळे भारताला हा सामना सहज जिंकता आला. दरम्यान, भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेश याचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
दरम्यान, जपानविरुद्ध विजय मिळवल्याने भारतीय संघ अपराजित राहत या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेच्या साखळी फेरीत केवळ जपानविरुद्धच भारताला विजय मिळवता आला नव्हता. साखळी फेरीत जपानविरुद्ध भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पण आता उपांत्य फेरीत भारताने जपानला पराभवाचा धक्का दिला असून विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केले आहे.
अंतिम सामन्यात आता भारताचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. मलेशियाने उपांत्य सामन्यात कोरियाला 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात 12 ऑगस्ट रोजी चेन्नईतच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल.
तसेच जपान आणि कोरिया यांच्यात 12 ऑगस्ट रोजी चेन्नईतच भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या स्थानासाठी सामन्याला सुरुवात होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.