RCB New Owners Aditya Birla Group: आयपीएल 2026 चा थरार सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघातून एक मोठी बातमी समोर आली. या लोकप्रिय फ्रँचायझीला आता आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने विकत घेतले. हा व्यवहार 1.78 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1660 कोटी रुपयांना झाला असून यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली.
2008 मध्ये जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा विजय माल्या यांनी आरसीबीला साधारण 454 कोटी रुपयांत विकत घेतले होते. गेल्या 19 वर्षांत या फ्रँचायझीच्या मूल्यांकनात तब्बल 1495% वाढ झाली. आता या संघाचे नवे चेअरमन म्हणून आर्यमन बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली असून ते स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू राहिलेले आहेत.
आर्यमन बिर्ला हे केवळ एक उद्योगपती नसून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ते प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचे सुपुत्र आहेत. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या आर्यमन यांनी मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळले आहे. 2017 मध्ये रणजी करंडकातून त्यांनी पदार्पण केले आणि 2018 मध्ये ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी खेळत पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले होते. 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी 27.60 च्या सरासरीने 414 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, आरसीबीचे विद्यमान कर्णधार रजत पाटीदार याच्यासोबत त्यांनी मध्य प्रदेशसाठी सलामीवीर म्हणून अनेक सामने खेळले आहेत, त्यामुळे संघ व्यवस्थापनात त्यांचे पाटीदारसोबतचे जुने नाते महत्त्वाचे ठरेल.
आर्यमन बिर्ला यांना आयपीएलचाही (IPL) अनुभव आहे. 2018 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्यांना 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. मात्र, त्यांना कधीही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. 2020 च्या आयपीएलपूर्वी राजस्थानने त्यांना रिलीज केले आणि त्यानंतर मानसिक आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए आणि बेज बिझनेस स्कूलमधून ग्लोबल फायनान्समध्ये मास्टर डिग्री मिळवली.
सध्या आर्यमन बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहांतर्गत ई-कॉमर्स, रिटेल आणि स्टार्टअप क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. क्रिकेटमधील तांत्रिक समज आणि बिझनेस क्षेत्रातील दांडगा अनुभव यामुळे ते आरसीबीला एका नव्या उंचीवर नेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता एका माजी क्रिकेटपटूच्या हाती संघाची धुरा आल्याने आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नव्या मालकीमुळे आगामी हंगामात संघात काही महत्त्वाचे बदल आणि नव्या धोरणांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.