Shikhar Dhawan reacted on miss out from India cricket squad for Asian Games 2023:
आशियाई क्रीडा स्पर्धा यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत यंदा क्रिकेट स्पर्धाही खेळवली जाणार असून भारताचा संघही यासाठी जाहीर करण्यात आला आहे. याबद्द भारताचा सलामीवीर शिखर धवनने प्रतिक्रिया दिली आहे.
शिखर धवनने त्याला या स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी न मिळाल्याने धक्का बसल्याचे सांगितले आहे, पण त्याचबरोबर त्याला पुनरागमाची आशाही आहे.
बीसीसीआयच्या निवड समीतीने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे.
तसेच संघात यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा या युवा खेळाडूंसह शिवम दुबे, आवेश खान, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर अशा भारताकडून यापूर्वी खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
तथापि, या संघाची निवड होण्यापूर्वी शिखर धवनला या स्पर्धेत भारताच्या नेतृत्वाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. त्याने यापूर्वीही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा अधिक होती. मात्र, त्याला या संघातच संधी देण्यात आली नाही.
याबद्दल पीटीआयशी बोलताना शिखर म्हणाला, 'जेव्हा माझे नाव संघात नव्हते, तेव्हा मी थोडा चकीत झालो होतो. पण त्यानंतर मी विचार केला की कदाचीत त्यांची विचार प्रक्रिया थोडी वेगळी असेल आणि तुम्हाला आहे ते स्विकारावे लागेल. मी आनंदी आहे की ऋतू संघाचे नेतृत्व करणार आहे आणि अनेक युवा खेळाडू संघात आहेत. मला खात्री आहे की ते चांगली कामगिरी करतील.
शिखरने डिसेंबर 2022 मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. पण तरी त्याने अद्याप पुनरागमनाची आशा सोडलेली नाही.
याबद्दल तो म्हणला, 'मी नक्कीच तयार आहे, त्याचमुळे मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. मग 1 टक्के असो किंवा 20 टक्के, पण संधी नेहमीच असते. मी अजूनही ट्रेनिंग घेत आहे आणि अजूनही खेळाची मजा घेत आहे. याच गोष्टी माझ्या हातात आहेत. जे काही निर्णय ते घेतील, मी त्याचा आदर ठेवेल.'
शिखर पुढे म्हणाला, 'मी माझ्या भविष्याबद्दल कोणत्याही निवडकर्त्याशी बोललेलो नाही. मी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जात असतो. तेथील सुविधा चांगल्या आहेत. एनसीएने माझ्या कारकिर्दीला आकार दिला आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.'
त्याचबरोबर पंजाब किंग्सचे आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याबद्दल तो आनंदी असल्याचेही त्याने सांगितले.
तो म्हणाला, 'मी सध्या खूश आहे. माझे शानदार कारकिर्द घडली आणि मी भारतीय संघासाठी योगदान देऊ शकलो. सध्याच्या मी एक एक वर्षाचा विचार करत आहे. शारिरीकरित्या मी तंदुरुस्त आहे आणि मला पंजाब किंग्ससाठी आयपीएल जिंकायची आहे आशा आहे की पुढच्या वर्षी मी ते करेल.'
दरम्यान, बीसीसीआयच्या निवड समीतीने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी युवा संघ निवडला आहे. तसेच यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे की या स्पर्धेचा आणि वर्ल्डकप 2023 या स्पर्धेचा कालावधी साधारण एकत्र आल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी निवड केली जाणार नाही.
या स्पर्धेत पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान टी20 प्रकारात खेळली जाणार आहे.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)
राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.