19th Asian Games Hangzhou, 13th Day, 6th October, India Result :
चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आता शेवटाकडे आली असून शुक्रवारी (6 ऑक्टोबर) या स्पर्धेचा 13 वा दिवस होता. भारतीय खेळाडूंनी 13 व्या दिवशीही आपली शानदार कामगिरी सुरू ठेवली आहे.
शुक्रवारी भारतासाठी सर्वात मोठे यश हॉकीमध्ये मिळाले. भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याबरोबरच भारतीय संघ पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.
भारतीय हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानला 5-1 अशा गोल फरकाने पराभूत करत चौथ्यांदांचा सुवर्ण पदक नावावर केले.
तसेच शुक्रवारी तिरंदाजीत रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघाने कांस्य पदक जिंकले, तर पुरुष संघाने रौप्य पदक जिंकले आहे. महिला संघात अंकिता भक्त, भजन कौर आणि सिमनरजीत कौर यांचा समावेश आहे, तर पुरुष संघात अतानू दास, धीरज बोम्मादेवरा आणि तुषार प्रभाकर शेळके यांचा समावेश आहे.
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयने कांस्य पदक मिळवले. त्याला उपांत्य फेरीत चीनच्या ली शी फेंगने 16-21, 9-21 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे प्रणॉयला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, तो पुरुष एकेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा सईद मोदी यांच्यानंतरचा दुसऱ्याच भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
याशिवाय सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने पुरुष दुहेरीत उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांचेही पदक पक्के आहे.
महत्त्वाचे म्हणजे बॅडमिंटनमधील जागतिक क्रमवारीतही त्यांची जोडी अव्वल क्रमांकावर आली आहे. त्यामुळे पुरुष दुहेरीत अव्वल क्रमांक मिळवणारीही त्यांची पहिलीच भारतीय जोडी आहे.
तसेच महिला रेगु-सेपाक टकरावमध्ये भारताला कांस्य पदक मिळाले. या क्रीडा प्रकारात हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे दुसरेच पदक आहे.
कुस्तीमध्ये सोनमने महिलांच्या फ्रिस्टाईल 62 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. तसेच महिलांच्या फ्रिस्टाईल 76 किलो वजनी गटाक किरण बिश्नोईनेही कांस्य पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अमन सेहरावतनेही कांस्य पदक जिंकले.
बुद्धीबळ खेळात 8 व्या फेरीत भारतीय पुरुष संघाने कोरियाला आणि भारतीय महिला संघाने हाँग काँगला पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाला शनिवारी बुद्धीबळातही पदक मिळण्याची आशा आहे.
ब्रिज (पत्त्यांचा प्रकार) प्रकारात भारताच्या पुरुष संघाने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत हाँग काँग विरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) उपांत्य फेरीत बांगलादेश क्रिकेट संघाला 9 विकेट्सने पराभूत केले. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश करत पदक निश्चित केले आहे. अंतिम सामना शनिवारी अफगाणिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. हे क्रिकेटमधील दुसरे पदक असेल, यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे.
शुक्रवारी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवत पदक पक्के केले आहे. भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध 61-14 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, तर भारतीय महिला संघाने नेपाळविरुद्ध 61-17 असा सहज विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, शुक्रवार अखेरपर्यंत भारताच्या खात्यात 95 पदके आहेत. यात 22 सुवर्ण, 34 रौप्य आणि 39 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, भारताची तिरंदाजी, क्रिकेट, कबड्डी आणि बॅडमिंटनमध्ये पदके पक्की असल्याने यंदा भारताच्या खात्यात 100 हून अधिक पदके जमा होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदकांचा आकडा पार करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.