Virat Kohli Career Journey:
विराट कोहली हे नाव काही कोणा क्रिकेटप्रेमीसाठी नवीन राहिलेलं नाही. क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंमध्ये विराटचं नाव हमखास घेतलं जातं आणि यापुढेही नेहमीच घेतलं जाईल. खरंतर विराट कोहली आता फक्त नाव नाही, तर ब्रँड झालाय. इतकं यश विराटने त्याच्या कारकिर्दीत मिळवलंय. याच विराटचा प्रवास क्रिकेटचा किंग होण्यापर्यंत झाला तरी कसा?
तर गोष्ट आहे ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत विराटचा जन्म झाला. घरात मोठा भाऊ आणि बहिण होते, त्यामुळे विराट भावंडामध्ये सर्वात लहान. त्याचे वडील प्रेम कोहली १९९८ साली म्हणजे साधारण विराट ९-१० वर्षांचा असताना त्याला घेऊन वेस्ट दिल्ली क्रिकेट ऍकेडमीमध्ये गेले आणि तिथेच सुरू झाला विराटचा क्रिकेटचे धडे गिरवण्याचा प्रवास.
तिथे त्याला राज कुमार शर्मा हे प्रशिक्षक भेटले. आजही विराट त्यांना प्रचंड मान देतो. त्याने २०१४ मध्ये राजकुमार सरांना शिक्षक दिनी कारही गिफ्ट दिली होती. राज कुमार सरांनीही विराटला अगदी मुलासारखं शिकवलं. त्यांनी विराटमधलं कौशल्य हेरलं आणि त्याला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.
विराटनेही हळुहळू प्रगती करत वयोगटातील क्रिकेट गाजवण्यास सुरुवात केली. त्याला तिथे भारतीय गोलंदाज अतुल वासन यांचेही मार्गदर्शन मिळाले. बघता बघता विराटने २०06 साली वयाच्या १७ व्या वर्षी दिल्लीच्या वरिष्ठ संघात स्थानही मिळवले.
तो दिल्लीच्या वरिष्ठ संघाकडून १८ फेब्रुवारी २००६ रोजी सर्विसेस विरुद्ध पहिला लिस्ट ए क्रिकेट सामना खेळला. त्यानंतर काही महिन्यातच त्याने रणजी संघातही स्थान मिळवले. तो नोव्हेंबर २००६ मध्ये तमिळनाडूविरुद्ध दिल्लीकडून पहिला रणजी सामना खेळला.
पण विराटमधली मानसिक कणखरता पहिल्यांदा सर्वांनी पाहिली ती जेव्हा तो पहिलाच रणजी हंगाम खेळत होता, त्यावेळी दिल्लीला कर्नाटकविरुद्ध सामना सुरू होता. त्यासामन्याचा दिवस संपला, त्यावेळी विराट ४० धावांवर फलंदाजी करत होता. दिल्लीला फॉलोऑन टाळायचा होता. अशातच विराटला त्याचे वडील गेल्याची बातमी कळाली.
असे असतानाही त्याने प्रचंड कणखरता दाखवत दुसऱ्या दिवशी फलंदाजी केली आणि साधारण ९० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने दिल्लीने फॉलोऑन टाळला. त्यानंतर विराट वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी गेला होता. त्या घटनेने विराटमधली क्षमता सर्वांनाच समजली. विराटने पहिल्या रणजी हंगामात ६ सामन्यात २५७ धावा केल्या.
विराटनेही नंतर क्रिकेट अगदीच गंभीरपणे घेतलं आणि २००८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये स्थानही मिळवलं आणि भारतीय संघाचे नेतृत्वही केलं. त्याने २००८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विजयही मिळवला.
त्या विजेतेपदानंतर विराट पहिल्यांदा क्रिकेटप्रेमींच्या पहिल्यांदा नजरेत आला. हा पोरगा आहे तरी कोण अशी चर्चा सुरू असतानाच त्याने भारताच्या वरिष्ठ संघात पाऊल टाकलं.
