तपश्चर्येच्या मंदिरात भ्रष्टाचाराची वाळवी! 'कला अकादमी'च्या विश्वासार्हतेचे 'थडगे' कुणी बांधले?

Kala Academy: लाभासाठी योजनाबद्ध कटकारस्थान रचून फेरफार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच अधिकाराचा वापर करून लाचलुचपत गुन्ह्यात सहभागी होणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा गुन्हा आहे.
Kala Academy
Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

लाभासाठी योजनाबद्ध कटकारस्थान रचून फेरफार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच अधिकाराचा वापर करून लाचलुचपत गुन्ह्यात सहभागी होणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा गुन्हा आहे. असले अश्‍लाघ्य प्रकार करण्याऱ्या कलेच्या सर्व दरोडेखोरांची जागा तुरुंगातच असायला हवी!

शाळेत असताना, सजीव व निर्जीव गोष्टी यांची यादी आम्ही शिकलो. निर्जीव गोष्टींना आवाज करता येत नाही, त्यामुळे या गोष्टी माणसाशी बोलू शकत नाहीत अशी आमची धारणा आहे. वास्तुविशारदाचे मत असे की वास्तू (इमारती) निर्जीव असल्या तरी त्या मानवाशी संकेत स्वरूपात बोलतात. मागील दोन चार वर्षे कला अकादमीची वास्तू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ढासळते आहे, व त्याची दुरुस्ती केली तरी दुसरीकडे कुठेतरी कोसळते आहे.

गंमत म्हणजे मोठमोठ्या तपासण्या करूनही त्याचे नेमके कारण सापडत नाही. अशावेळी जर माननीय दिगंबर कामत कला व संस्कृती खात्याचे मंत्री असते तर त्यांनी एक प्रसाद पाकळी घेऊन, त्या मागचे कारण जाणून घेण्याचा एका प्रयत्न केला असता. दै. ‘गोमन्तक’ने केलेला गौप्यस्फोट व त्या गौप्यस्फोटाचे स्वरूप पाहता, येथे भ्रष्टाचाराचा ‘भष्टकार’ (विटाळ) चालू आहे’ असा प्रसाद, कौल नक्कीच झाला असता.

या कला अकादमीच्या वास्तूला ‘देवाच्या झाडा’चे पावित्र्य नक्की प्राप्त झाले असणार, कारण या वास्तूचे रचनाकार कै. चार्ल्स कुरिया हे भारतीय वास्तुशास्त्राचे पुरस्कर्ते होते. त्यांचे या विषयावरचे विचार मी स्वत: एकले आहेत म्हणून मला असे वाटते, कला अकादमीची वास्तू आम्हाला ओरडून ओरडून सांगत होती, की येथे कलेवर दरोडे घालणारे दरोडेखोर मुक्त संचार करीत आहेत.

Kala Academy
Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

ती वास्तू बिचारी आम्हाला सांगत असावी की हे दरोडेखोर माझ्याच मांडीवर बसून माझ्या लेकीचे म्हणजे कलेचे सर्वस्व लुटण्याचे नियोजनद्ध कटकारस्थान करत आहेत. ती बिचारी आम्हाला सांगत असावी की, ‘यांची योग्य जागा आपल्या मांडीवर नसून ती एक तर पोलिस कोठडीत नाही तर कायमची तुरुंगात आहे, कृपया त्यांना तेथे पाठवा’.

अभियंत्यांनी कला अकादमीच्या इमारतीचे दोष, दगड-सिमेंट-स्टील यात शोधले असावेत, पण या मागे ‘भश्टकारा’(विटाळा)चे कारण असू शकते, हे त्यांच्या अभ्यासक्रमात नसावे. दै. ‘गोमन्तक’ने केलेला गौप्यस्फोट किती खरा व किती खोटा हे सरकार ठरवेलच, पण या गौप्यस्फोटात ज्या दोघा कला अकादमी कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत, त्यांना नजीकच्या काळात तुरुंगात जावे लागले तर आश्चर्य नको.

तुरुंगात पाठवायचे असेल गुन्हा नोंद करण्यास पात्र अशा प्रकारचे वर्तन झाले आहे, हे सिद्ध करावे लागते. दै. ‘गोमन्तक’ने केलेला गौप्यस्फोट किती खरा व किती खोटा, यावर चर्चा न करता, असे होणे शक्य आहे का यावर चर्चा करूया. ते करण्यासाठी या गौप्यस्फोटात समोर आलेली दोन नावे व त्यांचे कला अकादमीतले स्थान याचा येथे उल्लेख मला टाळणे शक्य नाही. गौप्यस्फोटात कथन केलेला प्रकार ‘झालाच असावा’ किंवा ‘झालाच नसावा’ असा माझा दावा नाही, हे मी आधीच स्पष्ट करतो.

यात समोर आलेले पहिले नाव म्हणजे येथे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर. मी मागे कला अकादमीवर तीन परखड लेख लिहिले होते, त्यात नाव न घेता कला अकादमीच्या काही कर्मचाऱ्यांचे संदर्भ दिले होते, त्यात या प्रदीप गावकरचाही समावेश होता. यात एक आरोप आहे की प्रदीप गावकर यांनी मद्याची बाटली देऊ केली. अशा ‘बाटल्या देण्याचा’ प्रकार कै. विष्णू वाघांच्या काळापासून सुरू आहे.

