Akash and Nita Ambani reacted on Hardik Pandya's return to Mumbai Indians ahead of IPL 2024:
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. याचदरम्यान, सोमवारी (27 नोव्हेंबर) एक मोठी बातमी समोर आली की गुजरात टायटन्सने कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सबरोबर ट्रेड केले आहे.
त्याचमुळे आता आयपीएल 2024 मध्ये हार्दिक मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. हे ट्रेडिंग म्हणजे हार्दिकने मुंबई संघात घरवापसी मानली जात आहे. हार्दिक मुंबईकडून 2015 ते 2021 दरम्यान सात हंगाम खेळला आहे. त्याने आयपीएलची सुरुवातही 2015 साली मुंबईकडून केली होती.
दरम्यान, त्याच्या संघात परत येण्याबद्दल मुंबई इंडियन्सचे मालक असलेल्या आकाश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हार्दिकला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये पाहून मला खूप आनंद होत आहे. ही आनंददायी घरवापसी आहे. तो ज्या संघाकडून खेळतो, त्या संघाला समतोलता प्रदान करतो. हार्दिकचा मुंबई इंडियन्सबरोबरचा पहिला कार्यकाळ खूपच यशस्वी होत आणि आम्हाला आशा आहे की तो दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल.आकाश अंबानी
हार्दिकचे पुन्हा कुटुंबात स्वागत करताना आनंद होत आहे. आमच्या मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचे हे खूप खास रियुनियन आहे. मुंबई इंडियन्सने शोधलेला एक युवा प्रतिभाशाली खेळाडू ते आता भारतीय संघाचा स्टार, हार्दिकने खूप मोठा प्रवास केला आहे. आम्ही त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या भविष्यासाठी उत्सुक आहोत.निता अंबानी
हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 दरम्यान खेळताना 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान, त्याने मुंबईकडून चार वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले. मात्र आयपीएल 2021 नंतर मुंबईने त्याला करारमुक्त केले होते.
त्यामुळे त्याला आयपीएल 2022 पूर्वी गुजरात टायटन्सने संघात घेत कर्णधार केले. हार्दिकनेही गुजरातचे शानदार नेतृत्व करत 2022 आणि 2023 असे दोनही हंगामात संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले. 2022 साली आयपीएलचे विजेतेपही मिळवले, मात्र 2023 साली गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान आता हार्दिक पुन्हा मुंबईत परतला आहे. त्याच्या ट्रेडिंगसाठी मुंबईने 15 कोटी रुपये मोजले असल्याचे म्हटले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.