खरी कुजबुज: एका उमेदवारीवर दोघांचा दावा!

Khari Kujbuj Political Satire: आमदारकीची स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. मात्र, सगळ्यांच्याच नशिबी आमदारकी नसते, हेही तेवढेच खरे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

एका उमेदवारीवर दोघांचा दावा!

आमदारकीची स्वप्ने सगळ्यांनाच पडतात. मात्र, सगळ्यांच्याच नशिबी आमदारकी नसते, हेही तेवढेच खरे. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारी दोघांनी दावा केला आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून निवडणूक लढविलेले भाजपचे मंडळ उपाध्यक्ष सुदेश भिसे यांनी कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूने भाजपचे स्थानिक नेते विशाल देसाई यांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. विशाल हे पालिका निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन निवडून आले होते. शिवाय भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांचे पक्षात स्थान आहे. स्वातंत्र्यसैनिक तथा ओपिनियन पोलचे हिरो शाबू देसाई यांचे सुपुत्र असलेले विशाल देसाई यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, राजकीय आरक्षण लागू झाल्यास भाजप या मतदारसंघात बाहेरील उमेदवारही आयात करू शकतो. आता पाहूया युरी आलेमाव यांना चॅलेंज देण्यासाठी भाजप मतदारसंघाबाहेरील तोडीचा उमेदवार आयात करतो, की विशाल किंवा भिसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते ते.

शनिवारचा न्याय, पुढची तारीख!

महसुली खटल्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा म्हणून सरकारने शनिवारीही महसुली न्यायालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता तरी ‘तारखेवर तारीख’ या कटकटीतून सुटका होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, डिचोली मामलेदार कार्यालयातील शनिवारचा अनुभव काही वेगळेच सांगून गेला. महसुली खटल्यांच्या सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना संयुक्त मामलेदार आणि मामलेदारच उपस्थित नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. न्याय मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी पडली ती आणखी एक तारीख! सरकारने न्यायालय शनिवारी सुरू ठेवले, पण न्याय देणारेच सुट्टीवर असतील तर या निर्णयाचा उपयोग काय? तारीख बदलली, पण कारभार नाही! विशेष म्हणजे शनिवारच्या न्यायालयासाठी खटले निवडून ठरविणे आवश्यक असताना सरसकट तारखा देऊन बोळवण केल्‍याचेही स्पष्ट झाले आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

१० वाजता मनोजचे भाषण!

रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) प्रवेश केल्‍यानंतर मनोज परब यांनी पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात एक तासापेक्षा अधिक वेळ भाषण करीत पूर्वीचे सहकारी तथा आमदार वीरेश बोरकर यांच्‍यावर घणाघाती हल्ले चढविले. ‘आरजी’त परतलेला मनोज पूर्वीचाच असेल आणि गोव्‍याला हानी पोहोचवणाऱ्यांवर तो पूर्वीसारखाच तुटून पडेल, तो कुणालाही दयामाया दाखवणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. आता आरजी कार्यकर्ते आणि मतदारांच्‍या संपर्कात राहण्‍यासाठी रोज रात्री १० वाजता सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्‍याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. मनोजचा संवाद किती तासांचा असेल हे स्‍वतंत्रपणे सांगण्‍याची गरज नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या भाषणांना जनता सकारात्‍मक प्रतिसाद देणार? की सोशल मीडियावर नकारात्‍मक कमेंट्सचा पाऊस पडणार, हे पुढे पुढे दिसून येईलच...

प्रशिक्षित शिकाऊ, मोकळे कारकून!

शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षण आणखी वर्षभर वाढविण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र, कार्यालयांतील वास्तव वेगळेच! नव्या पिढीतील हे उमेदवार कौशल्ये पटकन आत्मसात करतात आणि मग कारकुनांचे कामही त्यांच्याच माथी मारले जाते. कारकून मात्र मोकळे! ‘मात्सो येता’ आणि दिवसभर गायब! नियमानुसार शिकाऊ उमेदवाराला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात ठेवता येत नाही. पण कारकून-अधिकाऱ्यांच्या ‘मिलीभगता’ने कागदावर विभाग बदलतो, प्रत्यक्षात जागा आणि काम तेच! काही ठिकाणी अधिकारीच अनेक विभाग सांभाळतात. त्यामुळे शिकाऊंचे प्रशिक्षण होते की कारकुनांना कायमस्वरूपी मदतनीस मिळतात, असा प्रश्न पडल्यास नवल ते काय?

दयाभाईंचे मौनव्रत...

पैंगीण जिल्हा पंचायतीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य दया पागी यांनी सध्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. मात्र, ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. दया हे पागी समाजाचे असून, काणकोणात त्यांच्या शब्दाला या समाजात मोठा मान आहे. ते स्वत: आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता नसली तरी ते नेमक्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याची उत्सुकता काणकोणकरांना लागून राहिली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. दया हे कॉंग्रेसमन आणि काणकोणात इजिदोर फर्नांडिस तसेच चेतन देसाई हे कॉंग्रेस उमेदवारीवर दावा सांगत आहेत. इजिदोर हे दयाचे राजकीय बॉस, तर चेतनबाब हे निकटवर्ती. त्यामुळेच तूर्त त्यांनी मौनव्रत स्वीकारले असावे, अशी चर्चा सुरू आहे. खरे खोटे तो देवच जाणे

निष्ठावंतांची धाकधूक वाढली

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये गेलेले केदार नाईक यांच्या पक्षांतराची सल साळगावमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही आहे. २०२७ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारसंघात ‘गोंय राखण अभियाना’च्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम तीव्र केली आहे. या भेटीगाठीदरम्यान, ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना नव्हे, तर पक्क्या निष्ठावंतालाच उमेदवारी द्या, पाच हजारांच्या मताधिक्याने जागा जिंकून आणू,’ असा निर्धार कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या वेळी चुकीच्या घोड्यावर लावलेला डाव आता ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत सावरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. मात्र, २०२२ मध्ये भाजपचे उमेदवार असलेले माजी आमदार जयेश साळगावकर यांनी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही एक चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पुन्हा आयात नेत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल का, असा संभ्रम कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. पाहुया, घोडेमैदान जवळच आहे.

दळवीच निवडून येवो!

फोंड्यातील नगरसेवक आणि फोंडा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी सध्या खटपट करणारे विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांनी मागील आठवड्यात सुमारे १५ बसेस भरून भाविकांना वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी पाठविले होते. हे सर्व भाविक आता फोंड्यात परतले आहेत. या भाविकांत महिलांची संख्या लक्षणीय अशी होती. दळवी यांचे आभार मानणारे व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत असून त्यातील काही महिलांनी देवाचे दर्शन घेताना आम्ही फोंड्यातून दळवीच निवडून येवो, अशी देवाकडे मागणी केली असल्याचे सांगितले. भाविकांनी देवाला घातलेले हे साकडे अपूर्वच्या कामी येईल ना?

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

शुभेच्छा फलकामागील गुपित काय?

सांताक्रूझ मतदारसंघात दिवाळीच्या काळात लागलेले नेत्यांचे शुभेच्छा फलक अजूनही झळकत आहेत. त्यापैकी महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि आग्नेल दा कुन्हा यांचे लावलेले फलक येथील लोकांना निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, असे बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केले असले तरी त्यांचे खंदे समर्थक ताळगावचे माजी सरपंच तथा सदस्य आग्नेल दा कुन्हा यांच्यासाठी तो मतदारसंघ बाबूश मिळवणार काय, असा सवाल आता त्यांच्या फलकामुळे उपस्थित होऊ लागला आहे. सध्या बाबूश यांनी सांताक्रूझमध्ये सुसज्ज संपर्क कार्यालयही तयार केले आहेच. त्यामुळे या प्रकारावरून कोणी कसा निष्कर्ष काढायचा तो काढला, तरी उत्तर स्पष्ट आहे. सुज्ञास सांगणे न लगे!

