Anushka Sharma Wishes Virat Kohli on His 35th Birthday:
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रविवारी (5 नोव्हेंबर) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मानेही त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, तिने तिच्या पोस्टमध्ये साल 2011 मधील एक बातमीही शेअर केली आहे, ज्यामुळे तिची पोस्ट चर्चेत आहे.
अनुष्काने विराटला शुभेच्छा देताना त्याने 2011 साली इंग्लंडविरुद्ध झिरो बॉलवर घेतलेल्या विकेटची बातमी शेअर केली आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये झिरो बॉलवर विकेट घेणारा पहिलाच क्रिकेटपटू आहे.
तसेच त्याचे काही अन्य फोटोही शेअर केले आहेत. तसेच तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की 'तो खरंच आयुष्यातील कोणत्याही भूमिकेत विलक्षण आहे. पण तरीही शिरपेचात मानाचे तुरे रोवणे सुरूच आहे. मी नेहमीच तुझ्यावर, तू कोणत्याही आकारात, प्रकारात आणि कसाही असला तरी सर्वप्रकारे प्रेम करत राहिल.'
विराटने त्याच्या टी20 कारकिर्दीत पहिल्यांदाच 31 ऑगस्ट 2011 रोजी इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डला झालेल्या सामन्यात गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीची सुरुवात इतकी अनोखी झाली की कोणीही याबद्दल विचार करणार नाही.
त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत गोलंदाजीची सुरुवात झिरो बॉलवर विकेट घेऊन केली होती. झिरो बॉलवर विकेट हे फक्त एकतर नो-बॉलवर किंवा वाईड बॉलवर शक्य आहे.
त्यातही नो-बॉलवर घेतलेल्या विकेटचे श्रेय गोलंदाजाला मिळत नाही. पण वाईड बॉलवर फलंदाज यष्टीचीत किंवा हिट विकेट होऊ शकत असल्याने त्याचे श्रेय गोलंदाजाला दिले जाते. मात्र हा चेंडू वैध ठरत नाही.
तर झाले असे की इंग्लंडकडून ओएन मॉर्गन आणि केविन पीटरसन फलंदाजी करत असताना भारताचा तत्कालिन कर्णधार एमएस धोनीने विराटला गोलंदाजी दिली. त्यापूर्वी विराटने कधीही गोलंदाजी केली नव्हती.
विराटने पहिलाच चेंडू वाईड टाकला, त्याचवेळी पीटरसन शॉट खेळण्यासाठी पुढे आला, पण तो चूकला आणि बॉल मागे यष्टीरक्षण करणाऱ्या धोनीकडे गेला. धोनीनेही चपळाई दाखवत स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे पीटरसन यष्टीचीत झाला.
त्यामुळे विराटला त्याच्या टी20 कारकिर्दीतील पहिली विकेटही मिळाली, तेही वैध नसलेल्या चेंडूवर. त्याचमुळे ज्यावेळी विराटने ही विकेट घेतली, त्यावेळी त्याची गोलंदाजीची आकडेवारी 0-0-0-1 अशी दिसत होती.
दरम्यान, तो सामना भारताने 6 विकेट्सने पराभूत झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 165 धावांची खेळी केली. इंग्लंडने 166 धावांचे आव्हान 3 चेंडू राखून पूर्ण केले होते. विराटने या सामन्यात एकूण 3 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत एक विकेट घेतली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.