

बेंगळुरू: आगामी आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) या हंगामात खेळू शकणार नाही, अशी अधिकृत माहिती आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बोबट यांनी दिली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना बोबट यांनी यशच्या अनुपस्थितीचे कारण 'वैयक्तिक परिस्थिती' असल्याचे सांगितले आहे, मात्र त्यामागचे नेमके गुपित आता उघड झाले आहे.
गंभीर कायदेशीर प्रकरणांची टांगती तलवार
यश दयाल हा केवळ वैयक्तिक कारणांमुळेच नाही, तर अत्यंत गंभीर कायदेशीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे या हंगामाला मुकणार असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले असले, तरी राजस्थानमधील एका दुसऱ्या प्रकरणामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
जयपूरमधील सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीने यश दयाल विरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आयपीएल सामन्यादरम्यान तिची यशशी ओळख झाली होती आणि त्यानंतर दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणात 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याने राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता यश दयालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या वर्षी आरसीबीने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते, त्यामध्ये यश दयालने १३ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ५ कोटी रुपयांना संघात सामील झालेल्या या २७ वर्षीय खेळाडूला यापूर्वी यूपी टी-२० लीगमध्येही खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. आता आरसीबीच्या जाहिराती आणि प्रमोशनल इव्हेंट्समधूनही त्याचे नाव वगळण्यात आले आहे. तो सध्या आरसीबीच्या करारात असला, तरी मैदानात उतरण्याची शक्यता मावळली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.