चर्चा बांगडा फेस्टिव्हलची

अलीकडेच साखळी येथे हौशी खवय्ये मंडळींनी चक्क बांगडा फेस्टिव्हल साजरा केला. खरे तर मासे हा गोमंतकीयांचा जीवाभावाचा विषय. ‘माशांशिवाय घास घशातून खाली उतरतच नाही’ असे सांगणारे अनेक दर्दी गोमंतकीय या महोत्सवामुळे भारावून गेले खरे. मात्र, या महोत्सवाची माहिती खूप कमी लोकांना मिळाली. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही, असे अनेकांनी सांगितले. या महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही हजेरी लावून बांगड्यांचा आस्वाद घेतला. आता मुख्यमंत्री महोदयांनी हा महोत्सव राज्यपातळीवर साजरा करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मत्स्यखवैय्यांची आग्रही मागणी आहे.

विजयचे दामबाबाकडे मागणे

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी दामोदर लिंगावर दीपोत्सवाचे आयोजन केले. तेव्हा त्यांनी दामबाबाचे दर्शन घेतले. त्यावेळी आपण देवाकडे काय मागितले हे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी सर्वांना अंधारातून उजेडाकडे न्यावे, अशी प्रार्थना केली. तसेच फातोर्डा मतदारसंघाचा जो माझ्याहस्ते विकास होत आहे, त्याला कोणीही आडकाठी आणू वा असू नये अशीही त्यांनी देवाकडे मागणी केली. आमदार विजयबाब विरोधात असूनसुद्धा फातोर्ड्याचा होत असलेला विकास कदाचित सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना रुचत नसावा, असे विजयबाब जाहीररित्या सांगतात. त्यांनी हा प्रश्न देवासमोर मांडला. मात्र, देवाने नेमका काय आशीर्वाद दिला असावा हे देवालाच माहीत, असे काही लोक गुणगुणत होते.

आतिषींना म्हणायचेय काय?

‘आप’च्या नेत्या आतिषी या मडगाव पोलिस ठाण्यावर आल्या आणि त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत तक्रारसुद्धा नोंदवली. याच बरोबर त्यांनी आमदार कामत यांना लक्ष्य केले व त्यांनी मडगावच्या मतदारांचा विश्वासघात केला, असे सांगितले. मात्र, त्यांनी गोवा फॉरवर्डसोबतच्या युतीसंदर्भात बोलण्याचे टाळले. युतीसंदर्भात विजय सरदेसाई काय तो निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले. यातून आतिषी यांना नेमके काय सांगायचे आहे, हे समजले नाही. विजय यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष सध्या कॉंग्रेससोबत युती करण्यास पुढे सरसावला आहे. कॉंग्रेससोबत युती निश्र्चित झाल्यावर ‘आप’सुद्धा या युतीत सामील तर होणार नाही ना, अशी शक्यता लोक व्यक्त करताना दिसत आहेत.

प्रतिमा काँग्रेसमध्ये रमल्या खऱ्या; पण...

कॉंग्रेस पक्षात घरवापसी केलेल्या प्रतिमा कुतिन्हो या पक्षकार्यात थोड्याच दिवसांत बऱ्यापैकी सक्रिय झाल्या आहेत. पक्षाच्या सर्व उपक्रमांत त्या हिरीरीने सहभागी होतात. नावेलीच्या आमदार बनण्याचे प्रतिमा मॅडमचे स्वप्न आहे. ते या खेपेला तरी साकार होईल का? आजच्या घडीस त्याचे उत्तर देणे अशक्य आहे. कारण या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी सिप्रू कार्दोज, वालंका आलेमाव तसेच माजी आवेर्तान फुर्तादो हेही रेसमध्ये आहेत. या मातब्बरांसमोर प्रतिमाबायची डाळ शिजणे तसे कठीणच. विशेष म्हणजे, स्वत: त्यांनाही हे माहीत आहे. त्यामुळे त्या येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणती भूमिका घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बाबू, सुभाषच्‍या गोटात आनंद