त्यावेळी संघात होते सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग असे दिग्गज आणि कर्णधार होता एमएस धोनी. अशा अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या भारतीय संघात १९ वर्षांच्या विराटने प्रवेश केला होता, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हताच.
विराटला १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध डंबुला येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्यातच पहिल्याच सामन्यात सलामीला फलंदाजीची संधी मिळाली आणि दुसऱ्याच चेंडूवर साथीदार असलेल्या गौतम गंभीरचा त्रिफळा चामिंडा वासने उडवला.
त्यानंतर कसंबसे विराटने २२ चेंडू खेळताना १२ धावा काढल्या आणि तो कुलसेकराच्या चेंडूवर पायचीत झाला. पण त्यानंतर विराटने मागे पाहिले नाही आणि संघव्यवस्थापनानेही त्याच्यावर विश्वास दाखवला.
विराटने पहिलं अर्धशतक त्याच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध कोलंबोला खेळताना ठोकले. त्यानंतरही त्याने आणखी २ अर्धशतके ठोकली. पण वर्ष होऊन गेलं आणि १३ सामनेही खेळून झाले, तरी शतक काही आले नव्हते.
अखेर २४ डिसेंबर २००९ रोजी कोलकाताच्या इडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्धच विराटने पहिले शतक ठोकले. त्यानंतर त्याच्या शतकांची जी रेलचेल चालू झाली ती आजही अगदी १५-१६ वर्षे उलटून गेल्यानंतरही कायम राहिली. वनडेत संघातील स्थान पक्कं केल्यानंतर विराटने २०१० मध्ये भारताच्या टी२० संघाही स्थान मिळवलं.
तो १२ जून २०१० रोजी झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. त्याला २०११ साली भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधीही मिळाली. महत्त्वाचे म्हणजे भारताकडून या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात त्याने शतकही ठोकलं.
कसोटी पदार्पणासाठी मात्र विराटला काही काळ प्रतिक्षा करावी लागली. पण ही संधीही त्याला मिळाली. त्याने २०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात किंग्स्टनला पहिला कसोटी सामना खेळला. विराट त्याच्या खेळाने अनेकांना प्रभावित करत होता.
यादरम्यान २०१४ साली इंग्लंड दौऱ्यात त्याला मोठं अपयश आलं. पण असं असतानाही त्याच्यावरील संघव्यवस्थापनेचा विश्वास राहिला. विशेष म्हणजे २०१४ च्या अखेरीस एमएस धोनीने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्वपद सोडल्यानंतर कर्णधारपदाची माळ विराटच्याच गळ्यात पडली. या जबाबदारीने जणू विराटला अचानक मोठं केलं.
विराटने स्वत:शीच पक्कं ठरवत फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याने एकप्रकारे फिटनेसच्या बाबतीत भारतीय संघात क्रांतीच घडवली असे म्हणता येईल. त्याच्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूच आपल्या फिटनेसकडे अगदी बारकाईने लक्ष देऊ लागला.
विराटचं आक्रमक कर्णधारपद भारतासाठी कसोटीत प्रचंड महत्त्वाचं ठरलं. त्याने भारताला त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर तर नेलच, त्याच्या नेतृत्वाखाली जवळपास ३-४ वेळा भारतीय संघ कसोटीत अव्वल क्रमांकावर राहिला.
अनेकांना माहित नसेल की विराट हा भारताचा कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधारही आहे. खरंतर भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
विराटने कर्णधारपदाचा कोणताही परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ दिला नव्हता. त्याला २०१७ च्या सुरुवातीला भारताच्या वनडे आणि टी२० संघाचेही कर्णधारपद मिळाले. पण वनडेत त्याला कर्णधार म्हणून पहिलीच मोठी स्पर्धा समोर आली ती चॅम्पियन्स ट्रॉफी. पण त्यानेही चांगले नेतृत्व करत भारताला अंतिम सामन्यापर्यंत नेले. मात्र अंतिम सामन्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला.
