Asian Games: भारतीय हॉकी संघाला सुवर्ण यश! जपानला पराभूत करत चौथ्यांदा जिंकलं 'गोल्ड मेडल'

Indian Hockey Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकत पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं आहे.
India Hockey Team
India Hockey Team

India men's Hockey Team won Gold Medal in 19th Asian Games Hangzhou:

चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कमाल केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. याबरोबरच भारतीय संघ पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे.

शुक्रवारी अंतिम सामन्यात जपानला 5-1 अशा गोल फरकाने पराभूत करत भारताने चौथ्यांदांचा सुवर्ण पदक नावावर केले. तसेच भारताचे हे एशियाडमधील एकूण १६ वे पदक आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचबरोबर 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994 आणि 2002 साली रौप्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 1986, 2010 आणि 2018 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताकडून मनप्रीत सिंग (25'), अमित रोहिदास (36'), हरमनप्रीत सिंग (32', 59') आणि अभिषेक (48') यांनी गोल केले, तर जपानकडून सारेन तनकाने गोल केला.

India Hockey Team
Asian Games मध्ये चीनची मनमानी? नीरज-ज्योतीसह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय

अंतिम सामन्यात भारताच्या आक्रमणाची सुरुवात हार्दिक सिंग आणि जर्मनप्रीत सिंगने केली. पण पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने गोलसाठी अनेक प्रयत्न केल्यानंतरही जपानचा गोलकिपर ताकुमी कितागावाने चांगला बचाव केला. त्यामुळे पहिला क्वार्टर बिनागोलचा संपला.

मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने लय मिळवली. भारताने जपानचा बचाव भेदला. भारतासाठी 25 व्या मिनिटाला मनप्रीत सिंगने पहिला गोल केला. त्यामुळे पहिला हाफ संपल्यानंतर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपली लय कायम ठेवली. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी एकमेकांना दिलेल्या पासनंतर हरमनप्रीतने 32 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी दुसरा गोल नोंदवला.

त्यानंतर लगेचच 36 व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरूनच गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली. यादरम्यान भारताच्या बचावफळीनेही चांगली कामगिरी बजावली. त्यांनी जपानला गोल करण्यापासून रोखले होते.

India Hockey Team
Asian Games: भारतासाठी 12 वा दिवस सोनेरी! तिरंदाजी अन् स्क्वॅशमध्येही मिळवलं विक्रमी गोल्ड मेडल

दरम्यान अखेरच्या क्वार्टरमध्ये अभिषेकने 48 व्या मिनिटालाच गोल करत भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली. पण त्यानंतर लगेचच जपानकडून 51 व्या मिनिटाला तनकाने गोल करण्यात यश मिळवले.

मात्र, जपानला भारताची आघाडी मोडून काढणे जमले नाही. अखेरचा एक मिनिट शिल्लक असतानाच हरमनप्रीतने पुन्हा एक गोल केला. त्यामुळे अखेरीस भारताने 5-1असा विजय मिळवला.

हॉकी इंडियाकडून बक्षीस

भारतीय पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आणि पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवल्याबद्दल हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडूला 5 लाख रुपये बक्षीस आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना 2.50 लाख रुपये बक्षीस घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com