एसटी आरक्षणाबाबत उच्च न्‍यायालयाने दिलेल्‍या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्‍यायालयाने स्‍थगिती न दिल्‍याने येत्‍या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्‍यामुळे एसटी नेत्‍यांत नाराजी पसरली असली, तरी माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर आणि विद्यमान मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍या गोटात मात्र आनंदाचे वातावरण पसरले तर नवल नाही. एसटी आरक्षणामुळे केपे आणि सांगे एसटींसाठी राखीव होणार होते. त्‍यामुळे बाबू आणि सुभाष दुसऱ्या मतदारसंघांच्‍या शोधात होते.

गोव्यात किल्ल्यांची परंपरा!

चांगल्या परंपरा सुरू केल्या तर त्या लोक स्वीकारतात. दुर्दैवाने गोवा म्हणजे ‘सन, सॅण्ड ॲण्ड सी’ ही संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न पर्यटनाच्या नावाखाली होत आहे. गोव्यात कॅसिनो, दारू व नाईट कल्चरमुळे आपली संस्कृती व आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा स्थितीत अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज व शिवप्रेमी या संघटनांनी गोव्यात दिवाळीनिमित्त किल्ले बनवा ही स्पर्धा गेल्या वर्षापासून सुरू केली आहे. राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याने या स्पर्धेत सहयोग दिले आहे. महाराष्ट्रात ही परंपरा आजतागायत सुरू आहे. गोव्यात ही नवीन किल्ले बनवा परंपरा नेट धरायला लागली आहे. गेल्या वर्षी सुमारे ५० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यंदा आणखी काही शिवप्रेमी किल्ल्यातून मराठा साम्राज्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शिवप्रेमी संघटना व अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या या कार्याचे कौतुक व्हायलाच हवे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

नरेंद्राचार्यांचा आशीर्वाद

भाजपचे सावर्डेचे युवा नेते संकेत आर्सेकर हे हिंदू विचारसरणीचे समर्थक असून त्यांनी आपली ही भूमिका नेहमीच उघडपणे सर्वांसमोर मांडली आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या संकेत यांनी हिंदू परंपरेशी जोडणाऱ्या कित्येक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कित्येक स्वामींचे सानिध्य त्यांना लाभले आहे. मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ओल्ड गोवा येथील नाणीज महाराज मठात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स्वतः नरेंद्राचार्य स्वामी उपस्थित होते. संकेत आर्सेकर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. स्वामीजींनी त्यांना ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद दिला.

‘गद्दार’ शब्दाची व्याख्या काय?

काही शब्द असे असतात, की ज्याचा अर्थ माणसामाणसाप्रमाणे व घटनेप्रमाणे बदलतो. ‘गद्दार’ या शब्दाचा अर्थ आपले राजकारणी आपल्याला फायदा पडेल तसाच घेतात. काँग्रेस पक्षाने गद्दारांना उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणतात. मात्र, गद्दार कोण? जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर आमदार बनले व आमदार असताना ज्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये गेले ते काँग्रेस पक्षासाठी गद्दार. मात्र, आमदार नसलेल्यांनी पक्ष सोडून पक्षाशी गद्दारी करून पक्षाच्या उमेदवाराला पाडला तर तो गद्दार नाही. आता समजा भाजप अथवा इतर कोणत्याही पक्षाशी गद्दारी करून जर एखादा नेता काँग्रेस पक्षात गेला, तर तो काँग्रेससाठी गद्दार असणार का? असे आम्ही नव्हे काँग्रेसचे निष्ठावानच विचारू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.