Kala Academy
Goa Shigmotsav: शिमगोत्सव मेळांना 300 कोटींचे अर्थसाह्य देणार! मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

त्यावेळी, माझ्याकडे हा विषय पोहोचला होता तो काही नाट्यशाळेच्या विद्यार्थ्यांकडून. त्यावेळी होणाऱ्या अधिकृत ओल्या पार्ट्यांसाठी या मुलांना ‘वेटर’ म्हणून वापरायचे. मी यावर विष्णू वाघांकडे चर्चा केली. पार्ट्या बंद झाल्या नाहीत; पण या मुलांना ‘वेटर’ म्हणून वापरायचे बंद झाले. सुरुवातीच्या काळात प्रदीप गावकर हे विष्णू वाघांचे विश्वासू अधिकारी होते, पण नंतरच्या काळात ते प्रदीप गावकरांना ‘विश्वासघातकी’ म्हणायचे. तसेच ‘हे पदावर असेपर्यंत कला अकादमीच्या कार्यक्रमात विकास होणे अशक्य आहे’, असे त्यांचे मत होते.

आता या प्रदीप गावकरवर झालेल्या आरोपाला विष्णू वाघांच्या कार्यकाळातील घटनांशी जुळवून पाहिल्यास, या व्यक्तीकडून असे घडणे शक्य आहे. युगांक प्रकरणात मी नाव न घेता या व्यक्तीचा संदर्भ दिला होता, याचे कारण म्हणजे ही व्यक्ती खूप ‘मेन्युप्युलेटीव्ह’ (फेरफार करणारी) आहे असे विष्णू वाघांचे मत होते.

आता युगांक व प्रदीप गावकर हे मराठीप्रेमींच्या द्वेषाबाबतीत एका पंक्तीतले. युगांकला बक्षिसाच्या बदल्यात पुरस्कार देण्याचे सुपीक डोके याचेच असावे असा माझा अंदाज होता. मी कला अकादमीच्या नूतन अध्यक्षांशी चर्चा केली तेव्हा ‘ही व्यक्ती दुसऱ्या कुणाला बोलायलाच देत नाही’, हे त्यांचाचकडून कळले. माणूस हा सवयींचा गुलाम असतो. महानंदला खुनांची सवय झाली होती म्हणून त्याने एकेक करत सोळावा खूनही केला, ज्यात तो सापडला. गौप्यस्फोटात दावा केला आहे त्याप्रमाणे प्रदीप गावकर जर खरोखरच सापडला असेल, तर लक्षात ठेवा की ही हेराफेरी पहिलीच नसेल, तर त्यात तो रुळलेला असेल.

दुसरे नाव आहे ते सुशांत नायक यांचे. खरे तर कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नसावा असा नियम होता. पण तो विष्णू वाघांच्या काळात रद्द करण्यात आला. विष्णू वाघांना ओल्या पार्ट्यांत गुंतवून काही लोकांनी आपले अनेक कार्यभाग साधून घेतले, त्यातलाच हाही एक प्रकार.

आधीच दामोदर मावजोंना ज्ञानपीठ कसे मिळाले यावर लोक आपापले अंदाज व्यक्त करीत आहेत, तशातच त्यांचे नाटक मराठी स्पर्धेत आणून, पहिले बक्षीस देऊन ते महाराष्ट्रात नाचावयाचे, हे ‘कोकणी षड्यंत्र’ उघडे पडले आहे. सुशांत नायकाचा हा पहिलाच प्रयत्न नाही. दोन वर्षांपूर्वी त्याच्या नाटकाला दुसरे स्थान मिळाले व पहिले एकच नाटक महाराष्ट्रात अंतिम फेरीत पाठवायचे, हा नियम बदलून त्या वर्षापुरता पहिली दोन नाटके पाठवायचा नियम आणला व आपले नाटक हे महाराष्ट्रात नेले. या कामात त्याला प्रदीप गावकरने मदत केली व ते पाप मंत्र्याच्या माथ्यावर फोडले.

परीक्षकांना प्रत्येकी पन्नास हजार या हिशोबाने दीड लाख लाच देणे व्यावहारिक आहे का, हा प्रश्‍न आहे. हो, प्रदीप गावकर व सुशांत नायक यांना दोघांना मिळून हे व्यावहारिक आहे. बक्षिसाचे एक लाख, व पहिल्या क्रमांकाच्या नाटकाचे कला अकादमीच्या वतीने वेगवेगळ्या जागी प्रयोग करून उरलेले ते पैसे दोघे मिळून उभे करू शकतात हा सरळ हिशोब आहे. हा आर्थिक अफरातफरीच्या कटकारस्थानाचा प्रकार आहे.

थोडक्यात, पूर्ण लाभासाठी योजनाबद्ध कटकारस्थान रचून फेरफार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच अधिकाराचा वापर करून लाचलुचपत गुन्ह्यात सहभागी होणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा गुन्हा आहे. समोर आलेली सकृद्दर्शनी माहिती, या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पुरेशी आहे. असले अश्‍लाघ्य प्रकार करण्याऱ्या कलेच्या सर्व दरोडेखोरांची जागा तुरुंगातच असायला हवी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com