दरम्यान, विराटने पाहाता पाहाता नोव्हेंबर २०१७ मध्ये कोलकातालाच श्रीलंकेविरुद्ध ५० वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. हा विराटसाठी एक मोठा मैलाचा दगड होता. विराटने ज्या वेगात धावा केल्या होत्या, ते थक्कं करणारं होतं.
पण म्हणतात ना प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एकतरी वाईट काळ येतोच आणि विराटने तर १० वर्षात इतकं मोठं यश मिळवलं होतं, त्याच्याबाबतही तेच झालं. २०१९ पासून विराटचा तो कठीण काळ सुरू झाला.
कधी धावा होत नव्हत्या, कधी धावा झाल्या तरी शतक होत नव्हतं. कधी कर्णधार म्हणून अपयश येत होतं. अगदी २०१९ वर्ल्डकप-२०२१ टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नॉकआऊटचे सामनेही खेळले, पण पदरी निराशा आली.
त्याने या दरम्यान भारताचे कर्णधारपद सोडले, काही वाद असल्याचंही समोर आलं. बऱ्याच चर्चा झाल्या. अगदी तोही मान्य करतो की हा काळ खरंच कठीण होता. अगदी मानसिक दबावही आल्याचं त्याने सांगितलं. पण याच काळात एक गोष्ट होती, ज्याने त्याला ताकद दिली, ती म्हणजे त्याचं कुटुंब. त्याची पत्नी अनुष्का त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. विराटही मान्य करतो की त्याच्या आयुष्यात अनेक चांगले बदल अनुष्कामुळे घडले. याच काळात त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी वामिकाचे आगमन झाले.
काहीवर्षांपूर्वी उनाड वाटणारा विराट हळुहळू परिपक्व व्हायला लागला. विराटमधील झालेले बदल अनेकांना जाणवायला लागले होते. पण म्हणतात ना अपयश आलं की ते चौहुकडून येतं,तसंच विराटचं क्रिकेटबाबत झालं होतं.
मात्र, रात्रीनंतर सूर्य हा उगवतोच तसे अखेर तब्बल १००० दिवसांनंतर म्हणजेच ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विराटने टी२० आशिया चषक २०२२ स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकलं आणि ७० व्या शतकानंतरच्या ७१ व्या शतकाची चाहत्यांची आणि त्याचीही प्रतिक्षा अखेर संपली.
मोठ्या खेळाडूंबाबत हे नेहमीच म्हटलं जातं की एकदा त्यांना लय सापडली की ते ती चटकन पकडतात. विराटनेही तेच केलं. त्या ७१ व्या शतकानंतर विराटने गेल्या वर्षभरात जवळपास १० शतकं ठोकली, ज्यात आयपीएल २०२३ मधील २ शतकंही आहेत.
विराट २०११ नंतर आता पुन्हा १२ वर्षांनी भारतात वर्ल्डकप खेळतोय. त्यावेळी तो संघातील सर्वात युवा खेळाडू होता आणि आता तो संघातील अनुभवी खेळाडू आहे. या वर्षात अनेक बदल झाले. आज विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ हजारांहून अधिक धावा आहेत. यामध्ये १३० हून अधिक अर्धशतके आणि तब्बल ७८ शतकांचा समावेश आहे.
विराट आजही उच्च दर्जाचा खेळ करतोय. विशेष म्हणजे ज्या इडन गार्डन्सवर पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं, ५० वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं, त्याच इडन गार्डन्सवर विराट त्याच्या ३५ व्या वाढदिवशी वर्ल्डकपचा सामना खेळणार आहे. या सामन्यातही त्याने शतक पूरण केले, तर त्याच्यासाठी एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखेच असेल. कदाचीत म्हणूनच विराट आज १६ वर्षांनंतर दिल्ली का छोरा आता क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जातोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.